चित्रपटांचा 'मूक'नायक!

16 एप्रिल 1889ला सिनेमातल्या एका वादळाने जन्म घेतला. चार्ली चॅपलिन म्हणजेच चार्ल्स चॅपलिन हे वादळ तसं शांतच. 'SILENT MOVIES' चा एक काळ गाजवलेल्या या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा आज जन्मदिन.

Sonali Deshpande
चित्राली चोगले, प्रतिनिधी, न्यूज18लोकमत16 एप्रिल 1889ला सिनेमातल्या एका वादळाने जन्म घेतला. चार्ली चॅपलिन म्हणजेच चार्ल्स चॅपलिन हे वादळ तसं शांतच. 'SILENT MOVIES' चा एक काळ गाजवलेल्या या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा आज जन्मदिन. या दिवशी त्यांच्या अनेक सिनेमांची पर्वणी अनेक चॅनल्सवर पहायला मिळते. पण चार्ली चॅपलिन यांचे सिनेमे फक्त त्यांच्या जन्मदिनी पहावे असे नसून त्यांचा आस्वाद कधीही घेण्यासारखे आहेत. आजच्या दिवशी त्यांच्या अजरामर सिनेमांपैकी ऑल टाइम फेवरेट अशा 5 हिट सिनेमांची ही खास आठवण.चार्ला चॅपलिनचा कुठलाही सिनेमा म्हणजे एक पर्वणीच. सायलेन्ट सिनेमांच्या काळात त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आणि पुढे जे झालं तो इतिहासच आहे. त्यांनी त्यांच्या सगळ्या सिनेमांमध्ये फक्त अभिनेता म्हणून काम नाही केलं तर त्यांचं दिग्दर्शनही चॅपलिन यांचंच असे. त्यांचे 11 अतिशय गाजलेले फिचर सिनेमे रिलीज झाले. पण त्यांच्या या अतिशय हिट सायलेन्ट सिनेमांपैकी 5 सिनेमे हे थोडे उजवे ठरतात आणि माझ्या मते ते कोणीही कधीही आणि कितीही वेळा पाहू शकतात तेही तितक्याच नवलाईने.

तर यात पहिला सिनेमा अर्थातच आहे 'द किड' .याच सिनेमाने चार्ली यांच्या सिनेमाच्या या अभूतपूर्व प्रवासाची सुरुवात झाली. इथेच तो पाया रचला गेला आणि हा सिनेमा घडून आला. चार्ली यांचा हा पहिला फिचर सिनेमा. त्यांचा सगळ्यात बेस्ट सिनेमा हाच ठरतो. 1920 साली असलेली गरिबी हा सिनेमा टिपताना दिसतो. चॅपलिन यांचं ट्रॅम्प हे कॅरेक्टर इथेच पहिल्यांदा लोकांच्या भेटीला आलं आणि आजही ते तितकंच लोकप्रिय आहे. छोटीशी मिशी काळा सुट आणि चॅपलिनची ती सिग्नेचर हॅट बुट काठी एक प्रकारची ओळख होऊन बसली. या सिनेमातला ट्रॅम्प गरिबीत दिवस काढत असतो आणि अचानक एक छोटंसं बाळ त्याच्या आयुष्यात येतं. आईने टाकलेल्या या बाळाची काळजी आपण घ्यावी असा निर्धार हा ट्रॅम्प करतो आणि त्याचं नाव जॉन ठेवतो. असं करत त्या मुलाशी जोडला जातो.सगळं सुरळीत सुरु असताना मध्येच येतो एक ट्विस्ट. 5 वर्ष या मुलासोबत राहिल्यावर अचानक अमेरिकेतल्या चाईल्ड सर्विसेसना या अवैध मुलाबद्दल कळतं आणि ते जॉनला अनाथ आश्रमात पाठवण्यासाठी येतात. इथेच सुरू होतो या ट्रॅम्पचा आणि सिनेमाचा एक खडतर प्रवास, या दोघांचा एकत्र येण्याचा आणि समाज त्यामध्ये कसा आड येतो याचा. हा संपूर्ण प्रवास जितका त्रासदायक आणि दुःखी आहे तितकाच सिनेमाचा शेवट सुखावणारा देखील. शेवटाकडे जाताना सिनेमा रंजक राईड ठरत मनात घर करून जातो.या लिस्टमध्ये दुसरा सिनेमा आहे 'द ग्रेट डिक्टेटर'.  चॅपलिनचा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा म्हणजे हाच. 1940 साली आलेल्या या सिनेमात अडॉल्फ हिटलरची असलेलं आपलं साम्य चॅपलिन यांनी वापरायचं ठरवलं. शिवाय हिटलरच्या हुकुमशाहीवर टीका करण्याचाही त्यांचा एक प्रांजळ आणि सफल प्रयत्न हा सिनेमा होता. या सिनेमात एका युरोपियन देशाच्या डिक्टेटरची आणि त्यांच्यासारख्या दिसणाऱ्या न्हाव्याची भूमिका चॅपलिन यांनी साकारली आहे. सिनेमात एका क्षणी या न्हाव्याला त्या डिक्टेटरच्या वेषात येण्याची परिस्थिती निर्माण होते आणि भाषण द्यायची वेळ त्याच्यावर येते. सिनेमा सायलेन्ट असताना देखील या भाषणाला मात्र सिनेमात आवाज दिला आहे आणि हेच भाषण म्हणजेच ही सोलोलुकी. आजतागायत सगळ्यात उत्तम सोलोलुकी म्हणून आठवणीत रहाते.या यादीतला तिसरा सिनेमा आहे 1925 साली रिलीज झालेला 'द गोल्ड रश'. सिनेमातला चार्ली यांचा ट्रॅम्प तर एकदम धमाल रंगला. सिनेमात चॅपलिन व्यतिरिक्त अजून दोन मुख्य पात्र आहेत जीम आणि ब्लॅक. या तिघांचा सोनं शोधण्याचा एक प्रवास सिनेमात दाखवला गेलाय. अतिशय थंडी असताना चार्ली, ब्लॅक आणि जीम सोन्याची खाण शोधत एका खाणीजवळ येतात आणि त्यातून कसेबसे बाहेर पडतात. तिथे असताना मात्र उपासमार झाली असताना धमाल प्रसंग घडून येतात. हे प्रसंग हे सीन्स आजही त्यातल्या मार्मिक कॉमेडी टायमिंगसाठी लक्षात रहातात.सिनेमात पुढे त्या थंडीतून आणि त्या एका केबीनमधून बाहेर आल्यावर नेहमीचं आयुष्य जगताना हा ट्रॅम्प जॉर्जिया नावाच्या डान्सरला भेटतो. त्या दरम्यान अशी परिस्थिती निर्माण होते की चार्ली यांचा एक डान्स सिक्वेन्स पहायला मिळतो. हा सिक्वेन्स इतका गाजला की प्रेक्षक सिनेमा पहाताना तो रिवाईंड करायला सांगून या डान्स सिक्वेन्सचा अनेकदा पुन्हा पुन्हा आस्वाद घेत असत. तर या गॉर्जियाचं प्रेम,चार्लीला सोनं मिळणं, या दोघांची ताटातूट वगैरे ट्विस्ट होऊन गोड शेवटाने सिनेमाची रंजक राईड घडून येते.या लिस्टमधला चौथा सिनेमा आहे 1936 साली आलेला 'मॉर्डन टाइम्स'. 1930चा ग्रेट डिप्रेशनचा काळ या सिनेमात चोख आणि मार्मिक पद्धतीने टिपला गेलाय. त्यावेळच्या मॉर्डन मशिनरीच्या काळात माणसांची जागा मशीन घेत असताना चार्ली यांचा ट्रॅम्प एका मोठ्या कंपनीत कामाला असतो. त्याच्यासोबत असे काही दुर्दैवी प्रसंग एकामागे एक घडत जातात आणि सिनेमा रंगू लागतो. या ट्रॅम्पची नोकरी जाते,तो जेलमधून सतत आत बाहेर करतो, शेवटी जेलमधून हिरो म्हणून सुटून येतो आणि पुन्हा बेकार म्हणून जगू लागतो,अगदी तेव्हाच त्याच्या आयुष्यात हिरॉईनची एन्ट्री होते. सिनेमात पुढे अतिशय धमाल विनोदी चढउतार येत सिनेमा रोमांचक क्लायमॅक्सपर्यंत येऊन पोहोचतो. इथे पुन्हा एकदा चार्लीला अटक होणार का असं वाटत असतानाच चार्ली आणि त्याची प्रेयसी तिथून पळ काढतात.अतिशय गोड आणि सुंदर सीनने सिनेमाचा शेवट होतो, अॅण्ड दे लिव्ह हॅपिली एव्हर आफ्टर.सिनेमांची ही लिस्ट 'सिटी लाईट्स' सिनेमाच्या नावाशिवाय अपूर्ण आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. हा सिनेमा म्हणजे चार्ली चॅपलिन यांचा सर्वात रोमॅन्टिक सिनेमा. सिनेमातला चार्ली यांचा ट्रॅम्प आणि त्याची जिंदादिली म्हणजे क्या बात! फुलं विकणाऱ्या एका अंध मुलीच्या प्रेमात पडलेला हा ट्रॅम्प आपल्याकडे काहीही नसताना या मुलीला सर्वस्व देण्यासाठी सतत झटताना दिसतो. ते सुद्धा तिला जाणवू न देता, ही गोष्ट मनाला भावून जाते. नकळत या ट्रॅम्पच्या आपणही प्रेमात पडतो. तर या अंध मुलीच्या डोळ्यांचं ऑपरेशन करण्यासाठी वाट्टेल ते करण्यासाठी त्याच्या तयारीचा मनाला हेवा वाटत रहातो. आता सिनेमातलं ट्विस्ट म्हणजे या ट्रॅम्पला भेटतो त्याला तारून नेणारा एक गर्भश्रीमंत माणूस. आता पंचाईत होते अशी की हा माणूस असतो दारुडा, जो फक्त प्यायलेला असतानाच ट्रॅम्पला ओळख दाखवतो आणि शुद्धीत असताना मात्र आपल्या मैत्रीचा विसर या माणसाला पडत असतो. या सगळ्यात चार्ली म्हटल्यावर विनोद आणि हलका फुलका सिनेमा बघायला मिळणार हे नक्कीच. हे काय वेगळं सांगायला लागणार नाही. तसंच घडत सिनेमात आपला हेतू साधण्यासाठी चार्ली टिवल्या बावल्या करत आपल्याला पुन्हा एक धमाल राईडवर घेऊन जातात. हा सिनेमा कधीही पहावा आणि तितकंच रमून जावं असाच आहे. सिनेमा पहाताना कोणाच्या चेहऱ्यावर गोड हसू आलं नाही तरच नवल.या व्यतिरिक्त त्यांचा 'मसीयर वरडू' , 'द सर्कस' हे सिनेमे सुद्धा उत्तम आहेत. पण हे पाच थोडे उजवे ठरतात एवढंच. चार्ली चॅपलिन यांचे हे सिनेमे तुम्ही पाहिले नसतील तर लगेचंच वेळ काढा आणि एक हलका फुलका धमाल अनुभव या सिनेमातून घेऊन टाका.

Trending Now