'प्रेमा तुझा रंग कसा'तून उलगडणार गुलाबी प्रेमाची काळी बाजू

गश्मीर या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे

मुंबई, 16 जुलैः आजवर अनेक चित्रपट, साहित्यातून प्रेमाचं चित्रण करण्यात आलं आहे. त्यातून प्रेम हे अत्यंत भावनिक असतं, प्रेमाची भावना गुलाबी असते, असं दाखवण्यात आलं. वास्तवात मात्र प्रेमाची काळी बाजूही असते आणि ही बाजू अनेकदा अंधारात राहाते. प्रेमाची हीच काळी बाजू स्टार प्रवाह आपल्यासमोर मांडणार आहे. मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात प्रथमच केवळ प्रेमकथांतील गुन्ह्यांवर आधारित ‘प्रेमा तुझा रंग कसा’ ही मालिका स्टार प्रवाहवर येत आहे. १६ जुलैपासून रात्री दहा वाजता ही मालिका पाहता येणार आहे. अभिनेता गश्मीर महाजनी या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे.प्रेमा तुझा रंग कसा ही नवी मालिका सत्य घटनांपासून प्रेरित अशा प्रेमकथा, त्यातील गुन्हे, त्यांचा तपास या मालिकेतून दाखवला जाणार आहे. टेलिव्हिजनवर गुन्ह्यांच्या तपासावर आधारित अनेक कार्यक्रम झाले असले, तरी केवळ प्रेमाशी संबंधित गुन्ह्यांवर आधारित मालिका करण्याचा पहिला प्रयत्न स्टार प्रवाह करत आहे. त्यामुळेच या मालिकेचं वेगळं महत्त्व आहे.गश्मीर महाजनीनं अभिनेता म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. उत्तम शरीरयष्टी, रफ अँड टफ लूक्स आणि धीरगंभीर आवाज ही गश्मीरची खासियत... गश्मीर या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. तो या मालिकेचं सूत्रसंचालन करणार आहे. त्याच्या खास शैलीनं या मालिकेतल्या कथांचं नाट्य अधिक खुलणार आहे.

Trending Now