भारताचे आध्यत्मिक "प्रमुख"!

Samruddha Bhambure

- महेश म्हात्रे कार्यकारी संपादक , IBN लोकमत 

स्वामीनारायण संप्रदायाचे आध्यत्मिक अर्ध्वर्यू आणि आधुनिक जीवनाला परंपरेशी जोडणारे आदरणीय प्रमुख स्वामी महाराज यांचे महानिर्वाण झाले आहे. आयुष्यभर निसर्गातील पंचतत्वांशी तादात्म्य राखणार्‍या या निरागस साधूचे पंचप्राण पंचत्वात विलीन होणे असंख्यांच्या मनाला चटका लावून गेले आहे.

मी त्यांना प्रथम पहिले 1999 मध्ये , खरेतर त्याच्या 5/6 वर्षे आधी मला स्वामीनारायण संप्रदाया ची नीटशी ओळख झाली होती . परंतु स्वामीनारायण संप्रदाया च्या प्रमुखांना भेटण्याची कधी संधी मिळाली नव्हती . लोकप्रभा दिवाळी अंकासाठी स्वामीनारायण संप्रदायावर विशेष लेख लिहिण्याची जबाबदारी आली आणि त्यामुळे प्रमुख स्वामी महाराज आणि त्यांच्या शिष्य परिवाराचे काम खूप जवळून पाहता आले.30 सप्टेंबर 1993 मध्ये झालेल्या लातूर - किल्लारीच्या भूकंपाच्या दुसर्‍याच दिवशी मी घटनास्थळी पोहचलो होतो. त्यानंतरच्या 18-19 दिवसात मी आणि पत्रकारमित्र उदय तानपाठक , हरीश केंची अगदी झपाटल्याप्रमाणे प्रत्येक घडामोडीच्या बातमीच्या मागे लागले होतो त्यात एका गावात स्वामीनारायण संप्रदाया चे साधू आणि कार्यकर्ते काम करताना दिसले. मी सहजपणे त्यांच्या जवळ गेलो , कारण माझ्या वाडे गावामध्ये या संप्रदाया च्या साधूंना मी अनेकदा भेटलो होतो, आमच्या घरीही त्यांचे स्वागत करण्याची जबाबदारी माझ्यावरच असे. आम्ही पत्रकार बातमीसाठी आलो आहोत हे समजताच श्री हरीभूषण स्वामीजी पुढे आले, त्यांच्याशी औपोचारिक बोलता बोलता स्वामीनारायण संप्रदाया संदर्भात खूप काही समजले, अनेक गैरसमज दूर झाले. पुढे अनेक वर्षे मी श्री हरीभूषण स्वामीजी ना भेटत होतो पण कधी प्रमुख स्वामी महाराज याना भेटण्याचा योग्य आला नव्हता, दिवाळीच्या एक आठवडा आधी मी आणि सुप्रसिद्ध छायाचित्रकार नीरज प्रियदर्शी असे दोघे जण सारंगपूर या गुजरातमधील छोट्या गावात गेलो. गावाच्या नावाप्रमाणे सगळीकडे मोरांचा वावर दिसत होता , मंदिराच्या प्रशस्त परिसरात बाग बगीच्यांमुळे एक विलक्षण गंध पसरलेला होता त्यावर धूप-कर्पूर वासाचे सात्विक वलय मिसळल्याने अवघे वातावरण चैतन्यमयी झालेले होते. नीरज आपल्या कॅमेर्‍यातून त्या भरलेल्या वातावरणाची स्पंदने टिपत होता आणि माझ्या मनात असंख्य प्रश्नांचा कल्लोळ उमटत होता.

नव्याने साधू होण्यासाठी इंग्लंड, अमेरिका आदी प्रगत देशातून आलेले तरुण साधक पाहून तर मन अस्वस्थ होत होते , ऐन तारुण्यात सर्वस्वाचा त्याग करण्याची त्यांची धडपड अनाठायी आणि अनाकलनीय वाटत होती. त्यामुळे प्रमुख स्वामींना कधी भेटेन आणि त्यांच्याकडून या सार्‍या प्रश्नांची उत्तरे मिळवीन असे झाले होते. फार प्रतीक्षा करावी लागली नाही, दुसर्‍याच दिवशी त्यांची भेट झाली, एका खोलीत लहानशा पलंगावर ते बसले होते. पुढ्यात टेबलावर बाळकृष्णाची मूर्ती होती . मी गुजरातीमधून त्यांच्याशी संवाद सुरू केल्याने जवळ उभा असलेला दुभाषी साधक हळूच मागे सरकला. मग मी माझ्या मनातील प्रश्नांची मालिका त्यांच्या समोर मांडत गेलो, काही थेट, काही खोचक, तर काही त्यांच्या संप्रदायाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेणारे. स्वामीजी मात्र अगदी शांतपणे, एका लयीत, संथपणे प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर देत होते. त्यांच्या चेहर्‍यावरील सात्विक भाव आणि नजरेतील आपुलकी अवघड प्रश्नांच्यावेळी सुद्धा कायम होती , हे आज 17 वर्षां नंतरही मला लख्ख आठवतंय. मला अजूनही आठवतोय भगवान बुद्ध आणि स्वामी विवेकानंदाप्रमाणे तरुणपणी अध्यात्मिक होण्याचा त्यांचा आग्रह. समाजाची निरपेक्ष सेवा करण्यासाठी साधुसंतांची भली मोठी फळी निर्माण करण्याचा प्रमुख स्वामींनी यशस्वी प्रयत्न केला.

देश विदेशात धर्म शिक्षण देण्यासाठी अप्रतिम मंदिरांची उभारणी करताना त्यांनी दाखविलेली दूरदृष्टी तेवढ्याच प्रखरपणे सामाजिक कार्यातही अनुभवास येत गेली. आपले सारे आयुष्य समाजासाठी वाहिलेले आहे असे बोलणारे अनेक दिसतात पण जेंव्हा प्रतिकूल वेळ येते तेंव्हा त्यांची भाषा बदलते. प्रमुख स्वामींनी मात्र अत्यंत प्रतिकूल परीस्थितीत आपले माणूसपण जपले, माणुसकीवरील विश्वास जपला आणि मुख्य म्हणजे माणुसकी हाच खरा धर्म याचा उच्चरवाने उद्गारही केला. अक्षरधाम वर झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या वेळी प्रमुख स्वामींनी घेतलेली समंजस भूमिका त्यांच्यातील साधुत्वाचा परमोच्च अविष्कार होती. म्हणून त्यांचे जाणे सध्याच्या अविश्वासाच्या वातावरणात जास्त प्रकर्षाने जाणवते. क्लेषदायक वाटते. आज त्यांच्या महानिर्वाणाने आपण सर्वानी एक पिढ्यानपिढयांना प्रेमाची, विश्वासाची सावली देणारा आधारवड गमावला आहे. त्याची जागा सहजपणे घेईल असा माणुस आज तरी समोर दिसत नाही, पण प्रमुख स्वामींनी दिलेले विचारधन मात्र आपल्या जवळ आहे. हा आधार काही कमी नाही.

प्रमुख स्वामींना भावपूर्ण श्रद्धांजली !
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Trending Now