पुण्यात अघोरीचा कहर; फोटोवरच केली काळी जादू

यासाठी म्हणून ह्या शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या झाडांवर, रक्तांने माखलेल्या शेकडो काळ्या बाहुल्या आणि रक्ताचे ठिपके असलेले फोटो ठोकले गेले आहेत

Chittatosh Khandekar
पुणे, 24 डिसेंबर: सांस्कृतिक आणि सुशिक्षितांचं शहर असलेल्या पुण्यात अंधश्रद्धेचा कळस गाठणारा एक प्रकार उघडकीला आलाय. केवळ कुणाचं तरी वाईट किंवा चांगल व्हावं, यासाठी म्हणून ह्या शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या झाडांवर, रक्तांने माखलेल्या शेकडो काळ्या बाहुल्या आणि रक्ताचे ठिपके असलेले फोटो ठोकले गेले आहेत. विद्येचे माहेगरघर असलेल्या पुण्यातच फोटो वर काळ्या जादू केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.शेकडो टाचण्या मारलेल्या बाहुल्या, गुलाल बुक्क्यातले फोटो, दाभणाने टोचलेले लिंब, कोहळे आणि काळ्या कापड्यातील नारळ, अशा असंख्य भीतिदायक गोष्टींनी माखलेली झाडं पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या मध्यवर्ती आणि वर्दळीच्या ठिकाण असलेल्या खडकी परिसरात दिसत आहेत. अर्थातच हा सगळा प्रकार अघोरी जादूटोण्याचा आहे, हे वेगळ सांगायची गरज नाही.राजरोसपणे सुरु असलेल्या याप्रकाराची माहिती मिळताच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आणि पोलिसांनी तात्काळ या बाहुल्या काढून झाडांना मुक्त केलं. मात्र या सगळ्यांच्या नजरेला एक गंभीर प्रकार दिसला नाही आणि तो म्हणजे या बाहुलयांवर असलेलं रक्त.

20 ऑगस्ट 2013 या दिवशी अंधश्रद्धेविरुद्ध लढणाऱ्या डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रयत्नांमुळे राज्याला जादूटोणा विरोधी कायदा मिळाला आहे. मात्र त्यांच्याच शहरात त्या कायद्याची भीती अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांना वाटत नसेल तर दाभोलकरांचे मारकरी शोधू न शकणाऱ्या, यंत्रणांचं हे दूसरं अपयश आहे. असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

Trending Now