सहा नगरसेवकांची शिवसेनेला डोकेदुखी ?

उद्धव ठाकरेंची पाठ वळताच शिवसेना नगरसेवकांचे चेहरे चिंतातूर दिसू लागले. यात अर्थात चिंता होती ती स्वत:च्या भविष्याची.. ज्या सहा नगरसेवकांना शिवसेनेनं पक्षात घेतल त्यांना पक्षप्रमुखांनी काय आश्वसनं दिली ?

Sachin Salve
प्रणाली कापसे, प्रतिनिधीमनसेचे सहा नगरसेवक फोडून शिवसेनेनं राजकीय चातुर्य दाखवून दिलं. शिवसेनेच्या या खेळीनं अनेकांची बोबडी वळली यात शंका नाही. पालिकेत मनाला येईल तसा कारभार करणाऱ्या भाजपला त्यामुळे वेसन घातल्याचा आनंद शिवसैनिकांना या निमित्तानं झाला खरा...पण तो आनंद नगरसेवकांच्या चेहऱ्यावर फार काळ टिकला नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची पाठ वळताच शिवसेना नगरसेवकांचे चेहरे चिंतातूर दिसू लागले. यात अर्थात चिंता होती ती  स्वत:च्या भविष्याची.. ज्या सहा नगरसेवकांना शिवसेनेनं पक्षात घेतल त्यांना पक्षप्रमुखांनी काय आश्वसनं दिली ? त्यामुळे भविष्यासाठी आपण पाहिलेल्या स्वप्नांची राखरांगोळी तर होणार नाही ना ? ज्यांनी पुढल्या महापालिकेसाठी स्वप्न पाहिली होती त्यांना आता उमेदवारी मिळणार का? ज्या भागातले हे नगरसेवक आहेत तिथले विभागप्रमुख, शाखाप्रमुख यांच्याशी ते कसं जुळवून नेणार ? याची चिंता नगरसेवकांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत सगळ्यांना वाटू लागली आहे.हे झालं एक...दुसरं असं की, या नगरसेवकांच्या येण्यामुळे पालिकेचा गाडा हाकण्यात शिवसेनेना खरंच मदत होणार आहे का ?, की हे नगरसेवक म्हणजे निव्वळ पांढरा हत्ती बनून राहतील. गेल्या सहा महिन्यात शिवसेनेला पालिकेत सत्ता राबवता आलेली नाही. सत्तेत असूनही सहा महिन्यांत "आमची कामं झाली नाहीत...आयुक्त हे भाजपंच्या म्हणण्याप्रमाणे वागतात", 'आयुक्तांवर समित्यांच्या अध्यक्षांना, सदस्यांना अंकूश ठेवता आला नाही" अशी ओरड आहे. स्थायी, सुधार, आरोग्य, शिक्षण इतकंच काय तर सभागृहाला सुद्धा प्रशासकीय यंत्रणा भिक घालत नाही. असं स्वत: शिवसेनेचे नगरसेवक सांगताहेत. त्यात या बंडखोर सहा नगरसेवकांची भर पडलीय. ज्यात सहा पैकी चार नवे आणि दोन कट्टर मनसैनिक मानले जात होते. ज्यांनी अनेकवेळा शिवसैनिकांना मनसेसाठी अंगावर घेतलं होतं.

बंडखोर सहापैकी चार नगरसेवक पालिकेत पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत. त्यांनी आजवर पालिकेत एकदाही तोंड उघडल्याचं बघण्यात आलेलं नाही. राहिले मनसेचे माजी गटनेता आणि या फोडाफोडीचं नेतृत्व करणारे दिलीप लांडे...तर लांडे  हे त्यांच्या तडफदार भाषणांसाठी प्रसिद्ध आहेत. मजेशिर शैलित शिवसैनिकांना चिमटे काढणं आणि नंतर त्यांच्याच कार्यालयात चहा पित गप्पा मारणं हा दिलीप लांडे यांचा खाक्या आहे. त्यामुळे मामा म्हणून प्रसिद्ध असलेले लांडे आता खऱ्या अर्थी मनसेला मामा बनवून गेले आहेत. लांडेच्या शिवसेनेतल्या प्रवेशामुळे सध्या नेतृत्व करणाऱ्यांमध्ये चांगलीच अस्वस्थता निर्माण झाली आहे.लांडे यांच्या स्वभावाप्रमाणे फार कुणाचा अंकूश न मानणारे म्हणून प्रसिस्पर्धी आहेत. त्यामुळे सभागृह नेता म्हणून यशवंत जाधव यांच्यावर मोठं दडपण येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यशवंत जाधव यांनी महत प्रयत्नांनी भल्याभल्यांना आपल्या छत्राखाली सभागृहात एकत्रित आणलं आहे. आता मामा लांडे आणि त्यांचे बंडखोर पित्तू, यशवंत जाधव यांचं नेतृत्व मान्य करतील का  हा मोठा प्रश्न आहे.  इतकं करुन ही या नगरसेवकांचा फाय़दा काय तर हे मतदानाच्या वेळी फक्त हात उंचावणार. सध्या शिवसेनेला प्रत्येक प्रस्ताव संमत करण्यासाठी भाजप किंवा काँग्रेसची मनधरणी करावी लागतेय. या नगरसेवकांच्या येण्यानं ही ओढाताण थोडी  कमी होणार. पण अंमलबजाणीचा प्रश्न पुन्हा उरतोच."सध्या माहिती उपलब्ध नाही, पुढल्या बैठकीत देवू" असं उत्तर देणाऱ्या प्रशासनाची पुढची बैठक गेल्या सहा महिन्यात कधी आलीच नाही.  ती माहिती या बंडखोर नगरसेवकांमुळे शिवसेनेसमोर येणार आहे का तर नाही..आजवर जे प्रस्ताव संमत झाले त्यापैकी किती कामं प्रत्यक्षात सुरू झाली आहेत , ही काम व्हायला सुरुवात होणार आहे का तर नाही...गेल्या सहा महिन्यात सत्ताधारी नगरसेवकांना त्यांच्या विभागातले प्रश्न सभागृहात मांडता आलेले नाही. विकास आराखडा असो की, अर्थसंकल्प शिवसेनेच्या नगरसेकांचा वचक कुठेही दिसला नाही. त्यावर छाप होती ती भाजपं नगरसेवकांची..ती छाप बदलता येणार आहे का ? आयुक्तांवर नसलेला वचक या नगरसेवकांच्या येण्यामुळे निर्माण होणार आहे का ? तर नाही. आयुक्तांच्या कार्यशैलीत या बंडखोर नगरसेवकांच्या येण्याचे काही फरक पडणार आहे का ? तर नाही.. मग शिवसेनेला साध्य तरी काय होणार...या प्रश्नाच उत्तर आहे ते शिवसेनेला साध्य होणार आहे.तात्पुरत समाधान आणि दीर्घकाळासाठीची अस्वस्थता. समाधान हे की भाजपची खेळी आपण मोडून काढली. मास्टर स्ट्रोक मारत भाजपला चारी मुंड्या चीत केलं.  पण  गेल्या सहा महिन्यात पालिकेतील शिवसेनेची पिछेहाट आणि कोंडी ही ऐतिहासिक आहे. आजवर पालिकेत शिवसेनेची कधी ही झाली नाही. इतकी दीनवाणी परिस्थी सध्या सुरू आहे. एकेकाळी पालिकेत गडाडणाऱ्या शिवसेनेच्या तोफा सध्या थंडावल्या आहेत. मी मी म्हणवणारे लढवय्ये नगरसेवक आपल्या तलवारी म्यान करुन बसले आहेत. महापालिका आयुक्तांच्या गोड हसण्यापुढे महापौरांसह समित्यांचे अध्यक्षांची ही बोलती बंद होते. नागरिकांच्या समस्या मांडू न दिल्यामुळे, सभागृहात बोलू न दिल्यामुळे, तेजस्वी कामगिरी करण्याची क्षमता असलेल्या नगरसेवकांना निस्तेज करुन टाकल्यामुळे शिवसेनेच्याच नगरसेवकांमध्ये खूप नाराजी आहे.सध्या सत्ताधारी शिवसेनेची स्थिती म्हणजे आई खावू घालत नाही आणि बाप भिक मागू देत नाही अशी झाली आहे. प्रशासनावर अंकुश नाही आणि अंतर्गत शांतता नाही. अशा स्थितीत हे नगरसेवक अस्वस्थतेत भर घातणारे ठरले आहेत. या परिस्थितीत बदल करण्यासाठी शिवसेनेला मूलभूत बदल करावे लागणार आहेत. ज्यासाठी येत्या सहा महिन्याचा कालावधी शिवसेनेला मिळणार आहे. पण त्यावेळी तरी या परिस्थितीत बदल करण्याचं शहाणपण शिवसेनेला मिळाव अशी अपेक्षा आहे.

Trending Now