मुंबई, 28 मार्च : प्रेमात सफलता मिळाली, तर आनंदाला पारावार उरत नाही; मात्र प्रेमात अपयश आलं तर ते पचवणं जड जातं. कित्येकांना प्रेमात आलेलं अपयश पचवायला अनेक वर्षं लागतात. त्यातून बाहेर पडण्यासाठी अनेक उपाय केले जातात. अशा वेळी सकारात्मक राहणं, चांगला विचार करणं, आनंदी राहणं गरजेचं असतं. त्यासाठी आपली फॅशनही उपयुक्त ठरू शकते. ब्रेक-अपच्या मानसिकतेतून बाहेर पडण्यासाठी तज्ज्ञांनी दिलेल्या फॅशनबाबतच्या काही टिप्स उपयोगी पडू शकतात. 'टीव्ही 9 हिंदी'ने त्याबाबत माहिती देणारं वृत्त दिलंय.
ब्रेक-अपनंतरचे दिवस फार निराशादायक असतात. अनेकांना त्या काळात मानसोपचारतज्ज्ञांची मदतही घ्यावी लागते. त्या मनःस्थितीतून बाहेर पडण्यासाठी अनेक उपाय करता येतात. तुमची फॅशन स्टाइल बदलूनही तुम्हाला यासाठी मदत होऊ शकते. 'डेली मेल'मध्ये स्टायलिस्ट स्टेफेनिया बार्टोलोमियो यांनी फॅशन टिप्सद्वारे ब्रेकअपमधून बाहेर कसं पडावं, याबाबत सांगितलं आहे.
पहिला नियम : रंगांचं महत्त्व
पिवळा, नारिंगी, गुलाबी, हिरवा, निळा असे ब्राइट रंग मेंदूत सकारात्मक विचार वाढवतात. या रंगांचे कपडे घातल्यामुळे आनंदी किंवा चांगले विचार मनात येतात. प्रेमात आलेल्या अपयशामुळे नकारात्मक विचार मनात येत असतील, तर ब्राइट रंगाचे कपडे घाला.
दुसरा नियम : आरामदायी कपडे
एखाद्या व्यक्तीच्या विरहामुळे आपण अस्वस्थ होतो. त्यामुळे भूक न लागणं, झोप न येणं या गोष्टी घडतात. तज्ज्ञांच्या मते अशा काळात घट्ट कपडे घालू नयेत. आपला ताण काही वेळेला निराशा निर्माण करतो. बरेचदा या काळात अनेकांना घरी एकटं राहायला आवडतं. त्यामुळे अशा वेळी आरामदायी कपडे घालावेत.
तिसरा नियम : स्वतःसाठी खरेदी
स्टेफेनिया यांच्या मते मुलींना खरेदी करायला खूप आवडतं; पण ब्रेक-अपच्या नंतर असं खरेदी करणं थेरपी म्हणून उपयोगी पडू शकतं. स्वतःसाठी नवीन खरेदी करणं मनात आनंदी भावना उत्पन्न करतं.
चौथा नियम : ऑफिसला जाताना छान तयार व्हा
ऑफिसला जाताना आपण छान दिसलो, तर मन आनंदी राहतं. त्यामुळे ब्रेक-अपनंतर ऑफिस किंवा कामासाठी बाहेर जाताना कायम स्वतःच्या लूककडे लक्ष द्या. चांगलं दिसण्यासाठी प्रयत्न करा. यामुळे तुमचा मूड छान राहील. आनंदी व प्रसन्न वाटेल.
मन आनंदी असेल, तर नकारात्मक विचार आजूबाजूला फिरकत नाहीत. तज्ज्ञांच्या मते, तुमचा फॅशन सेन्स तुम्हाला सकारात्मक राहण्यासाठी मदत करतो. प्रेमात आलेलं अपयश पचवणं कदाचित यामुळे सोपं होऊ शकतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags:Health, Health Tips, Lifestyle