"ब्लादिमीर पुतिन"

Samruddha Bhambure

- विनोद राऊत, सिनीअर प्रोड्यूसर, आयबीएन लोकमत

युक्रेनमधले यशस्वी ऑपरेशन

क्रिमिया युक्रेनचा एक प्रांत..." ब्लडलेस कूप" - रक्ताचा एकही थेंब न सांडवता पुतिन यांनी तो भाग रशियाला जोडून घेतला. युक्रेनमधले नेतृत्व जेव्हा युरोपकडे झुकू लागले त्यावेळी पुतिन यांनी लष्करी हस्तक्षेप करण्याचं धाडस दाखवलं. त्याची किंमतही मोजली. युरोप आणि अमेरिकेने रशियावर जबर आर्थिक निर्बंध लादून पुतिन यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे तेलाचे भावही गडगडलेत. रशियाची अर्थव्यवस्था कमकुवत करून पुतिन यांना दुर्बळ करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न होता. मात्र केजीबीचा हा माजी प्रमुख त्याला पुरून उरला.

ओबामांवर मात

28 सप्टेंबर... संयुक्त राष्ट्र महासंघाची आमसभा... यात सीरियातील युद्धपरिस्थिती आणि युरोपमधील मायग्रेशन या मुद्यावर चर्चा होत होती. मात्र सर्वांचंच लक्ष होतं ते ओबामा यांच्या भाषणावर. मात्र ओबामा यांच्यानंतर पुतिन स्टेजवर आलेत आणि प्रकाशझोत त्यांच्यावर आला. पुतिन यांनी अमेरिकेच्या सीरियाबद्दलच्या धोरणावर हल्ला केला. अमेरिकेच्या एकखांबी साम्राज्याला आव्हानच दिलं. आयसिसशी लढा द्यायचा असेल तर असाद यांना वगळून चालणार नाही हे त्यांनी स्पष्ट केलं.

जोरदार होमवर्कपुतिन यांनी हे भाषण करण्यापूर्वी त्याच होमवर्कही केलं होत. दुसरीकडे सीरियामध्ये रशियन लष्कराची मोठी जमवाजमव सुरू झाली होती. विमानविरोधी तोफा, अवजड शस्त्रसामग्री रशियानं लटाकिया शहरातील तळावर तैनात केली होती. मध्यपूर्वेतील नौदल तळावर रशियन युद्धनौका सुसज्ज ठेवल्या. हवाई दलाची अत्याधुनिक फायटर जेट्स रशियानं आणून ठेवले होती. रशिया एवढी लष्करी जमवाजमव का करत आहे हा प्रश्न सर्व जगाला पडला होता.

सिरियात हस्तक्षेपयुनोमधल्या पुतिन यांच्या भाषणानंतर केवळ दोन दिवसांतच रशियानं सीरियात हवाईहल्यास सुरुवात केली. रशियाचे हल्ले केवळ आयसिसपुरतेच मर्यादित नव्हते तर त्यांच्या टार्गेटवर होते अमेरिकन समर्थित अल नुसरा फंट्र, सीरियन बंडखोर. या हल्ल्यामुळे अमेरिकेची पुरती ताराबंळ उडाली, मात्र तोपर्यंत रशियानं अमेरिकेच्या एकाधिकारशाहीला आव्हान दिलं होतं. दोनच दिवसांत सीरियातील हवाईक्षेत्रावर रशियन हवाईदलानं वर्चस्व प्रस्थापित केलं. जवळपास 1500 किलोमीटर अंतरावरून रशियन नौदल प्रगत क्रुस मिसाईल्स आयसिसवर डागत आहेत. असाद यांची सत्ता उलथवण्याचे अमेरिकेचे मनसुबे पुतिन यांच्या खेळीने पार उद्‌ध्वस्त झालेत. अमेरिकेने लाखो डॉलर्स खर्च करून फ्री सीरियन आर्मी, अल नुसरा फं्रटच्या बंडखोरांना लष्करी प्रशिक्षण दिलं होतं तर अमेरिकेच्या आडून फ्रान्स, सौदी, कतारने बंडखोरांना मोठ्या प्रमाणात शस्त्रसज्ज केलं. मात्र रशियाच्या हल्यानंतर अमेरिकेची पंचाईतचं झाली आहे. त्याहीपुढे रशियाची लष्करी शक्तीही ठळकपणे जगापुढे आली आहे.

मध्यपुर्वेतलं रशियाचं स्थान बळकटबुश यांच्या युद्धखोरी भूमिकेला ओबामा यांनी खर्‍या अर्थाने लगाम घातला. इराक, अफगाणिस्तानमधून त्यांनी सैन्याची घरवापसी केली. दुसरीकडे इजिप्त, ट्युनिशियामध्ये उठाव झाल्यानंतर ओबामांनी बंडखोरांची बाजू घेतली होती. ओबामांनी इजिप्तचे राष्ट्रपती होस्नी मुबारक यांना राजीनामा देण्यास भाग पाडले. लिबियामध्येही थेट लष्करी कारवाई करण्यास अमेरिकेनं नकार दिला तर इराकमध्येही आयसिस आक्रमक झाल्यानंतर, ओबामा यांनी केवळ मर्यादित हवाई हल्ले करण्याचा घोष लावला. आयसिसला पराभूत करण्याची ओबामा यांची स्ट्रॅटेजी जवळपास अपयशी झाल्यात जमा झाली आहे. या सर्व कारणांमुळे मध्यपूर्वेतील अमेरिकेचा प्रभाव कमी होत चालल्याचं चित्र आहे आणि रशियान नेमक्या या वेळीच सीरियात सैन्य कारवाई सुरू केल्यानं मध्यपूर्वेतल्या राजकारणातील रशियाचं स्थान अधिक बळकट झालंय.

बाजीगर पुतिनसध्या पुतिन यांनी दाखवलेल्या धाडसामुळे इराक, सीरिया आणि इराण या देशांमध्ये पुतिन यांची लोकप्रियता वाढली आहे. दोन वर्षांपूर्वी पुतिन यांच्या लोकप्रियतेचा आलेख रशियातच झपाट्याने खाली आला होता. मॉस्कोच्या रस्त्यावर पुतिन यांच्याविरुद्ध मोठमोठी निदर्शने होत होती. त्यामुळे पुतिन काहीसे दुबळे वाटायला लागले होते. मात्र रशियाला गतवैभव मिळवून देण्याचं स्वप्न मनोमन बाळगणारे पुतिन स्वस्थ बसणार कसे? सुरक्षा महासंघात अमेरिकेच्या प्रस्तावावर रशियानं नकाराधिकाराचा वापर न केल्यामुळे, लिबियात 'नो फ्लाईंग झोन' अमेरिकेने लागू केला. त्यामुळेच कर्नल गद्दाफीची सत्ता गेली. त्यानंतर लिबियाची राखरांगोळी झाली. आता दुसरा लिबिया होवू द्यायचा नाही हा चंग पुतिन यांनी बांधला होता आणि संधी मिळताच सीरियामध्ये त्यांनी अमेरिकेला थेट आव्हान दिलं. पुतिन यांच्या भूमिकेमुळे सीरियात आता रशियाला वगळून कुणाला काहीच करता येणं शक्य नाही. अनेक महत्त्वाच्या गोष्टी पुतिन यांनी साध्य केल्या आहेत. युक्रेनमधील रशियाच्या छुप्या युद्धाचा विषय आता मागे पडला आहे तर मध्यपूर्वेतील टार्टास हा रशियाचा नौदलाचा तळसुद्धा सुरक्षित करण्यात पुतिन यशस्वी ठरलेत. तिसरं महत्त्वाचं म्हणजे जगाच्या पाठीवर रशियाचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालंय, शिवाय पुतिन यांची रशियातील लोकप्रियता प्रचंड वाढली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

Trending Now