शेतकर्‍यानी पोर, माप ओलांड...

Sachin Salve
प्रशांत बाग, ब्युरो चिफ, नाशिक, आयबीएन लोकमत

शेतीमालाला रास्त भाव मिळावा... या मागणीसाठी इंडिया विरुद्ध भारत ही चळवळ रुजवणारा खंदा शेतकरी नेता आज हरपला. शरद जोशी हे खर्‍या अर्थानं शेतकर्‍यांसाठी लढले. आपला देश शेतीप्रधान... या देशातला सगळ्यांत मोठा उत्पादक हा शेतकरी... म्हणजे देशातील प्रमुख उद्योगपतीच... पण याच उद्योगपतीला आपल्या शेतमालाचा दर ठरवण्याचा अधिकार का नाही ? असा खडा सवाल शरद जोशी यांनी विचारून प्रचलित सरकारला धारेवर धरलं होतं.

शेती, शेतकरी आणि त्याच्या जाणिवा हा आत्मा होता शरद जोशी यांच्या आंदोलनाचा. देशात अल्पभूधारक शेतकर्‍यांची दिवसेंदिवस वाढत चाललेली संख्या आणि यामुळंच उत्पादन खर्चातही झालेली वाढ हा चिंतेचा विषय असल्याचं मत शरद जोशी यांनी 30 वर्षांपूर्वी मांडलं होतं. आज मागे वळून पाहताना त्यांच्या या द्रष्ट्या दृष्टिकोनाला आपण सलाम करतो. शेती हा पूर्ण कुटुंब व्यवसाय असल्याचं शरद जोशी नेहमीच सांगत. नांदणी, कुरपणी, पेरणी, कटाई यात आघाडीवर असलेली महिला हा खरा शेतीचा आत्मा असल्याचं ठासून सांगणारे शरद जोशी यांची मातीशी जोडलेली नाळ किती घट्ट होती हे जाणवतं. पण फक्त विचार मांडणं त्यांच्या स्वभावात नव्हतं.

याच अधिवेशनात गावातील दारू विक्री बंदी करा या मागणीनं जोर पकडला आणि अधिवेशन आटोपल्यानंतर आप-आपल्या गावी गेलेल्या महिलांनी गावातील दारू विक्री बंदीसाठी पदर खोचला. शेतकरी नेता म्हणून शरद जोशींना आपण ओळखतो. पण चूल आणि मूलच्या पलीकडेही महिला चांगलं काम करू शकतात, ज्या आपलं घर चालवतात त्या देशही नक्कीच चालवतील हा विश्वास शरदरावांना होता.

उंबरठ्यापलीकडेही महिलांना स्थान मिळवून देणारे शरदराव हे फक्त शेतकरी नेते नव्हते तर स्त्री मुक्तीचे खंदे पुरस्कर्तेही होते. महिला या फक्त चूल आणि मूल पुरत्याच नाही तर त्याच आपल्या पोशिंदा असल्याचा विचार शरद जोशी यांनी कृतीतून मांडला. शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित निश्चित हमीभाव ही हाक देणार्‍या जोशी यांनी सरकारला सळो की पळो करून सोडलं होतं. शेतकरी हा सुद्धा एक माणूस आहे. त्यालाही मानानं जगवा, सुखानं आणि सन्मानानं जगू द्या अशी आग्रही भूमिका जोशींनी मांडली.

पाहता पाहता अख्ख्या देशभर ही चळवळ पोहोचली, अनेक कार्यकर्ते जोडले गेले, पुढे मतभेदही झाले, विविध राजकीय पक्षांनी या मतभेदांचा फायदाही उचलला, काही कार्यकर्त्यांनी वेगळी चूल मांडली, शरद जोशींचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्नही झाला. पण एकांड्या शिलेदारासारखा आपला लढा हा अखेरच्या श्वासापर्यंत लढणारा हा लढवय्या कधी हटला नाही.

गॅट करार आणि डंकेल प्रस्तावाबद्दल जोशींची मतं अगदी परखड होती. साध्या, सोप्या आणि सरळ शब्दांत जोशी बोलायचे म्हणूनच त्यांची भाषा ही प्रत्येकाला आईची भाषा वाटायची. शेतीला उद्योगाचा दर्जा मिळावा या मागणीसाठी शरदराव आपलं उभं आयुष्य लढले पण अखेरच्या श्वासापर्यंत त्यांचा हा लढा अपूर्णच राहिला. मला आठवतं, मी पुण्याला त्यांच्या घरी मुलाखतीसाठी गेलो होतो, तेव्हा त्यांनी ही खंत मला बोलून दाखवली होती... 'जर शेतकरी संघटनेची शकलं झाली नसती, राजकारण्यांनी एकटं पाडलं नसतं तर माझं हे स्वप्न नक्कीच पूर्ण झालं असतं' या शब्दांतली त्यांची अस्वस्थता मला आजही आठवते. कदाचित काहींच्या नशिबात अश्वत्थाम्यासारखंच जगणं असतं का ? या गोष्टींनी त्यांना पोखरलं होतं. पण त्यांनी जाग्या केलेल्या शेतकर्‍याला त्याच्या हक्कांची आज जाणीव आहे, हे काय कमी आहे. मोजक्या उत्पन्नात,अडचणीत घर चालवणारी,गावकुसातील महिला आज ताठ मानेनं उभी राहण्याचा प्रयत्न करतेय हे काय कमी आहे ?

शेतकर्‍याची पोर, आता माप ओलांड ... ही शरदरावांनी दिलेली हाक शेतकरी महिलांसाठी संजीवनी ठरली हे काय कमी आहे ?

आज अनेक शेतकरी नेते शरदरावांच्या आठवणी सांगताय. ते आमचे गुरू होते असंही आवर्जून सांगताय. पण त्याच शरदरावांची साथ यांनी कधीकाळी सोडली होती. 'शेतीला उद्योगाचा दर्जा मिळावा' या मागणीसाठी जरी हे एकत्र आले तर हताश शेतकर्‍याला दिलासाही मिळेल आणि शरद जोशी यांचं स्वप्नही पूर्ण होईल...हीच त्यांना खरी श्रद्धांजली.

 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

Trending Now