मराठी बातम्या / बातम्या / मनोरंजन / काचा फोडते, आगीतून बिनधास्त उड्या मारते; बॉलिवूडमधली स्टंटवुमन मुस्कान सय्यदबद्दल माहिती आहे का?

काचा फोडते, आगीतून बिनधास्त उड्या मारते; बॉलिवूडमधली स्टंटवुमन मुस्कान सय्यदबद्दल माहिती आहे का?

Muskan Syed

तिचा धाडसी स्वभाव आणि तिचे गुण यांच्यामुळे ती इंडस्ट्रीमध्ये ज्युनिअर आर्टिस्टवरून स्टंटवुमन झाली. कसा आहे मुस्कान सय्यदचा प्रवास पाहा.


मुंबई, 03 फेब्रुवारी :   पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना महिलांनी जवळपास सगळ्या क्षेत्रात उंच भरारी घेतली आहे. अगदी स्टंटमनचं मारामारी किंवा अ‍ॅक्शन सीनचं कामही आता स्त्रिया करू शकतात. अशाच एका स्टंट वुमनची एक व्हिडिओ पोस्ट सध्या खूप व्हायरल झाली आहे. 31 जानेवारीला तिची 23 सेकंदांची क्लिप Humans of Bombay या फेसबुक पेजवर प्रसिद्ध करण्यात आली. त्या क्लिपला दोन दिवसांत एक लाख 89 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले. मुस्कान सय्यद असं तिचं नाव. गरजेपोटी सुरू केलेल्या या कामामध्ये तिला कोणकोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो, त्याबद्दल तिने या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

स्टंटवुमन म्हणून काम करणं वाटतं तितकं सोपं नाही. आगीतून जाणं, बिल्डिंगमधून खाली उडी मारणं, पाण्यात झोकून देणं, हिरो-हिरॉइनकडून मार खाणं अशा अनेक थरारक गोष्टी यात कराव्या लागतात. प्रसंगी जिवावरही बेतू शकतं. त्यामुळेच इतकं अवघड क्षेत्र कोणी करिअरसाठी कसं निवडू शकतं, हा प्रश्न पडतो. म्हणूनच स्टंटवुमन म्हणून तिची कहाणी खूप रंजक वाटते. बेताची आर्थिक परिस्थिती तिला या क्षेत्राकडे घेऊन गेली. लहान वयातच तिला पैसे कमवावे लागत होते. अगदी 8 वर्षांची असताना लग्नात पाणीवाटप करून आपण 40 रुपये कमावत होतो, असं तिने सांगितलं. “अशाच एका लग्नात बॉलिवूडमधलं कोणी तरी बालकलाकाराच्या शोधात आलं आणि माझं बॉलिवूड इंडस्ट्रीत पाऊल पडलं,” असं ती म्हणाली. चांगले पैसे मिळत असल्यानं शूटिंग आणि लग्न अशी दोन्हीकडे तिची कमाई होऊ लागली.

हेही वाचा - कोण आहे रणवीर सिंहची लाडकी मेहूणी? दीपिकापेक्षा दिसते सुंदर, काय करते माहितीये?

तिचा धाडसी स्वभाव आणि तिचे गुण यांच्यामुळे ती इंडस्ट्रीमध्ये ज्युनिअर आर्टिस्टवरून स्टंटवुमन झाली. “एकदा एका टीव्ही मालिकेच्या सेटवर एक अभिनेत्री पाणी खोल असल्यानं रडू लागली. त्या वेळी केवळ 16 वर्षांची असूनही मी हे सहज करू शकते असं सांगितलं. मला एकदा करून दाखवण्यास सांगितलं व मी सहज उडी मारून पोहले. तेव्हा मला स्टंटवुमन म्हणून माझं पहिलं काम मिळालं,” असं तिने सांगितलं.

इंडस्ट्रीमध्ये स्टंटवुमन म्हणून काम सुरू केल्यावर 2 वर्षांनी ती एका व्यक्तीच्या प्रेमात पडली व पालकांच्या मनाविरुद्ध तिनं लग्नही केलं. काम थांबलं, वर्षाच्या आत पाळणा हलला; मात्र नवरा तिला फसवत होता. 5 वर्षांच्या शारीरिक आणि भावनिक वेदनांनंतर 2 मुलं तिच्या पदरात टाकून तो निघून गेला. जाताना तिनं साठवलेले सगळे पैसेही घेऊन गेला. डोक्यावर असलेलं कर्ज व मुलांची जबाबदारी यासाठी तिनं उभं राहायचं ठरवलं. स्वतःच्या अंगी असलेल्या कौशल्यांचा वापर करून ती स्टंटवुमन म्हणून काम करू लागली. 2013पासून चालू झालेला तिचा हा प्रवास अखंड सुरू आहे. या काळात कशा प्रकारचे स्टंट्स केले याबद्दलही तिने सांगितलं, “मी 15 मजली बिल्डिंगवरून उडी मारली आहे, भिंतीवर फेकली गेली आहे.

हेही वाचा - Chitrashi Rawat: 'चक दे इंडिया' फेम चित्राशी रावत अडकणार लग्नाच्या बेडीत; 11वर्षे डेटींगनंतर मोठा निर्णय

इतकंच नाही, तर माझ्या शरीराला आगही लावण्यात आली आहे; मात्र स्टंटवुमन म्हणून इंडस्ट्रीमध्ये खूप आदर मिळतो. कलाकार तर आम्हाला कोहिनूर असं म्हणतात. कारण आमच्याशिवाय त्यांचे चित्रपट त्यांचे राहणार नाहीत.” स्टंटवुमन म्हणून काम करताना जिवाला धोका असला, तरी खूप मदतही केली जाते असं ती म्हणते. स्टंट झाल्यावर सगळं ठीक आहे ना, याची चौकशी केली जाते, गरज असल्यास वैद्यकीय मदत पुरवली जाते. असं असलं तरी हे काम खूपच धोकादायक असल्याचं ती म्हणते. “मला आठवतंय, एका सीनमध्ये माझ्या अंगाला आग लावून मला बिल्डिंगवरून खाली उडी मारायची होती. तेव्हा मला अपघात झाला व 2 महिने मी अंथरुणावर होते. आणखी एकदा एका अ‍ॅक्शन सीनमध्ये माझ्या बरगड्या फ्रॅक्चर झाल्या होत्या,” असं तिने लिहिलं आहे.

केवळ पैशांच्या गरजेपोटी कामातला धोका ती आज स्वीकारते आहे. आता थोडी मोठी झालेली मुलंही तिला सांगतात, स्वतःची काळजी घे; मात्र मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी ती रोज स्वतःला मरणाच्या दाढेत ढकलते. स्वतःच्या वाट्याला आलेलं दुःख त्यांना मिळू नये, यासाठी तिची धडपड आहे.

First published: February 03, 2023, 20:24 IST

Tags:Bollywood, Bollywood News

ताज्या बातम्या