Sonali Bendre Photo: कर्करोगग्रस्त सोनाली बेंद्रे आता दिसतेय अशी, समोर आला फोटो

लोकांच्या आयुष्यातील घटना वाचल्यानंतर मला एक वेगळी उर्जा मिळाली असून या प्रवासात मी एकटी नाही हे मला आता कळलं आहे.

मुंबई, 10 जुलैः काही दिवसांपूर्वी सोनाली बेंद्रेने तिला कर्करोग झाल्याचे सोशल मीडियावर एका पोस्टद्वासे सांगितले होते. सध्या ती न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहे. सोनालीचे आजारासंबंधिचे पोस्ट वाचल्यावर अनेकांनाच आश्चर्याचा धक्का बसला. बॉलिवूडमधील कलाकारांपासून ते तिच्या चाहत्यांपर्यंत साऱ्यांनीच तिला लवकराच लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. सोनालीनेही तिला शक्य तितक्या ट्विटना उत्तर देण्याचा प्रयत्न केला.आज सोनालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा उपचारांदरम्यानचा एक फोटो आणि एक व्हिडिओ शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने तिच्या मोठ्या केसांपासून ते लहान केसांपर्यंतचा प्रवास भावनिकपद्धतीने दाखवला आहे. हा फोटो शेअर करताना तिने सर्वांचे आभार मानले आहेत. ज्या व्यक्तींनी त्यांच्या आयुष्याच्या घटना तिच्यासोबत शेअर केल्या त्या सर्वांचे तिने आवर्जुन आभार मानले आहेत. सोनाली म्हणाली की, 'लोकांच्या आयुष्यातील घटना  वाचल्यानंतर मला एक वेगळी उर्जा मिळाली असून या प्रवासात मी एकटी नाही हे मला आता कळलं आहे.'या फोटोमध्ये सोनाली फार अशक्त दिसते. पण तरीही तिच्यातील खेळकर वृत्ती काही कमी झाली नाही. मोठे केस कापताना तिला झालेले दुःख तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत असले तरी पुढील सर्व लढाईसाठी ती आता सज्ज झाली आहे हेच हा व्हिडिओ सर्वांना सांगतो. सोनालीची तब्येत जरी खालावलेली असली तरी तिच्या चेहऱ्यावरचं हसू तसूभरही कमी झालेलं नाही. सोनालीचं हेच हसू तिला या आजारातून बाहेर काढेल अशाच प्रतिक्रिया तिच्या या फोटोला येत आहेत.

गेल्या आठवड्यात सोनालीने भावूक मेसेज लिहीत तिला कर्करोग झाल्याचे सांगितले होते, सोनाली बेंद्रेनं लिहिलं, कधीकधी, अगदी अनपेक्षितरित्या, तुमचं आयुष्य एक वळण घेतं. मला नुकतंच हायग्रेड कॅन्सरचं निदान झालं आहे. जो सातत्यानं पसरत चालला आहे. असं निदान होणं हे आमच्यासाठी अनाकलनीय होतं. माझं कुटुंब आणि मित्रपरिवार सातत्यानं माझ्यासोबत होता आणि त्यांनी मला प्रचंड पाठिंबा दिला. असे जीवलग लाभणं ही भाग्याची गोष्ट आहे. मी त्या प्रत्येकाची आभारी आहे. त्वरित उपचार करणं याशिवाय याच्याविरोधात लढण्याचा आणखी चांगला पर्याय नाही.त्यामुळेच, माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी सध्या न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहे. आम्ही खूप आशावादी आहोत आणि प्रत्येक टप्प्यावर या आजाराशी लढण्याचा आम्ही निर्धार केला आहे.

Trending Now