नेताजी,'देखी दिनन के फेर...'

Sachin Salve

 कौस्तुभ फलटणकर, नवी दिल्ली

 "रहिमन चूप हो बैठिये,देखी दिनन के फेर" रहिमदास यांचा हा दोहा मुलायम सिंह यादव यांना याक्षणी उत्तम लागू होतो. कालपर्यंत समाजवादी पक्षात मुलायम सिंहांचा आदेश मानला जायचा पण आज कालचक्र असं काही फिरलं आहे की पक्षाची निवडणुकीत काय व्ह्युरचना आहे याची साधी माहिती सुद्धा मुलायम सिंग यांना दिली जात नाही.

मुलायम सिंह यादव यांची चोवीस तास राजकारण करणारे मुरब्बी राजकारणी अशी आहे. सत्तेत असो वा नसो ,गल्ली असो की दिल्ली, सत्तेत असो की विरोधात मुलायम ने आपला राजकीय दरारा नेहमीच कायम ठेवला. काय उत्तर काय दक्षिण, काय मंत्री काय संत्री संसदेत मुलायम दिसले की सगळेच त्यांना लवून नमस्कार करतात. मुलायमच्या करिष्म्यामुळे उत्तर प्रदेशात एक घोषणा नेहमी ऐकली जाते ती म्हणजे "जिसका जलवा कायम है उसका नाम मुलायम है" पण मुलायम यांचा हा दबदबा आता इतिहासात जमा होण्याची वेळ आली आहे.

आधी तर त्यांची अध्यक्ष पदावरुन नाटकीय रित्या हकालपट्टी करण्यात आली. पण हा अखिलेश मुलायम यांची ठरवून केलेली खेळी असेल म्हणून अनेकांनी याला फार गांभीर्याने घेतले नाही.  हद्द तेव्हा झाली जेव्हा समाजवादी पक्षाने काँग्रेस सोबत युती करण्याची घोषणा केली आणि मुलायमसिंहाना विचारणे तर दूर सांगितलं सुद्धा नाही. काँग्रेससोबत युतीची चर्चा थेट अखिलेश आणि रामगोपाल यादव यांनी केली.युतीची चर्चा जेव्हा ताणल्या गेली तेव्हा सुद्धा बाहेरच्या लालू प्रसाद यादव यांच्याशी अखिलेश ने सल्लामसलत  केली. ही गोष्ट मुलायम आणि त्यांच्या समर्थकांच्या अतिशय जिव्हारी लागली आहे. मुलायम दिसले की, पायघड्या घालणारे काँग्रेसचे नेते गुलामनबी आझाद, खडगे, कधीकाळी शिष्य राहिलेले राजबब्बर मुलायमसिंह यांच्याकडे ढुंकूनही बघायला तयार नाहीये.इथंच हा प्रकार थांबला नाहीये तर आतापर्यंत मुलायम यांच्या सहमती शिवाय कधीच समाजवादी पक्षाचे घोषणापत्र प्रकाशित झाले नाही. पण या वेळी घोषणापत्र जाहीर झाल्यावर त्याची प्रत मुलायमसिंहाना देण्यात आली.मुलायम यांच्या जवळच्या लोकांच्या मते घोषणा पात्र प्रकाशनात मुलायम जाणून बुजून अनुपस्थित राहिले हा आरोप चुकीचा आहे ,खरी गोष्ट ही आहे की,  कार्यक्रम कश्या बद्दल आहे हे मुलायसिंहांना सांगण्यातच आले नव्हते. पक्षात काय सुरू आहे आणि काय नाही हे त्यांना सुद्धा मीडियातूनच कळतं.अख्खे आयुष्य राजकारण स्वतःच्या शर्तीवर करणाऱ्या मुलायम यांच्यासाठी उत्तर वयात हे बघणं निश्चितच कुठल्या धक्क्या पेक्षा कमी नाहीये. राजकारण धूर्तपणे करायला हवे असे मानणाऱ्या मुलायमसिंहांवर कालचक्र आज उलटले आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Trending Now