कलाकार लिहितायत पत्र!

प्रमोशन आणि त्यासाठी लिहिली जाणारी पत्र हा कायमच एक हिट फंडा ठरलाय.

Sonali Deshpande
विराज मुळे, 18 आॅगस्ट : मराठी सिनेमा हा इनोव्हेटिव्ह पद्धतीने प्रमोशन करत नाही असा अनेक तज्ज्ञांचा आरोप आहे.बॉलिवूडच्या तुलनेत मराठी सिनेमे प्रमोशनमध्ये मागे पडतात असंही काही जण म्हणतात. मात्र कधी कधी जुन्याच पद्धतीचा नव्याने अवलंब करणं हे सिनेमाच्या दृष्टीने हिताचं ठरतं नक्की कसं ते जरा तुम्हीच पहा.सिनेमा पूर्ण झाला की त्याच्या प्रमोशनचं अग्नीदिव्य प्रत्येक सिनेमाला पार करावं लागतं. सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यासाठी शक्य ते सारं करताना आपण स्टार्सना पाहतो, त्यासाठी जेवढी वापरता येतील तेवढी माध्यमं वापरण्याचा प्रेक्षकांचा प्रयत्न असतो. पण यातही काही कलाकार हे थोडासा वेगळा विचार करतात आणि त्याचा फायदा सिनेमाला होतो. असाच काहीसा हटके विचार केला तो अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने. नुकत्याच रिलीज झालेल्या तिच्या कच्चा लिंबू या सिनेमाच्या निमित्ताने तिने चक्क काही पत्रं लिहिली.

खरं तर पत्र लिहिणं हे आजच्या काळात आऊटडेटेड समजलं जातं. मात्र सो कूल सोनालीने याबाबतीत थोडासा हटके विचार केला. सिनेमाच्या प्रक्रियेत सोबत काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबाबत मनाला भावलेल्या गोष्टी तिनं पत्रातून व्यक्त केल्या. कच्चा लिंबूमध्ये तिने शैला काटदरेची व्यक्तिरेखा साकारलीय. याच सिनेमात तिच्या सोबत काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबाबत मनाला भावलेल्या गोष्टी तिनं या पत्रातून मांडल्या. सिनेमातले सोनालीचे सहकलाकार, बच्चूच्या भूमिकेतला मनमित, काटदरेंच्या भूमिकेतला रवी जाधव, पंडितांची भूमिका करणारा सचिन खेडेकर, सिनेमाचा दिग्दर्शक प्रसाद ओक, लेखक चिन्मय मांडलेकर, सिनेमेटोग्राफर अमलेंदु चौधरी आणि कला दिग्दर्शक संतोष फुटाणे या सगळ्यांबद्दलच्या भावना तिने या पत्रांमधून व्यक्त केल्या. ही पत्रं या सिनेमाच्या संपूर्ण प्रमोशनमधला हायपॉईंट ठरली.पण पत्र लिहून सिनेमाचं प्रमोशन करणारी सोनाली ही काही एकमेव अभिनेत्री नाही. तिच्याआधी पिंक हा सिनेमा रिलीज होण्यापूर्वी बिग बी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या दोन्ही नाती नाव्या आणि अाराध्याला उद्देशून लिहिलेलं पत्र तुम्हाला आठवतच असेल. या पत्रातून बिग बींनी मुलींना जगण्यासाठी हे जग थोडं अवघड असलं तरीही तुम्ही तुमच्या मनाला वाटेल तसं जगा आणि माझ्यापेक्षा मोठं नाव कमवा असं आवर्जून सांगितलं होतं. हे पत्र बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय ठरलं आणि त्याचा अप्रत्यक्ष फायदा सिनेमाला मिळाला.आज अमिताभ सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असले तरीही त्यांचं पत्रांबद्दलचं प्रेम अजूनही कमी झालेली नाही. आजही जेव्हा जेव्हा त्यांना एखाद्या अभिनेत्याची भूमिका आवडते तेव्हा ते त्याला आवर्जून पत्र पाठवून त्याचं कौतुक करतात. कंगना राणावतला क्वीनसाठी, रणदीप हुडाला सरबजीतसाठी, प्रियांका चोप्राला मेरी कॉमसाठी, रणवीर सिंगला बाजीराव मस्तानीसाठी आणि आयुष्यमान खुरानाला 'दम लगा के हयशा' या सिनेमातल्या भूमिकांसाठी बिग बींनी खास पत्र लिहून त्यांचं कौतुक केलं होतं. यातल्या अनेकांनी ही पत्र आज फ्रेम करून घरातल्या भिंतीवर लावली असतील हे काही वेगळं सांगायला नको.प्रमोशनसाठी वापरली जाणारी पत्रं फक्त सिनेमातच नाही तर टीव्हीवरच्या प्रेक्षकालाही सेंटी करतात. चला हवा येऊ द्या या शोमध्ये अरविंद जगताप यांनी लिहिलेली पत्र प्रेक्षकांपासून ते आलेल्या पाहुण्यांपर्यंत सगळ्यांना हसता हसता कधी रडवतात ते कळतही नाही. आजवर अनेक पाहुणे या शोमध्ये येऊन ही पत्र ऐकून हळवे होऊन परत गेलेत.थोडक्यात काय तर प्रमोशन आणि त्यासाठी लिहिली जाणारी पत्र हा कायमच एक हिट फंडा ठरलाय. सोशल मीडियाचा पसारा कितीही वाढला आणि कुणीही कितीही स्वतःच्या कोशात जगायला लागलं तरीही शब्दांनी मिळणारं समाधान दुसऱ्या कोणत्याही माध्यमातून मिळत नाही हेच खरं.

Trending Now