देवदेव करते म्हणून आईच्या मानेत पोटच्या मुलानेच खुपसला चाकू

सुनिता यांच्या घरी देवारा आहे. त्यांना देवभक्तीची आवड असल्याने त्या नेहमी देवपुजा करत असतात.

गणेश गायकवाड, बदलापूर, 28 आॅगस्ट : देवाची अती भक्ती केल्याचा राग आल्याने पोटच्या मुलानेच आपल्या आईच्या गळ्यात चाकू खुपसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बदलापूरच्या शिरगांव शिंदे आळी भागात हा प्रकार घडला आहे. सुनिता धेंडे या आपला मुलगा आकाश धेंडे याच्यासोबत राहतात. सुनिता यांच्या घरी देवारा आहे. त्यांना देवभक्तीची आवड असल्याने त्या नेहमी देवपुजा करत असतात. पण आपली आई सतत देवदेव करत असल्यामुळे त्याचा राग मुलगा आकाशला येत होता. याच कारणावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांड झाले.

त्या भांडणात संतापलेल्या आकाशने आई सुनिता हिच्या गळयात धारदार चाकू खुपसून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. गंभीर जखमी झालेल्या सुनिताला उपचारासाठी केईएम रूग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची मृत्यूशी झुंज सुरू आहे. या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात आकाशच्या विरूध्द आईला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली. आकाशला न्यायालयात हजर केले असता २९ आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

Trending Now