ही मीच आहे आणि मी फार खूश आहे, Friendship Day वर सोनाली बेंद्रेचा अनोखा संदेश

जेव्हा मी लोकांना हे सांगते तेव्हा ते माझ्याकडे आश्चर्यचकीत होऊन पाहतात

न्यूयॉर्क, ०५ ऑगस्ट-  बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या अमेरिकेत कर्करोगाशी दोन हात करत आहे. सोनालीने फ्रेण्डशीप डेचं औचित्य साधून आपल्या मैत्रिणींसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून तुम्ही भावूक नक्कीच व्हाल. पण सोनालीने या फोटोसोबत लिहिलेला मेसेज पाहून तुम्ही सकारात्मकही व्हाल. सध्या सोनाली केमोथेरपीचे उपचार घेत असल्यामुळे तिच्या डोक्यावरचे सारे केस गळले. अनेकदा रुग्ण आपलं हे रुप इतरांना दिसू नये म्हणून नैराश्यग्रस्त होतात आणि सर्वांपासून दूर राहणं पसंत करतात. पण सोनाली मात्र या आजाराशी धीराने लढताना दिसत आहे. उपचारांदरम्यान तिला कितीही त्रास होत असला तरी तिच्या चेहऱ्यावरचं हसू तसूभरही कमी झालेलं नाही.

या फोटोमध्ये सोनालीच्या दोन जिवलग मैत्रिणी सुझान खान आणि गायत्री जोशी दिसत आहेत. हा फोटो शेअर करताना सोनालीने लिहिले की, ‘ही मीच आहे... यावेळी मी फार खूश आहे. जेव्हा मी लोकांना हे सांगते तेव्हा ते माझ्याकडे आश्चर्यचकीत होऊन पाहतात. मी आता प्रत्येकक्षण मनमुरादपणे जगते. मी आनंदी राहू शकेन अशा प्रत्येक क्षणाच्या मी शोधात असते. हो... कधी कधी खूप दुखतं पण मी आता तेच बोलते ज्याने मला आनंद मिळतो आणि ज्याच्यावर माझं नितांत प्रेम आहे. मी फार नशिबवान आहे, की माझे मित्र मैत्रिणी त्यांच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढत मला भेटायला येतात. मला सतत फोन किंवा मेसेज करतात. मला एकटेरपण कधी जाणवू देत नाहीत. माझ्यावर एवढं प्रेम करण्यासाठी मी आयुष्यभर तुमची ऋणी आहे.’ यानंतर सोनालीने असे काही लिहिले की, त्यावर हसावं की रडावं असाच प्रश्न तिच्या चाहत्यांना पडेल. सोनालीने लिहिले की, ‘हल्ली मला तयार व्हायला सर्वात कमी वेळ लागतो. कारण आता मला माझ्या केसांना वेळ द्यावा लागत नाही.’ 

Trending Now