हरवल्याचा शोध

Sachin Salve

                                                       (Posted By-डॉ.सदानंद मोरे, महाराष्ट्राच्या लोकव्यवहाराचे अभ्यासक )

 

4 जून 2013 रोजी, दिल्ली येथील नवीन महाराष्ट्र सदनाचे उद्‌घाटन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, महाराष्ट्राचे राज्यपाल के.शंकरनारायण, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली, दिल्लीतील कस्तुरबा गांधी मार्गावरील सव्वासहा एकर जागेत दीडशे कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या या महाराष्ट्र सदनात 139 रेसिडिन्शियल सूट आहेत. मुख्यमंत्री व राज्यपाल यांच्यासाठी दोन, कॅबिनेट मंत्र्यांसाठी 8, राज्यमंत्र्यांसाठी 16, सचिवांसाठी 6, आमदारांसाठी 21 आणि इतर पाहुण्यांसाठी 80 असे ते विभाजन आहे. या सदनाच्या आवारात दर्शनी बाजूला मध्यभागी छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्या दोन बाजूंना महात्मा फुले व डॉ.आंबेडकर आणि आतल्या बाजूला यशवंतराव चव्हाण व छत्रपती शाहू महाराज अशा 5 महापुरुषांचे भव्य पुतळे आहेत. महाराष्ट्राच्या लोकव्यवहाराचे अभ्यासक डॉ.सदानंद मोरे यांचा हा लेख कोणाही संवेदनशील मराठी माणसाला अंतर्मुख करणारा आहे. -संपादक

===================================================================================

जाहिरात - हरवले आहेत!

बाळ गंगाधर टिळक या नावाचे वयस्क गृहस्थ 'महाराष्ट्र सदनात जातो' असे सांगून गायकवाड वाडा या आपल्या राहत्या घरातून बाहेर पडले ते अद्याप परत आलेले नाहीत व सदनातली आढळले नाहीत. उमर वर्षे 60, उंची-सुमारे 5 फूट 6 इंच, वर्ण सावळा, चेहरा रापलेला, डाव्या कानाने थोडे कमी ऐकू येते. डोक्यावर पुणेरी पगडी व खांद्यावर उपरणे, सुपारी खाण्याची सवय.

वरील वर्णनाचे गृहस्थ कोणास आढळले तर त्याने कृपया व्यवस्थापक, केसरी मराठा संस्था, नारायण पेठ, पुणे 30 या पत्त्यावर संपर्क साधावा. योग्य बक्षीस दिले जाईल. तीर्थरूप पितामह, तुम्ही गेल्यापासून सर्व कुटुंबीय, दै.केसरीचे कर्मचारी व गणेश मंडळाचे कार्यकर्ते चिंतेत आहेत. श्री.सुकृत खांडेकर यांनी अंथरुण धरले आहे. कृपया, जाहिरात पाहिल्यापाहिल्या असाल तेथून परत घरी या.

आपला आज्ञाधारकदीपक

===================================================================================

 बातमी - टिळक बेपत्तापुणे, दि. 5. गेले तीन दिवस बेपत्ता असलेले भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे थोर सेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा अद्याप काहीही ठावठिकाणा न लागल्यामुळे पुणे शहरात चिंतेचं वातावरण पसरले आहे. आपण याबाबतची तक्रार नारायण पेठ, पोलीस चौकीत नोंदवली असल्याची माहिती डॉ.दीपक टिळक यांनी पत्रकारांना दिली. दरम्यान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी उद्‌घाटन केलेल्या दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात लोकमान्य टिळक यांची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्रातून खास पोलीस पथक पाठवण्यात येत असल्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री श्री.आर.आर.पाटील यांनी केली. ज्येष्ठ नागरिकांच्या बेपत्ता होण्याच्या प्रमाणात वाढ होत असल्याची चिंताही त्यांनी व्यक्त केली. अशा नागरिकांना झेड-प्लस दर्जाचे संरक्षण देण्याची योजना शासनाच्या विचाराधीन असल्याचेही त्यांनी सांगितले.

===================================================================================

अग्रलेख - लोकमान्य आणि राजमान्य

लोकमान्य टिळकांसारखा जागतिक कीर्तीचा नेता पुणे शहरातून बेपत्ता व्हावा ही गोष्ट या शहराच्या नावलौकिकाला साजेशी नाही, याविषयी कोणाचे दुमत होणार नाही. आमच्याकडे आलेल्या बातमीनुसार दिल्लीत संपन्न होणार्‍या महाराष्ट्र सदनाच्या भव्य इमारतीच्या उद्‌घाटन समारंभासाठी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि नामदार यशवंतराव चव्हाण यांना निमंत्रण होती. आपले नाव चुकून वगळले गेले असेल किंवा पोस्ट खाच्याचा काही घोळ झाला असेल अशा समजुतीने बळवंतराव निमंत्रण गृहीत धरून दिल्लीला निघाले, ही त्यांची मोठी चूक होती. निमंत्रण असलेल्या ऐतिहासिक पुरुषांच्या प्रवासाची विशेष व्यवस्था महाराष्ट्र शासनाने केली होती. तिच्यात सुरक्षेचाही समावेश होता. त्यामुळे ते महाराष्ट्र सदनापर्यंत सुखरूप पोहोचू शकले. लोकमान्यांना मुद्दाम निमंत्रणच नसल्यामुळे त्यांना कोण संरक्षण देणार?

यासंदर्भात दिल्लीच्या एका न्यूज चॅनेलने दाखवलेली बातमी खरी असेल तर मात्र ती गंभीर बाब ठरू शकते. निमंत्रण नसल्यामुळे त्यांना सदनाच्या प्रवेशद्वारातच अडकवण्यात आले असे या वाहिनीचे वृत्ती आहे. 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे' असे ठणकावून सांगणार्‍या बळवंतरावांनी निमंत्रण हासुद्धा आपला हक्क असल्याची समजूत करून घेतली, तिच आमच्या मते चूक होती. आणि 'आपण ज्याअर्थी लोकमान्य आहोत, त्याअर्थी राजमान्यही असलो पाहिजे' हे त्यांनी केलेले अनुमानही चुकीचेच होते.

श्रीयुत टिळक यांची ज्येष्ठता विचारात घेतली असता आम्हाला त्यांना सल्ला देण्याचा अधिकार नाही, हे न समज्याइतके आम्ही अडाणी नाही. तथापि, राहवत नाही म्हणून त्यांना हा अनाहूत सल्ला देण्याचे औद्धत्य करण्याची परवानगी आम्ही मागतो. यापुढे त्यांना अशा कार्यक्रमात जायची इच्छा झाली तर त्यांनी चि.रोहितला सांगून त्याच्यामार्फत आधीच सर्व नियोजन करून घ्यावे. राहुल किंवा रोहित यांची नावरास एकच येत असल्याने अशा गोष्टी राहुल यांच्या माध्यमातून घडवून आणणे अशक्य कोटीतील आहेत असे आम्हाला तरी वाटत नाही.

जाता आणखी एका गोष्टीचा उल्लेख. एकेकाळी टिळकांना त्यांचे विरोधक 'तेल्यातांबोळ्यांचे पुढारी' म्हणून हिणवत असत. आज 'तेलातांबोळ्यांचे शत्रू' म्हणून त्यांची प्रतिमा उभी होत असल्याचे आम्हाला स्पष्ट दिसत आहे. आपल्याला निमंत्रण नसण्याचे हे तर कारण नसावे, याचा विचार करण्याची वेळ टिळकांवर आली आहे. 1925च्या दरम्यान पुणे शहरात महात्मा फुले यांचा पुतळा बसवण्यास टिळकांच्या हटवादी व अदूरदृष्टीच्या अनुयायांनी विरोध केला होता, त्याची ही प्रतिक्रिया नसेल अशी आम्हाला आशा आहे. फुल्यांच्या अनुयायांनी टिळकांच्या अनुयायांबरोबर आचरटपणात स्पर्धा करू नये. ब्राह्मणांची बुद्धिमत्ता आदर्श मानावी की नाही याबद्दल वाद होऊ शकेल, पण निदान त्यांचा निर्बुद्धपणा तरी गिरवू नये असे आमच्यासारख्या तटस्थ निरीक्षकाला वाटते.

===================================================================================

बातमी -पुतळ्यांच्या संवादाने गूढ वाढले

नवी दिल्ली, (प्रतिनिधी) - येथील महाराष्ट्र सदनाच्या भव्य इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याचा प्रसंग वीज आणि ध्वनियंत्रणेतील बिघाडामुळे गाजत असताना, लोकमान्य टिळकांच्या बेपत्ता होण्याच्या प्रकरणाने राजधानीत सर्वत्र खळबळ माजली आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी या विषयावर खास चर्चा केल्याचे वृत्त आहे. चव्हाण यांनी टिळकांना समारंभाच्या स्थानी प्रवेश न देण्याची जबाबदारी राष्ट्रपती कार्यालयाची व राष्ट्रपतींच्या सुरक्षाव्यवस्थेची असून त्याचा महाराष्ट्र शासनाशी काही संबंध नसल्याचा पवित्रा घेतल्याचे सूत्रांकडून समजते. राजधानीतील प्रमुख ठिकाणी लोकमान्य टिळकांची छायाचित्रे लावण्यात आली असून नागरिकांनी शोधकार्यात सहकार्य करावे, असे आवाहन दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी केले आहे.

    दरम्यान, महाराष्ट्राचे गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी पाठवलेले विशेष पोलीस पथक येथे दाखल झाले असून त्याने महाराष्ट्र सदनाची पाहणी केली. पथकाचे प्रमुख गोपाळराव भांगरे-पाटील यांच्या डायरीतील पाने आमच्या हाती लागली असून ती आम्ही आमच्या वाचकांसाठी खास उद्‌धृत करीत आहोत. मात्र त्यामुळे तपासाला मदत होईल की या प्रकरणाची गुंतागुंत वाढेल याबद्दल निश्चितकाही सांगणे आज तरी अवघड आहे.

- 1 -    'दिल्लीत दाखल झाल्यापासूनच याची जाणीव होत आहे. येथील सर्वसामान्य माणसाला टिळकांचे नाव माहीत असल्याचे आढळून आले. काल येथील टिळकांशी संबंधित असलेले रस्ते, गल्ल्या, कॉलन्या यांची पाहणी केली व काही धागेदोरे मिळतात का याचीही चाचपणी केली. मा.आबांनी दोन वेळा मोबाईलवरून तपासाच्या प्रगतीची विचारणा केली. पावसाळी अधिवेशन सुरू होण्याच्या आत तपास पूर्ण झाला नाही तर आमदार नडतील, ही काळजी त्यांच्या आवाजावरून जाणवत होती.'

- 2 -    'रात्री महाराष्ट्र सदनात आलो. युनिफॉर्ममध्ये तपास केला तर लोक माहिती द्यायला बिचकतात असा अनुभव असल्याने आम्ही सर्व साध्या पोशाखात वावरत होतो. शेजारच्या पान टपरीवाल्याकडून 4 तारखेला एका वृद्ध गृहस्थाने एक डझन सुपार्‍या खरेदी केल्या होत्या असे समजले. त्याला टिळकांचा फोटो दाखवला असता त्याने तो लगेचच ओळखला. म्हणजे ते उद्घाटनाच्या दिवशी येथे आले होते हे निश्चित. लगेचच मा.आबांना मोबाईलवरून तसे कळवले.'

- 3 -    'रात्री सदनातच जेवलो. येथील कर्मचारी चांगले सहकार्य करीत आहेत. जेवणानंतर सदनाच्या आवारात शतपावली करीत असताना दबक्या आवाजात चर्चा चालू असल्याची चाहूल लागली. तेव्हा आसपास नीट न्याहाळून पाहिले, पण कोणी दिसेना. आवाज येत असल्याची मात्र आम्हा सर्वांचीच खात्री होती. लक्षात आले की सदनात बसवलेले पुतळे एकमेकांशी बोलत आहेत. क्षणभर कानांवर विश्‍वास बसेना. पण माझ्या इतरही सहकार्‍यांना तसेच वाटत होते तेव्हा विश्‍वास ठेवणे भाग पडले. नीट ऐकू येत नव्हते, तरी पण जमेल तसे लिहून घेतले.'

डॉ.आंबेडकर - (शाहू महाराजांना अभिवादन करीत) महाराज ओळख करून देतो - हे यशवंतराव चव्हाण (चव्हाण महाराजांना मुजरा करतात) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. मी इहलोक सोडला तेव्हा अगदीच तरुण होते. महाराष्ट्राचा कारभार फारच चांगला केला यांनी.

शाहू छत्रपती - झक्कास! बिल्डिंग ब्येस बांधली. बाकी भीमराव, तुम्हाला इथे पाहून बरे वाटले. स्वतंत्र भारताची घटना तुम्ही लिहिल्याचे समजले होतेच. माणगाव ते दिल्ली मोठाच पल्ला गाठला तुम्ही, जोतिरावांचे पांग फेडलेत.

डॉ.आंबेडकर - ते काय, पलीकडेच आहेत की, जोतिबा. तुमचे-आमचे गुरु.

यशवंतराव चव्हाण - अहो, तुमच्या तिघांच्या नावाने तर आपले राज्य चाललेय. पण आपले आद्यपुरुष - तेसुद्धा येथेच आहेत. (शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे बोट दाखवतात.)

जोतिराव फुले - कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी राजे भोसले यांना सलाम.

शाहू महाराज - आबासाहेब, मुजरा घ्यावा. तमाम महाराष्ट्राचा मुजरा -

शिवाजी महाराज - आशीर्वाद आहे आमचा तुम्हा सर्वांना. आमच्यानंतर महाराष्ट्राच्या कर्तबगारीची परंपरा तुम्ही चालू ठेवलीत. आम्ही धन्य झालो. पण आपण सारे इथे एकत्र कसे?

यशवंतराव चव्हाण - (मुजरा करीत) मी सांगतो महाराज, मी यशवंतराव चव्हाण, महाराष्ट्र राज्याचा.

शिवाजी महाराज - मी ओळखतो तुम्हाला. प्रतापगडावर आमचा पुतळा बसवला होता तो तुम्हीच ना! पंडित नेहरुंना बोलावले होते उद्घाटनाला. राज्याची उत्तम पायाभरणी केलीत तुम्ही, हिंदुस्थानचे संरक्षणमंत्री झालात. पाकिस्तानला धूळ चारली युद्धात. आमचे नाव राखले, शाब्बास!

यशवंतराव चव्हाण - कृपा असू द्यावी महाराज. तर हे आपले महाराष्ट्र सदन. महाराष्ट्राचे राज्यकर्ते राजधानीत येतात तेव्हा त्यांच्या राहण्या-जेवणाची, उठण्या-बसण्याची सोय व्हावी म्हणून महाराष्ट्र सरकारनं बांधलंय.

शिवाजी महाराज - वा! हिरोजी इंदुलकरांची याद यावी असे बांधकाम आहे. (शाहू छत्रपतींना उद्देशून) राजे, महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना आमच्या वतीने मानाची वस्त्रे रवाना करा. पण आपण सगळे इथे...

यशवंतराव चव्हाण - महाराज, तुमच्यापुढे हे सांगताना मला संकोचल्यासारखे झाले आहे. महाराष्ट्राचे प्रातिनिधिक महापुरुष म्हणून राज्यकर्त्यांनी आपली इथे प्रतिष्ठापना केली आहे. मी म्हणत होतो की माझा समावेश नको - पण ऐकले नाही.

शिवाजी महाराज - राज्यकर्त्यांनी योग्यच केले, तुमची प्रतिष्ठापना करून. तुमची कर्तबगारी जाणतो आम्ही (इकडे-तिकडे पाहात) पण...

शाहू महाराज - पण, पण काय महाराज?

शिवाजी महाराज - आमचे ज्ञानोबा-तुकोबा दिसत नाहीत कुठे? महाराष्ट्रात एवढेच महापुरुष होऊन गेले? यशवंतराव, आम्ही तुमचे ते भाषण ऐकलंय. महाराष्ट्राच्या चार परंपरा सांगितल्या होत्या तुम्ही. आणि त्यांचे प्रतीक असणारे पुरुषसुद्धा...

यशवंतराव चव्हाण - होय महाराज. त्यातील एक परंपरा तुमची होती - शौर्याची.

शिवाजी महाराज - आमचे राहू द्या. बाकीचे...

यशवंतराव चव्हाण - आपले जोतिराव - समतेचे, लढ्याचे प्रतीकच आहे ते. - (अडखळतात).

शिवाजी महाराज - थांबलात का? पुढे बोला.

यशवंतराव चव्हाण - ज्ञानोबा माऊली आपल्या संतपरंपरेचे प्रतिनिधित्व करतात.

शिवाजी महाराज - अस्से. आधुनिक महाराष्ट्राला संतांची अडचण होतेय की काय? असेलही - आणि चौथे?

यशवंतराव चव्हाण - लोकमान्य टिळक - त्यागाची आणि देशभक्तीची परंपरा, ब्रिटिशांच्या विरोधात सार्‍या देशात असंतोष निर्माण केला.

शिवाजी महाराज - आमची जयंती आणि राज्याभिषेक दिन पण साजरा करायचे तेच ना ते बळवंतराव. या जोतिरावांनी तर आमच्यावर पोवाडाच रचला होता - काय जोतिबा तुम्हाला काय वाटते?

जोतिराव फुले - या शाहू महाराजांचे वडील चौथे शिवाजी महाराज यांची बाजू घेऊन ब्रिटिश सरकारवर टीका केली होती टिळकांनी. त्यांच्यावर खटला झाला तेव्हा मीच सांगितलं होतं उरवणेशेठला, जामीनकी द्या म्हणून. काय शाहूजी?

शाहू महाराज - बरोबरच आहे. त्यांचे-आमचे मतभेद होते काही बाबतीत. पण महाराष्ट्राचे नाव देशपातळीवर नेले ते त्यांनीच. आणि बाहेर भांडलो तरी आतून मदत करायचो आम्ही एकमेकांना. अहो ते गेले त्या दिवशी जेवलो नव्हतो आम्ही. काय भीमराव, आठवतेय ना?

डॉ.आंबेडकर - होय महाराज, आपले हे वाद-मतभेद महाराष्ट्रापुरतेच ठेवायला हवेत. भारतीय पातळीवर आपण सर्व महाराष्ट्रीयांनी एकत्र असालया हवे.

यशवंतराव चव्हाण - आपण म्हणता ते योग्यच आहे महाराज - पण सध्याचे महाराष्ट्रातले वातावरण...

शिवाजी महाराज - माहीत आहे मला. बहिर्जीने फरकच सांगितला. तुमचा तो ब्राह्मण-ब्राह्मणेतरवाद- अहो माझ्या प्रधानमंडळात सात ब्राह्मण होते. तुम्ही राज्यकर्ते आहात ना? तुम्हाला साधे ब्राह्मणांना हाताळता येत नाही? राज्यकर्त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन जायचे असते. सर्वांच्या गुणांचा उपयोग करून घ्यायचा असतो. काय बाबासाहेब?

यशवंतराव चव्हाण - माझंही तेच धोरण होतं की महाराज, तर्कतीर्थ, गाडगीळ, बर्वे यांच्या गुणांचा उपयोग करून घेतला मी राज्यासाठी. पण हे अलीकडचे.शिवाजी महाराज - माझा निरोप सांगता त्यांना. हे बरोबर नाही. आम्ही असा भेदाभेद केला असता तर स्वराज्य निर्माणच झाले नसते. ही चूक लवकरात लवकर दुरुस्त झाली पाहिजे, नाही तर आम्ही महाराष्ट्र सदनातून निघून जाऊ.

यशवंतराव चव्हाण - होय महाराज. मी बघतो ते.

===================================================================================

बातमीविशेष पथक स्वगृही?

नवी दिल्ली, दि. 8 (प्रतिनिधी) - विशेष पोलीसदलाचे प्रमुख गोपाळराव भांगरेपाटील यांच्या डायरीतील पाने प्रसिद्ध झाल्यामुळे सर्वत्र एकच खळबळ माजली आहे. टीम भांगरेपाटीलमधील अधिकारी शुद्धीवर होते काय? असा सवाल उपस्थित केला जात असून पुढील वाद टाळण्यासाठी भांगरेपाटलांच्या विशेष तपासदलाला परत बोलावण्याचा निर्णय महाराष्ट्राचे गृहमंत्री आर.आर. पाटील घेणार असल्याची चर्चा आहे.===================================================================================

 निवेदन

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक सुखरूप असून त्यांनी स्वत: याबाबतीत पाठविलेले निवेदन त्यांच्याच आदेशावरून आजच्या अंकात प्रसिद्ध करीत आहोत. लोकमान्य बेपत्ता झाल्यापासून त्यांच्या असंख्य चाहत्यांनी दाखवलेल्या आस्थेबद्दल केसरी परिवार ऋणी आहे.- संपादक, दै.केसरी.===================================================================================

 दि. 4 च्या उद्घाटन सोहळ्यास आम्हा निमंत्रण नव्हते. तथापि, एक जागरूक पत्रकार या नात्याने आम्ही आपण होऊन राजधानीत गेलो होतो. पत्रिका नसल्यामुळे आम्हाला प्रवेशद्वारात रोखण्यात आले होते हे वृत्त खरेच आहे. तथापि, आम्ही हाडाचे पत्रकार व छत्रपतींच्या गनिमी काव्याचे वारसदार मराठे असल्याने सुरक्षाकमीर्ंना गुंगारा देऊन सदनात प्रवेश मिळाला व त्या आनंददायी सोहळ्याचे याचि देही याचि डोळा साक्षीदार झालो.

महाराष्ट्र सदनात आमचा पुतळा उभारला नसल्याने काही लोक नाराज असल्याचे समजते. त्यांना आम्ही सांगू इच्छितो की, आम्ही स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला तो गीतेकडून निष्काम कर्मयोगाच्या भूमिकेतून. कर्मफलावर नजर न ठेवता कर्तव्यकर्म करीत राहावे या आमच्या तत्वानुसार व आमच्या कुवतीनुसार आम्ही आमचे कर्तव्य करीत राहिलो. स्वातंत्र्य मिळाले, पुढे आपल्या मराठी लोकांचे राज्य झाले याचे आम्हाला समाधान आहे. आमचा पुतळा बसवला न बसवला, आमचे नाव एखाद्या विद्यापीठाला वा रस्त्याला दिले ना दिले यामुळे आमच्या मन:स्थितीत काही फरक पडणार नाही. मात्र महाराष्ट्र सदनात संतांचे आणि विशेष करून आमच्या महादजी शिंदे, सयाजीराव गायकवाड व विठ्ठलराव शिंदे यांचे पुतळे जरूर बसवावेत. ज्ञानोबा-तुकोबा चालणार नसतील तर भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत फडकावणारे संत नामदेवराय चालतील.

ता.क. -आम्ही व शाहू महाराज भांडलो होतो, पण आमच्या चुकांची पुनरावृत्ती तुम्ही केलीच पाहिजे असं नाही.

आपला नम्रबाळ गंगाधर टिळक

===================================================================================

साभार : साधना साप्ताहिक

Trending Now