एन सणासुदीच्या तोंडावर शेतकऱ्यांवर 'मूग' गिळून बसण्याची वेळ!

मुगाची खरेदी करायला व्यापारी तयार नाहीत. सरकारी खरेदीचाही पत्ता नसल्यानं एन सणासुदीच्या तोंडावर शेतकऱ्यांवर मुग गिळून बसण्याची वेळ आली आहे.

नितीन बनसोडे, लातूर, 4 ऑगस्ट : यंदा मुगाच्या पिकाचं भवितव्य अतिशय अवघड होण्याची शक्यता निर्माण झालीय. केंद्र सरकारनं मुगाला प्रतिक्विंटल 6900 रुपयांचा भाव दिलाय. पण या भावानं मुगाची खरेदी करायला व्यापारी तयार नाहीत. अशावेळी सरकारनं आपली खरेदी सुरु करुन शेतकऱ्यांना धीर देणं अपेक्षीत असताना सरकारी खरेदीचा पत्ता नसल्यानं एन सणासुदीच्या तोंडावर शेतकऱ्यांवर मुग गिळून गप्प बसण्याची वेळ आली आहे.आज लातूरच्या बाजारात सौदे सुरु होणं अपेक्षीत होतं. पण सोमवारी पुण्यात झालेल्या व्यापाऱ्यांच्या बैठकीनंतरही लातूरमधील व्यवहार ठप्पच आहेत. सध्या लातूरच्या बाजारात मोठ्या प्रमाणात मुगाची आवक होतेय. सरासरी दररोज काही हजार क्विंटल मूग विक्रीसाठी दाखल होतोय. पण खरेदीच ठप्प झाल्यानं शेतकरी त्रस्त आहेत.सरकारनं मुगाची खरेदी करावी अशी स्वाभाविक मागणी होत असताना सरकारी यंत्रणा मात्र मूग गिळून गप्प आहे. त्याचा फटका आपसुकच शेतकऱ्यांना बसतोय. सध्या लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यासह कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात मूग लातूरला विक्रीसाठी येतोय. ही विक्री हमीभावापेक्षा तब्बल अडीच हजार रुपये कमी दरानं होतेय. त्यामुळं फरकाची ही रक्कम शेतकऱ्यांना कोण देणार या प्रश्नाचं उत्तर मात्र मिळत नाहीए.

मुगाला जास्त काळ शेतात ठेवता येत नाही, अन् घरातही ठेवण्यास जागा नाही. अशात सणासुदीचे दिवस तोंडावर आल्यानं शेतकऱ्यांनी मूग विकून चार पैसे मिळवण्याचं नियोजन केलं होतं. पण आता त्यांनाही मूग गिळून गप्प बसण्याची वेळ आलीय. आता मुंबईत बसलेल्या मायबाप सरकारनं तरी मूग खरेदीबाबत मूग गिळून गप्प बसू नये ऐवढीच शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. VIDEO : सेनेच्या नगरसेवकाने वैद्यकीय अधिकाऱ्याला भेट दिलं चक्क जिवंत डुक्कर!

Trending Now