बीएमसी, मलिष्का आणि डेंग्यूच्या अळ्या...

मलिष्काच्या बाल्कनीतल्या कुंड्यांमध्ये डेंग्यूच्या अळ्या सापडताच बीएमसीनेही मोठा गड जिंकल्याच्या थाटात मलिष्काच्या कुटुंबियांना कारणेदाखवा नोटीस धाडली. पण बीएमसीच्या या कारवाईचं कौतुक होण्याऐवजी त्यांच्या हेतूवर शंका घेतली गेली. कारण कारवाईचं 'टायमिंग' हे निश्चितच मलिष्काच्या पथ्यावर पडणारं होतं. आणि झालंही तसंच.

Chandrakant Funde
चंद्रकांत फुंदे, मुंबईऔरंगजेबाच्या सैन्याच्या घोड्यांना जसे जळी स्थळी संताजी धनाजी दिसायचे तसंच आता बीएमसी प्रशासनालाही जिथं तिथं आर. जे. मलिष्काच दिसतेय काहिशी अशीच परिस्थिती शिवसेनेनं या वादाच्या निमित्ताने स्वतःवर ओढून घेतलीय. कारण बीएमसीने चक्क मलिष्काच्या घरातल्या डेंग्यूच्या अळ्या शोधून काढल्यात. खरंतर मुंबईतील उच्चभ्रूंच्या बाल्कनीतील कुंड्यांमध्ये डेंग्यू डासाच्या अळ्या सापडण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये. तशाच पद्धतीने मलिष्काच्या घरातल्या कुंड्यांमध्येही डेंग्यूच्या अळ्या सापडल्या असतीलही....पण मग बीएमसीने नेमकी आत्ताच का मलिष्काच्या घरावर अळ्या शोधण्यासाठी धाड का टाकली असावी? हा प्रश्न अनेकांना पडलाय....तर मुंबईकरांनो त्याचं उत्तर अगदी साधं-सोपं आणि सरळ आहे. मलिष्काचं गाणं शिवसेनेला झोंबल्यामुळेच केवळ सुडबुद्धीपोटी बीएमसीने ही कारवाई केलीय, हे शेमडं पोरगंही सांगेल.

बीएमसीच्या काही अतिउत्साही अधिकाऱ्यांनी मग थेट मलिष्काची आई राहत असलेली बांद्र्यातली सोसायटी गाठली आणि डेंग्यूच्या अळ्यांचा शोध सुरू केला. सेनेच्या कर्मधर्मसंयोगाने मलिष्काच्या बाल्कनीतल्या कुंड्यांमध्ये डेंग्यूच्या अळ्या सापडल्या देखील. बीएमसीनेही मग मोठा गड जिंकल्याच्या थाटात मलिष्काच्या कुटुबियांना कारणेदाखवा नोटीस धाडली. पण बीएमसीच्या या कारवाईचं कौतुक होण्याऐवजी त्यांच्या हेतूवर शंका घेतली गेली. कारण कारवाईचं 'टायमिंग' हे निश्चितच मलिष्काच्या पथ्यावर पडणारं होतं. आणि झालंही तसंच. विरोधकांसह प्रसारमाध्यमांनीही मग पुन्हा मलिष्काचं तेच गाणं दाखवून शिवसेनेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. नितेश राणेही शिवसेनेला डिवचण्यासाठी मलिष्काचा 'बिन बुलाया' भाऊ म्हणून धावून आले. तशा आशयाचं ट्विटच त्यांनी केलं. मनसेच्या संदीप देशपांडेंनी तर बीएमसीच्या हेतूवरच शंका उपस्थित केली, खरंच मलिष्काच्या घरी अळ्या सापडल्यात का ? हे तपासलं पाहिजे, अशी मागणी त्यांनी केलीय. शिवसेनेनं अर्थातच या कारवाईचं समर्थन केलंय. पण त्यांचं लंगड समर्थन या घडीला तरी कोणीच ऐकूण घेण्याच्या मनस्थितीत नाहीये. कारण सद्यपरिस्थितीत तरी मुंबईकरांची सहानूभूती ही मलिष्कालाच मिळतेय. कारण तिने बीएमसीच्या मर्मावरच बोट ठेवलंय. म्हणूनच अगदी मलिष्काच्या अंदाजामध्येच बोलायचं झालं तर 'शिवसेना, तुला स्वतःच भरोसा नाय काय ? असंच इथं खेदानं नमूद करावसं वाटतंय.

Trending Now