Success Story: नवाजुद्दीन सिद्दीकीचा हा प्रवास पाहून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकीत

चंदेरी दुनियेत आपणंही एखादा चमकता तारा व्हावा असं अनेकांचं स्वप्न असतं. हेच स्वप्न उराशी धरून ते मुंबईत येतात. पण इथल्या गर्दीत काही चेहरे हरवून जातात. जे उरतात ते ध्रुव ताऱ्यासारखे कायम चमकत राहतात. आयुष्यात पुढे जाण्यासाठी करावा लागणारा संघर्ष कोणालाही चुकलेलं नाही. प्रत्येकाची त्याकडे पाहण्याची व्याख्या वेगळी असली तरी प्रत्येकाला यातून जावेच लागते. आज आम्ही तुम्हाला अशा एका कलाकाराबद्दल सांगणार आहोत ज्याच्या जीवनाकडे पाहून संघर्षाची व्याख्याच बदलली जाते. उत्तर प्रदेशातील बुढाना शहरात आताचा बॉलिवूडचा स्टार नवाजुद्दीन सिद्दीकीचा जन्म झाला. नवाजचे वडील शेतकरी होते. आठ भावंडांमध्ये नवाज सर्वात मोठा.

घरात अठराविश्व दारिद्य असल्यामुळे आयुष्यात चैन काय असते हे बहुधा त्याला माहितीच नव्हतं. पण अशातही त्याला सिनेमा पाहण्याचं वेड लागलं. वर्षभराच्या कमाईतून पैसे वाचवत तो ईद आणि दिवाळीला आवर्जुन सिनेमा पाहायचा. एकीकडे घरासाठी कमवता तो आपलं शिक्षणही पूर्ण करत होता. केमिस्ट्रीमध्ये त्याने बॅचलर डिग्री घेतली. पुढे शिकण्याची त्याची इच्छा होती. मात्र त्यासाठी पुरेसे पैसे नसल्यामुळे त्याने आपला मोर्चा नोकरीकडे वळवला. गुजरातमध्ये तो एका केमिस्ट्रच्या दुकानात कामाला लागला. नोकरी करत असतानाही त्याच्या डोक्यातून नाटक- सिनेमा पाहण्याचे खूळ गेले नाही. गुजरातमध्ये एक नाटक पाहिले. ते नाटक पाहून नवाज एवढा प्रभावीत झाला की आपला जन्म अभिनय करण्यासाठीच झाला याची उपरती त्याला झाली. अनेक ठिकाणी जोडे घासल्यानंतर त्याने एनएसडीमध्ये अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं. शिकतानाच तो अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या भूमिका करत होता. पण याने त्याचा खर्च भागत नव्हता म्हणून नशिब आजमवण्यासाठी तो मुंबईत आला. काम मिळवण्यासाठी संघर्ष करताना त्याला १९९९ मध्ये आमिर खानच्या सरफरोश सिनेमात छोटीशी भूमिका मिळाली. त्यानंतर कित्येक वर्ष त्याचा अभिनय हा पाकीटमार ते गर्दीतला एक चेहरा एवढ्यापर्यंतच मर्यादित राहिला. हा काही २ ते ३ वर्षांचा काळ नव्हता. १९९९ पासून २००६ पर्यंत त्याचा काम मिळवण्याचा संघर्ष सुरू होता. पण म्हणतात ना केलेले कष्ट कधी फूकट जात नाहीत. प्रामाणिकपणे काम केलं तर तुम्हाला यश मिळतंच. २००७ मध्ये अनुराग कश्यपने ब्लॅक फ्रायडेमध्ये त्याला एक भूमिका दिली. याच भूमिकेमुळे नवाजचे नशू पालटले. त्यानंतर त्याने कश्यपच्याच गँग्स ऑफ वासेपूर भाग १ आणि २ मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. या सिनेमांच्या यशानंतर त्याच्या खात्यात अनेक चांगल्या भूमिका जमा होऊ लागल्या. त्याने डेव डी, पिपली लाइव्ह, तलाश, किक, बदलापूर, बजरंगी भाईजान, रईस, मॉम या सिनेमात आपल्या अभिनयाची झलक दाखवली. एकेकाळी दोन वेळच्या जेवणाची वानवा असणाऱ्या घरात आज पंचपक्वानं शिजत आहेत. याचं पूर्ण श्रेय नवाजच्या कष्टांना जात. काही महिन्यांच्या संघर्षाला कंटाळून मुलं आत्महत्या करतात किंवा नैराश्यग्रस्त होतात. पण आता नैराश्यात जाण्यापूर्वी नवाजचा हा जीवनप्रवास एकदा डोळ्यासमोर आणाच.

Trending Now