Success Story : चपलाच्या दुकानात काम करणारा झाला १३०० कोटींचा मालक

कठीण प्रसंगांमध्ये हार न मानता आपल्या उद्दीष्टांकडे लक्ष देणारे कधीच अपयशी होत नाहीत हेच जणू या सक्सेस स्टोरीमधून कळते

रईस सिनेमातील ‘कोई धंदा छोटा नही होता और धंदेसे बडा कोई धर्म नही होता.’ हा शाहरुख खानचा डायलॉग तुम्ही नक्कीच ऐकला असेल. हा डायलॉग फक्त सिनेमातच नाही तर खऱ्या आयुष्यात एका व्यक्तीने सत्यात आणला आहे. ती व्यक्ती म्हणजे ‘खादिम इंडिया’ या कंपनीचे मालक प्रसाद रॉय बर्मन. रॉय यांचा चपलाच्या दुकानात काम कऱण्यापासून ते स्वतःची कंपनी स्थापन करण्यापर्यंतचा प्रवास सोप्पा नव्हता. या संघर्षातूनच सामान्य माणसांतून एखादा असामान्य माणूस घडत असतो. बर्मन हे मुळचे कलकताचे आहेत. एक दिवस घरातून भांडण करून ते मुंबईला आले. आता घरातून भांडून आल्यावर लगेच परत कसं जायचं म्हणून मग त्यांनी एका चपलाच्या दुकानात काम करण्यास सुरूवात केली. त्यानंतर १९६५ मध्ये घरी परत येऊन त्यांनी चितपुरमध्ये एक छोटंसं दुकान खरेदी करून चपलांचा व्यवसाय सुरू केला. दुकान सुरू केल्यानंतर काही काळाने त्यांना एक कल्पना सुचली. त्यांनी विचार केला की जर चांगल्या दर्जाचे चप्पल तयार करून विकले तर लोकांना ते नक्की अवडतील. यातून व्यवसायही वाढेल. त्यांनी लगेच चपलाचे खादिम नावाचे दुकान सुरू केले. वर्षांनूवर्षांच्या अथक परिश्रमानंतर फक्त पश्चिम बंगालमध्येच नाही तर भारताच्या पूर्व भागात खादिम हा चपलांचा फार मोठा ब्रॅण्ड झाला.

१९९३ मध्ये कलकत्यामध्ये तीन नवीन दुकानं सुरू केली. त्यांनाही चांगला प्रतिसाद मिळाला. यानंतर कंपनीने तामिळनाडूमध्ये प्रवेश केला. सध्या खादिम या कंपनीचे २३ राज्यात आणि एका केंद्रशासित प्रदेशात मिळून एकूण ८५३ रिटेल दुकानं आहेत. खादिम कंपनीचे चप्पल मध्यमवर्गीय लोकांसाठी आहेत. त्यामुळे त्यांचा अधिकतर ग्राहक हा मध्यमवर्गीय आहे. भारतीय मार्केटमध्ये त्यांची मिळकत ४० हजार कोटी रुपये आहे. ७ डिसेंबर २०१३ मध्ये वयाच्या ८३ व्या वर्षी सत्यप्रसाद रॉय बर्मन यांचे निधन झाले. पण त्यांनी सुरू केलेली कंपनी आता देशात एक ब्रँड झाली आहे. कठीण प्रसंगांमध्ये हार न मानता आपल्या उद्दीष्टांकडे लक्ष देणारे कधीच अपयशी होत नाहीत हेच जणू या सक्सेस स्टोरीमधून कळते.

Trending Now