पागोट्याखाली दडलंय काय?

शरद पवारांनी पगडी नाकारून पागोटं स्वीकारणं हा त्यांच्या भविष्यातील राजकारणाचा स्पष्ट संकेत आहे. प्रतिकांनी बांधल्या गेलेल्या समाजापर्यंत त्यातला सुचक अर्थ पोहोचला नसेल तरच नवल. कारण प्रतिकं वापरून समाजाला भुलवण्याचा राजकीय खेळ आपल्या देशात काही नवा नाही.

Ajay Kautikwar
विलास बडे, प्रतिनिधी न्यूज18 लोकमतशरद पवारांनी पगडी नाकारून पागोटं स्वीकारणं हा त्यांच्या भविष्यातील राजकारणाचा स्पष्ट संकेत आहे. प्रतिकांनी बांधल्या गेलेल्या समाजापर्यंत त्यातला सुचक अर्थ पोहोचला नसेल तरच नवल. कारण प्रतिकं वापरून समाजाला भुलवण्याचा राजकीय खेळ आपल्या देशात काही नवा नाही. ञिशूळ ते शिवबंधन अशी हुकमी प्रतिकं असो की, वेगवेगळ्या रंगाचे झेंडे, टोप्या त्या कुठल्याना कुठल्या वर्गाची ओळख असतात. त्याच्या भोवती लोकांचा अभिमान,अस्मिता जोडलेली असते. राजकीय नेते त्याचं ग्लॅमरायझेशन करतात. कारण पुढे त्याच प्रतिकांचा राजकीय हत्यार म्हणून वापर करणं सोईचं ठरतं. शरद पवारांनीही पागोट्याला एक राजकीय हत्यार म्हणूनच वापरलंय.आजवर असंख्येवळा पगडी मिरवणाऱ्या पवारांना अचानक पागोटं आपलंस वाटणं ही निवडणुकीची चाहूल आहे. त्यातून त्यांनी राज्यातील ओबीसींना चुचकारलंय हे उघड आहे. मराठा समाजाच्या महामोर्चांनी सरकारविरोधी वातावरणनिर्मिती झाली. त्यात राष्ट्रवादीनं मायलेज घेण्याचा अटोकाट प्रयत्न केला. पण केवळ मराठा समाजाच्या पाठिंब्यावर सत्तेचा सोपान सर करणं सोप्पं नाही, याची पवारांना जाणीव आहे. त्यामुळे बहुजन म्हणत ओबीसींना जवळ घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. कारण ओबीसींच्या मोठ्या पाठबळानंच भाजप सत्तेत पोहोचला. त्याची भाजपइतकीच पवारांनाही जाणीव आहे.

खरंतर प्रत्येक छोट्यातल्या छोट्या जातीला आपलं राजकीय आणि सामाजिक अस्तित्व आणि ओळख हवी असते. समाजाची म्हणून एक महत्वाकांक्षा असते. त्यांना राजकीय वाटा हवा असतो. पण लोकशाहीत मतांची संख्या तुमची ताकद ठरवते. ताकदीवर वाटा ठरतो. त्यामुळे छोट्या छोट्या जातींना अस्तित्वापासून राजकीय वाट्यापर्यंत सगळीकडे संघर्ष करावा लागला. पण मंडल आयोगानंतर अठरापगड जातींची ओबीसी नावाची राजकीय आणि सामाजिक जात जन्माला आली. राजकारण्यांसाठी ती वोट बँक बनली. त्यातून मुलायमसिंग यादव, लालुप्रसाद यादव, गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ यांच्यासारखे अनेक ओबीसी नेते देशाच्या राजकीय पटलावर नावारुपाला आले.गोपीनाथ मुंडेंच्या नेतृत्वाखाली भाजपनं राज्यात माळी धनगर वंजारींचा  'माधवं' प्रयोग केला. त्यामुळे भाजपला राज्यातल्या अठरापगड जातीत जनाधार मिळाला. सत्ताही मिळाली. आज मुंडे, फुंडकर हयात नाहीत. खडसे सत्तेतून बाहेर आहेत तर पंकजा मुंडेंना कॉर्नर केलं जात असल्याची भावना ओबीसींच्या मनात आहे. खडसेंनी हीच ओबीसी खदखद जाहीरपणे बोलून दाखवल्यानं भाजपची चिंता वाढणं स्वाभाविक आहे.संघाच्या विचारधारेवर आणि मोदी शहांच्या शब्दावर काम करणाऱ्या सरकारमध्ये राहून ओबीसी राजकारण करण्याला अनेक मर्यादा आहेत. पण तरीही महत्वाकांक्षी असलेल्या पंकजा मुंडेंनी कृतीतून आपल्या भविष्याच्या राजकारणाचे स्पष्ट संकेत दिलेत. ग्रामविकास मंञालयाच्या माध्यमातून आरण, चौंडी, सावरगाव, मोहटादेवी, पोहरादेवी अशा ओबीसींमधील मोठ्या भागीदार समाजाचं प्रतिक असलेल्या तिर्थस्थळांना कोट्यधींचा निधी देत त्यांना आपलंस करण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय. भगवानगडाचा वादही ओबीसींच्या प्रतिकात्मक लढ्याचाच एक भाग होता. त्यानंतर सावरगावात घेतलेला लाखोंचा मेळावा हे पंकजा मुंडेंचं ओबीसी शक्तीप्रदर्शन होतं.आपला ओबीसी बेस हलू नये यासाठी भाजपकडूनही प्रयत्न सुरु झालेत. गुजरातमध्ये हिंदुत्वावर निवडणूका लढवल्या गेल्यानं मोदी ओबीसी आहेत हे कधी समोर आलं नाही. पण देशाच्या राजकारणात येताच मोदींनी त्यांच्या ओबीसी असण्याचं पुरेपूर भांडवल केलं. पूर्वाश्रमीचं चहा विकण्याचं काम आणि मागास जातीत झालेला जन्म वारंवार सांगून देशातील मोठ्या वर्गाला मी तुमच्यातला आहे हे त्यांच्या मनावर बिंबवलं. तर तिकडे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी दिल्‍लीतल्या तालकटोरा स्‍टेडियमधील ओबीसी संमेलनात  संख्येनुसार प्रतिनिधीत्व देण्याचा ओबीसींना शब्द दिला. म्हणजे 2019 च्या तोंडावर ओबीसींना आपलंसं करण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न आहे.ओबीसी समुहांची अस्मिता प्रतिकांशी निगडीत आहे की जगण्या मरण्याच्या रोजच्या प्रश्नांशी या प्रश्नाचंही ऊत्तर राजकीय पक्षांना शोधावं लागेल. सत्ताधारी आणि विरोधकांना ओबीसी प्रेमाचे भरते येत असलं तरी ओबीसींच्या जातवार जनगननेसाठी कुठलाही राजकीय पक्ष आग्रही भुमिका मांडताना दिसत नाही.खरंतर पागोट्याला कधीच सरंजामी किंवा विद्वत्तेचं प्रतिक मानलं गेलं नाही. ते कायम वंचित बहुजनांचं प्रतिक राहिलंय. पण सत्तेसाठी लागणारं संख्यात्मक बळ त्याच्या खाली दडल्यानं त्याची सामाजिक नसली तरी राजकीय महत्ता वाढलीय हे नक्की. पवारांनी एक पाऊल पुढे टाकत पगडीची भीती दाखवत ब्राम्हणेत्तरांना पागोट्याखाली आणण्याचा पद्धतशीर प्रयत्न केलाय, तर कुणबी आणि तेली समाजाच्या मेळाव्यात मुख्यमंञ्यांनीही ओबीसींना चुचकारण्याचा प्रयत्न केलाय.कारण मराठा समाजाच्या नाराजीनंतर भाजपला ओबीसी दूर जाणं परवडणारं नाही. एकूणच काय तर पागोट्याखाली दडलेली सत्तेची चावी सगळ्यांनाच हवी आहे. पण विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काहीतासातच घाईघाईंनं भाजपला न मागता पाठिंब्याची पगडी घालणारे पवार आज पागोट्याच्या मागे का लागलेत? तरूंगवासात असलेल्या भुजबळांना वाऱ्यावर का सोडलं होतं? मराठ्यांचा पक्ष ही प्रतिमा बदलण्यासाठीचा हा प्रयत्न नाही ना? असे अनेक प्रश्न पागोट्याखालच्या डोक्यांना पडले आहेत.

Trending Now