धोणीच्या यशातील मराठी टक्का..!

Sachin Salve

Posted by -संदीप चव्हाण, डेप्युटी न्यूज एडिटर, IBN लोकमत

वन-डे वर्ल्ड कप, टी-20 वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी... आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी जिंकणारा महेंद्रसिंग धोणी हा जगातला एकमेव कॅप्टन ठरलाय. पण याच धोणीला क्रिकेटमधील पहिला ब्रेक कुणी दिला? धोणीला कॅप्टन करा म्हणून त्याच्या नावाची शिफारस कुणी केली? टी-20 कॅप्टन म्हणून धोणीची निवड कुणी केली? आणि कॅप्टन म्हणून निवड झाल्यावर अपयशाच्या गर्तेत सापडलेल्या धोणीवर चौफेर टीका होत असतानाही त्याला कॅप्टनपदावर कुणी कायम ठेवलं? या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एकच आहे आणि ते म्हणजे मराठी माणूस...

त्यानंतर वेस्ट इंडीजमध्ये झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारताला द्रविडच्या नेतृत्वाखाली लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. बांगलादेशकडून पराभूत झाल्यानं वर्ल्ड कपमधील आपलं आव्हान साखळीतच संपुष्टात आलं होतं. त्या तीन मॅचमध्ये धोणी दोनदा शून्यावर आऊट झाला. संतप्त क्रिकेट चाहत्यांनी थेट पराभवाचा राग म्हणून धोणीच्या घरावर त्यावेळी दगडफेक केली होती. मी त्यावेळी वेस्ट इंडीजमध्ये होतो. धोणीच्या चेहर्‍यावरचे भाव तितकेच शांत... अगदी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर जसे होते तसेच शांत...

त्यानंतर दिलीप वेंगसरकरच्या अध्यक्षतेखालील निवड समितीनं धोणीची टी-20 टीमच्या कॅप्टनपदी नियुक्ती केली. विशेष म्हणजे भारताचा या टी-20 स्पर्धेला विरोध होता. या स्पर्धेला परवानगी देणारा सगळ्यात शेवटचा देश म्हणजे भारत. साहजिकच टी-20 स्पर्धेसाठी इतर देश जेव्हा दक्षिण आफ्रिकेत सराव करत होते तेव्हा टी-20 वर्ल्ड कपच्या आधी पाच दिवस भारत-इंग्लंडमध्ये सातवा वन-डे सामना खेळत होता. भारत ती सीरिज 4-3 हरला. पण या स्पर्धेसाठी भारतानं दुय्यम संघ पाठवला.

त्यात सचिन, द्रविड आणि सौरव गांगुलीला विश्रांती देण्यात आली. साहजिकच सीनियर खेळाडूम्हणून धोणीच्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ पडली आणि धोणीनं टी-20 चा वर्ल्ड कप भारताला जिंकून दिला. इतकं होऊनही वन-डेतून जेव्हा द्रविडनं कॅप्टन्सी सोडली तेव्हा निवड समितीनं पुन्हा सचिनकडे कॅप्टन्सीसाठी विचारणा केली होती. सचिननं दूरदृष्टीनं त्यावेळी वेंगसरकर यांना धोणीच्या नावाची शिफारस केली आणि धोणी वन-डे कॅप्टन बनला. त्यानंतर मोहिंदर अमरनाथ निवड समितीत असताना धोणी हटाव मोहिमेला वेग आला होता. नव्यानं निवड समितीच्या अध्यक्षपदी आलेल्या संदीप पाटील यांच्यावर धोणीला हटवण्याबाबत जबरदस्त दबाव होता.

विदेशात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध धोणीच्या नेतृत्वाखालील भारतीय टीम सलग आठ टेस्ट हरली होती. तरीही संदीप पाटील यांनी धोणीवर विश्वास दाखवला आणि त्याचं फळ म्हणजे ऑस्ट्रेलियाला भारतात व्हाईटवॉश धोणीनं दिला आणि आता चॅम्पियन ट्रॉफीही भारताला जिंकून दिली. किरण मोरे, दिलीप वेंगसरकर, सचिन तेंडुलकर आणि संदीप पाटील या चार मराठी माणसांनी धोणीवर दाखवलेल्या विश्वासामुळेच आज भारताला क्रिकेट जगतातील एक जगज्जेता कॅप्टन गवसला. धोणीचं त्याच्या कर्तबगारीसाठी कौतुक झालंच पाहिजे, पण त्याला ही संधी मिळवून देणार्‍या पडद्यामागील सूत्रधारांनाही कौतुकाची एक थाप द्यायला हरकत नाही...

Trending Now