VIDEO : 'होम स्वीट होम'च्या टीझरनं जागवल्या रिमा लागूंच्या आठवणी

होम स्वीट होम' या मराठी चित्रपटाचा हृदयस्पर्शी टीझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला. यामध्ये ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आणि रीमा यांची अफलातून केमिस्ट्री बघायला मिळते.

मुंबई, 31 आॅगस्ट : 'होम स्वीट होम' या मराठी चित्रपटाचा हृदयस्पर्शी टीझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला. यामध्ये ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आणि रीमा यांची अफलातून केमिस्ट्री बघायला मिळते. 'होम स्वीट होम' या चित्रपटाच्या टीझरमध्ये रीमा आणि मोहन जोशी यांच्या नात्याचा गोडवा दाखवलाय,सोबतीला सुप्रसिद्ध कवी, गीतकार वैभव जोशी यांची'नात्याचे रुटीन चेकअप' सांगणारी त्यांच्याच आवाजातील सुंदर कविता आहे. नात्यात संवादाचे प्रेशर जपणे असेल, खाण्यासंबंधीचे पथ्य असेल किंवा  दाम्पत्यातील खट्याळपणा असेल, अशा सर्वच बाबी टीजरमध्ये कवितेच्या रूपाने सादर केल्या आहेत. ३५ वर्षे एकाच घरात वास्तव्य केलेल्या दाम्पत्याच्या मनात घराविषयी असणारे स्थान टीझरमध्ये उल्लेखिले आहे. टीझरच्या शेवटी प्रसाद ओक, विभावरी देशपांडे आणि हृषिकेश जोशी दारातून डोकावताना दिसतात. या टीझरमुळे दिवंगत अभिनेत्री रिमा लागू यांच्या आठवणी जागवल्यात.

अभिनेता, लेखक हृषीकेश जोशी 'होम स्वीट होम' मधून दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहे, या चित्रपटात दिवंगत अभिनेत्री रिमा तसेच मोहन जोशी, हृषिकेश जोशी, स्पृहा जोशी, प्रसाद ओक, विभावरी देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'होम स्वीट होम' ची कथा हृषिकेश जोशी, वैभव जोशी, मुग्धा गोडबोले यांची आहे. संगीतकार नरेंद्र भिडे, संतोष मुळेकर यांनी कवी,गीतकार वैभव जोशी यांच्या गीतांना स्वरबद्ध केले आहे.

Trending Now