अखेर नायडूंचं घोडं गंगेत न्हालं...

 नायडू आणि कोविंद विजयी झाल्यास पहिल्यांदाच देशाच्या तिन्ही संवैधानिक प्रमुखपदी उजव्या विचारांचे शिलेदार विराजमान झाल्याचं बघायला मिळणार आहे. प्रादेशिक समतोलाचं बोलायचं झालं तर भाजपने राष्ट्रपती पदासाठी उत्तरेचा आणि उपराष्ट्रपती पदासाठी दक्षिणेचा उमेदवार देऊन पहिल्यांदाच दक्षिण भारतीयांना खुश करण्याचा प्रयत्न केलाय. असं म्हणायला काहीच हरकत नाही.

Chandrakant Funde
कौस्तुभ फलटणकर, नवी दिल्लीकेंद्रात भाजप सरकार सत्तेत आल्यापासून म्हणजेच 2014 सालापासून सोमवार हा कदाचित पहिलाच असा दिवस असेल की त्यादिवशी भाजपचं बीट कव्हर करणारे पत्रकार खऱ्या अर्थी आनंदी झाले असतील. किंबहुना भाजप पार्लमेंटरी बोर्डाची बैठक सुरु झाल्यावरच नायडू यांचे नाव उपराष्ट्रपतीपदी घोषित व्हावे, यासाठी नायडू यांच्या पेक्षा भाजप 'कव्हर' करणाऱ्या पत्रकारांनीच जास्त प्रार्थना केली असणार. की नायडूंनाचीच उमेदवारी जाहीर व्हावी, कारण मोदी-शहा ही जोडगोळी तमाम पत्रपंडितांना त्यांच्या अंदाजाबाबत प्रत्येकवेळी तोंडावर पाडत होती.आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा एखाद्या नियुक्तीच्या बातम्या दिल्या गेल्या (अर्थात ज्याची पुष्टी ही भाजपाच्याच वरिष्ठ नेत्यांनीच केलेली असायची) त्या सगळ्या खोट्या ठरल्या होत्या. किंबहुना पत्रकारांना तोंडघशी पडण्यात मोदी- शाह या जोडगोळी वेगळीच गंमत्त वाटते की काय ? इथपर्यंत ही चर्चा सुरु झाली होती. त्याचा दुसरा पैलू म्हणजे ज्याचे नाव मीडियात आले त्याला हटकून मोदी - शाह पदं देत नाहीत, का काहिसा असाच संदेश दिला जायचा. आधी नितीन पटेल आणि राष्ट्रपती निवडणुकीत थावरचंद गहलोत प्रकरणाने अनेकांची तोंड पोळली होती. त्याचाच परिणाम म्हणून उपराष्ट्रपति निवडणुकीसाठी एकही संभाव्य नाव मीडियाने दिले तरी भाजपा नेत्यांनी पोटातले ओठावर येऊ दिलं नव्हतं. पण सोमवार त्याला अपवाद राहिला. एवढीच काय ती यावेळची जमेची बाजू राहिली.

संसद अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रपती पदासाठी मतदान सुरु असतानाच दुपारी बारा वाजता व्यंकय्या नायडू उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार राहणार, ही कुजबुज भाजपा खासदारांमधे आणि वरिष्ठ नेत्यांमधे सुरु झाली. बघता बघता ही बातमी संपूर्ण संसद परिसरात पसरली आणि टीव्ही वर झळकायला देखील लागली. पण औपचारिक घोषणा मात्र, भाजपच्या संसदिय बोर्डाच्या बैठकीनंतरच झाली. थोडक्यात कायतर मोदी-शहांनी यावेळी कोणतंही धक्कातंत्र वापरलं नाही. ही अनेकांसाठी समाधानाची बाब राहिली.उपराष्ट्रपतीपदासाठी व्यंकय्या नायडूच का ?उपराष्ट्रपती पदासाठी अगदी सुरवतीपासून नायडु स्वतः इच्छुक होते, पण त्यांच्या शिवाय नजमा हेपतुल्ला यांची सुद्धा इच्छा लपून राहिली नव्हती. राष्ट्रपती उत्तरेचा तर उपराष्ट्रपती दक्षिणेचा कारायचा झाल्यास महाराष्ट्रचे राज्यपाल विद्यासागर राव यांची लॉटरी लागू शकते असाही एक अंदाज होता. पण राज्यसभेत एनडीएचं सरकार 2018सालापर्यंत अल्पमतातच राहणार आहे, अशातच उपराष्ट्रपती जे राज्यसभेचे सभापती असतात ते अनुभवी आणि मोदींचे विश्वासू असावेत, असं प्रारंभीपासून भाजपला वाटतं होतं. म्हणूनच कदाचित व्यंकय्या नायडू यांच्या इतका दुसरा उत्तम पर्याय भाजपकडेही नव्हता. तसंही उपराष्ट्रपती हमीद अन्सारी हे सभापतीपदी असताना त्यांनी घेतलेल्या ताठर भूमिकेमुळे राज्यसभेत सरकारवर अनेकदा नामुष्कीची वेळ आली आहे.उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएच्या बाजूचं संख्याबळ बघता व्यंकया नायडू यांचा विजय जवळपास निश्चित आहे. दोन्ही सभागृहाचे मिळून 393 मतं उमेदवाराला विजयासाठी हवे आहेत तर आजच्या घडीला एनडीएकडे तब्बल 444 मतांचं संख्याबळ आहे. त्यामुळे तशीही नायडूंना विजयासाठी फारशी कसरत करावी लागणार नाहीये. नायडु आणि कोविंद विजयी झाल्यास पहिल्यांदाच देशाच्या तिन्ही संवैधानिक प्रमुखपदी उजव्या विचारांचे शिलेदार विराजमान झाल्याचं बघायला मिळणार आहे. प्रादेशिक समतोलाचं बोलायचं झालं तर भाजपने राष्ट्रपती पदासाठी उत्तरेचा आणि उपराष्ट्रपती पदासाठी दक्षिणेचा उमेदवार देऊन पहिल्यांदाच दक्षिण भारतीयांना खुश करण्याचा प्रयत्न केलाय. असं म्हणायला काहीच हरकत नाही.

Trending Now