सेलिब्रिटींच्या लग्नाची गोष्ट!

अगदी अलिकडचं लग्न म्हणजे करिना कपूर आणि सैफ अली खान. प्रेमात आकंठ बुडालेली ही जोडी. भारतातच हे लग्न मोठ्या शाही पद्धतीनं झालं. मेहंदी, संगीत सगळ्या पारंपरिक पद्धती वाजतगाजत झाल्या.

Sonali Deshpande
सोनाली देशपांडे, प्रतिनिधी, न्यूज18लोकमतसध्या मीडियात गुजरात निवडणुकीनंतर एकच चर्चा आहे. ती म्हणजे विराट आणि अनुष्का यांच्या लग्नाची. त्यांनी एकमेकांना पाहिलं, त्यांनी जिंकलं इथपासून ही प्रेमकहाणी सुरू झाली होती. लोक त्याबद्दल चर्चा करत होते. अखेर आता इटलीत दोघं विवाहबंधनात अडकलेही. त्यांनी कुठल्या हाॅटेलमध्ये लग्न केलं, त्यांचे पोशाख कोणी डिझाईन केले, खर्च किती आला अशा सगळ्या बातम्या आल्या.

परदेशात लग्न करणारं आणखी एक जोडपं म्हणजे राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा. हे लग्न तसं गुंतागुंतीचं. कारण दोघांचं अफेअर सुरू झालं तेव्हा आदित्य विवाहित होता. त्याची बायको काही त्याला घटस्फोट देत नव्हती. मग एक दिवस त्याच्या आदित्यच्या घटस्फोटाची बातमी आली आणि त्या पाठोपाठ राणी-आदित्यनं इटलीत लग्न केलं, हे सोशल मीडियावर घोषित केलं गेलं.अगदी अलिकडचं लग्न म्हणजे करिना कपूर आणि सैफ अली खान. प्रेमात आकंठ बुडालेली ही जोडी. भारतातच हे लग्न मोठ्या शाही पद्धतीनं झालं. मेहंदी, संगीत सगळ्या पारंपरिक पद्धती वाजतगाजत झाल्या. अख्खं बाॅलिवूड त्यात सामील झालं होतं. सगळं कसं बिनधास्त आणि बेधडक होतं.  करिनानं आपला धर्म बदलला नाही. तसा दबावही तिच्यावर सैफच्या घरच्यांनी टाकला नाही. ताजमहल हाॅटेलमध्ये लग्न झालं तेही अनोखं. कसलेच विधी न करता दोघांनी फक्त शपथा घेतल्या. एकमेकांची साथ कधीच न सोडण्याच्या. त्याआधी लग्न कोर्टात जाऊन रजिस्टरही केलं होतं.अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचं लग्नही असंच चर्चेतलं. अर्थात ते झालं मुंबईत जलसावर. बच्चन कुटुंबातल्या या लग्नाच्या कथाही सुरस आणि सुरम्य आहेत. ऐश्वर्या आणि अभिषेक 'जस्ट फ्रेंडस्' होते. तेव्हा ऐश्वर्या सलमानमध्ये गुंतली होती, तर अभिषेकचा साखरपुडा करिष्माशी झालेला. पण दोघांचीही नाती तुटली. मग गुरू, उमराव जान, धूम 2 या सिनेमांनी दोघांना जवळ आणलं आणि गुरूच्या सेटवरच अभिषेकनं अॅशला प्रपोझ केलं. नकाराचा तर प्रश्नच नव्हता. पण एक मोठी अडचण होती. ऐश्वर्याला मंगळ आहे, असं ज्योतिषानं सांगितलं. आणि त्याच्याच सल्ल्यानुसार तिचं आधी पिंपळाच्या झाडाशी लग्न लावलं. म्हणजे आता अभिषेक सेफ! असो. 20 एप्रिल 2007 ला बच्चन कुटुंबातलं हे लग्न म्हणजे टाॅक आॅफ द टाऊन होतं. कसलीच गुप्तता न बाळगता वाजत गाजत हे लग्न झालं. बरेच दिवस मीडियासाठी हा विषय होता.बाॅलिवूडमध्ये बरीच लग्नं गाजली. बरीच लग्न धक्का देऊन गेली. श्रीदेवी आणि बोनी कपूर यांचं लग्नही असंच गाजलं. श्रीदेवी आणि बोनी कपूर भेटले ते मि. इंडियाच्या सेटवर. त्याच वेळी दोघं एकमेकांच्या प्रेमात होते. पण कुणीच ते व्यक्त करत नव्हतं. त्यात बोनी कपूरला बायको आणि दोन मुलंही होती. त्यावेळी श्रीदेवीचे वडील वारले. आणि बोनीनं श्रीदेवीला मानसिक आधार दिला. अगदी तिची आई आजारी असताना बोनी कपूरनं बरीच धावपळ केली. 1993ला बाॅम्बस्फोट झाले. शहरात तणाव होता. त्यावेळी काही काळ श्रीदेवी बोनी कपूरच्या घरी राहिली. तिला बोनी कपूरपासून दिवस गेले. मग दोघांकडे लग्न करणं हाच पर्याय होता. लग्न झालं पण बोनी कपूरचा घटस्फोट होईपर्यंत ते कमालीचं गुप्त ठेवलं गेलं.असंच एक लग्न हेमामालिनी आणि धर्मेंद्रचं. तेही त्या काळी खूप गाजलं. कारणही असंच होतं. हेमामालिनी दाक्षिणात्य आणि धर्मेंद्र पंजाबी. त्यात धर्मेंद्र विवाहीत आणि दोन मुलांचा बाप. हेमामालिनीच्या आईवडिलांचा या लग्नाला ठाम विरोध. हेमामालिनीच्या वडिलाच्या निधनानंतर दोघं एकत्र राहायला लागले. हे हेमामालिनीच्या आईला फारसं आवडलं नाही. धर्मेंद्रची बायको काही घटस्फोट द्यायला तयार नव्हती. मग दोघांनी इस्लाम धर्म स्वीकारला आणि गुपचूप निकाह केला. नंतर अय्यंगार पद्धतीनंही दोघांचं लग्न लागलं.असंच एक धक्का देणारं लग्न. ते म्हणजे सुनील दत्त आणि नर्गिस. नर्गिस आणि राज कपूरच्या अफेअरची चर्चा त्यावेळी मोठी होती. पण राज कपूर आपलं कुटुंब सोडून नर्गिसकडे यायला तयार नव्हता. नर्गिस एकटी पडली. प्रेमभंगानं व्याकुळ झाली. अशाच वेळी मदर इंडियाच्या सेटवर सुनील दत्तनं तिला मानसिक आधार दिला. दोघं प्रेमात पडली. सेटवर लागलेल्या आगीतून सुनील दत्तनं तिला वाचवलं. आणि एक अनोखी प्रेमकहाणी सुरू झाला. नर्गिस सुनील दत्तहून वयानं मोठी होती. मदर इंडियात सुनील दत्त तिचा मुलगा होता. त्यामुळे सिनेमा रिलीज होऊन यशस्वी होईपर्यंत त्यांनी आपल्या नात्यांबद्दल कोणालाच काही सांगितलं नाही. 1958मध्ये दोघांनी लग्न केलं आणि जगजाहीर केलं.स्टार्स, सेलिब्रिटी खरं तर तुमच्या आमच्यासारखीच माणसंच. त्यांच्या भावभावनाही माणसांसारख्याच. फक्त फरक असतो तो त्यांची लाईफ स्टाइल आणि लोकप्रियता. त्यामुळे या ग्लॅमरस जगात नाती उधळ असतात, हा समज या यांच्यासारखा अनेकांनी खोटा ठरवलाय. अनेक जणांनी आपल्या फॅन्ससाठी त्यांची नाती आदर्श ठरवलीयत. या जोड्यांची ही सुरस आणि सुरम्य लग्न नेहमीच स्मरणात राहतील, हे नक्की.

Trending Now