इंधन दरवाढीचं गणित !

Sachin Salve
- विनोद राऊत, सिनीअर प्रोड्यूसर, आयबीएन लोकमत जागतिक कच्च्या तेलाच्या किमतीत प्रचंड घट झाली आहे. यामुळे ज्या राष्ट्रांची मदार तेलविक्रीवर आहे, त्या राष्ट्रांची अर्थव्यवस्था चांगलीच संकटात आलीय. यामध्ये एक्वाडोर, सौदी अरेबिया, इराण, रशिया, व्हेनेझुएला, इराक या देशांचा समावेश आहे. आपण थोडक्यात प्रश्न-उत्तराच्या माध्यमातून हे समजून घेऊयात. तेलाच्या किमतीत का घट झालीय, त्याच्यामागची कारणे काय आहेत आणि त्याचा फायदा-तोटा कुणाला आहे?

1) सध्या तेलाच्या किमती काय आहेत?सध्या तेलाच्या किमती 42 डॉलर प्रति बॅरलवर आल्यात. एक वर्षापूर्वी किमती प्रति बॅरल 90 ते 100 एवढ्या होत्या.2) जागतिक तेलाच्या किमतीमध्ये का घट झाली?अमेरिकेनं देशांतर्गत खनिज तेलाचं उत्खनन वाढवलंय. याशिवाय गेल्या 6 वर्षांत अमेरिकेनं आपलं तेल उत्पादन दुप्पट केलंय. आजपर्यंत अमेरिका हा तेलाचा मोठा आयातदार देश होता. तेलविक्रीसाठी अमेरिकेवर अवलंबून असणारे राष्ट्र सौदी अरेबिया, नायजेरिया, अल्जेरिया यांना नवं मार्केट शोधावं लागलं. त्यामुळे स्वाभाविक त्यांना तेल किमती कमी कराव्या लागल्या. दुसरीकडे कॅनडा, इराकने तेल उत्पादन कमी करण्याऐवजी वाढवलंय, त्याशिवाय मंदी असताना रशियानं तेल उत्खनन कमी केलं नाही. त्यामुळे मागणीपेक्षा उत्पादन जास्त झालंय.दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे अनेक युरोपियन युनियनमधील अनेक राष्ट्रांची अर्थव्यवस्था नाजूक झाली आहे. शिवाय या राष्ट्रांनी आता वाहनांसाठी पेट्रोल, डिझेलऐवजी अपारंपरिक ऊर्जेवर अधिक भर दिला आहे.3) तेल किमतीत घट; फायदा कुणाला?या सर्व घटाचा फायदा अनेकांना झालाय. इंधनासाठी आयातीवर अवलंबून राहणार्‍या भारतासारख्या राष्ट्रांचा फायदा झालाय. देशाची अर्थव्यवस्था रुळावर आलीय, शिवाय सरकारी तेल कंपन्यांचा तोटा कमी झालाय. महागाई वाढीवर नियंत्रण आलंय. आयात-निर्यातमधील तुट भरुन निघाली आहे. जगभरातील वाहनांचा वापर करणार्‍या कुटुंबांना याचा फायदा मिळत आहे. सध्या जगभरात गॅसोलीनच्या किमती खाली आल्यात. त्याचा फायदा युरोप, अमेरिकन कुटुंबांना होत आहे. महत्त्वाचं म्हणजे अल्प उत्पादन असणार्‍या कुटुंबांना याचा सर्वात जास्त फायदा झालाय. एक वर्षात गॅसोलीनच्या किमती 3.45 डॉलरवरून 2.65 डॉलरवर आल्यात.4) तोटा कुणाला?घटत्या तेल किमतीचा फटका बसलाय तो मुख्यता व्हेनेझुएला, इराण, नायजेरिया, इक्वाडोर, ब्राझील, रशिया या पेट्रो राष्ट्रांना. आखातातील अनेक देशांना याचा फटका बसतोय.अनेक मोठ्या तेल कंपन्या तोट्यात गेल्या आहेत. कंपनीच्या वार्षिक फायद्यात मोठी घट झालीय. चेव्रॉन, रॉयल डच शेल या कंपन्यांना त्यांच्या कर्मचार्‍यांचे पगार, भत्ते, इतर गोष्टींना कात्री लावावी लागली आहे.मात्र या मंदीत छोट्या तेल उत्पादक कंपन्या तग धरू शकत नाहीत. बँकांनी त्यांना कर्जपुरवठा न केल्यास या कंपन्या बंद पडण्याची भीती आहे. मंदीमुळे या क्षेत्रातील जवळपास 1 लाख लोकांच्या नोकर्‍या गेल्यात. अनेक कंपन्या तोट्यात गेल्यात, तेल उत्खननातील गुंतवणूक कमी झालीय.5) ओपेकची काय भूमिका आहे?ओपेक संघटनेच्या धोरणामुळे तेलाच्या किमती पडल्या आहेत. कारण तेलाची मागणी कमी असताना उत्पादन कमी करायला ओपेक राष्ट्र तयार नाहीत. ओपेकचा क्रूड ऑईल निर्देशांक जवळपास 50 टक्क्यांनी खाली आलाय. तरीही उत्पादन कमी करण्यास या राष्ट्रांनी नकार दिलाय.सौदी अरेबिया ओपेक संघटनेचं नेतृत्व करते. सौदीच्या मते जर आम्ही तेल उत्पादन कमी केलं आणि भविष्यात तेलाच्या किमती वाढल्या तर त्यांचं मार्केट शेअर कमी होईल. याच भीतीमुळे सौदीनं इतर राष्ट्रांनाही तेल उत्पादन सुरूच ठेवण्यास सांगितलंय. अल्जेरिया, व्हेनेझुएला, इराण या राष्ट्रांचा याला विरोध आहे, मात्र हा विरोध संघटनेनं झुगारून लावलाय.याचा फटकाही ओपेक राष्ट्रांना बसलाय. सोदी अरेबियासह इतर राष्ट्रांचं 300 अब्ज डॉलरचं नुकसान झालंय. सौदी अरेबियाचं उत्पन्न घटलंय. मात्र तेलाच्या किमती वर्षभर अशाच कायम राहिल्या तर सौदी अरेबियाचे राजे सलमान हे इतर ओपेक राष्ट्रांना उत्पादन सुरूच ठेवण्याविषयी फार समजावून सांगू शकणार नाहीत.6) तेल किमती खाली येण्यामागे काही अन्य थेअरी आहेत?तेल किमती कमी होण्यामागे काही राष्ट्रांचा कट असल्याच्या अनेक थेअरी प्रचलित आहेत. अमेरिकेला सौदी अरेबिया, रशिया, इराणची तेल आधारित अर्थव्यवस्था कमजोर करायची आहे. युक्रेनचा वचपा काढण्यासाठी अमेरिका हे करत असल्याचंही अनेकांना वाटलंय. 1980 मध्येही सोव्हिएत युनियन फुटण्यामागे पडलेल्या तेलाच्या किमतीचा मोठा वाटा होता. मात्र या थेअरीला काही आधार नाही. एकतर अमेरिका, सौदी अरेबियामध्ये पहिल्यासारखे सलोख्याचे संबंध उरलेले नाहीत. याशिवाय बलाढ्य तेल कंपन्यांचे तेल उत्पादनावर नियंत्रण ठेवण्याइतपत ओबामा प्रशासनाचा वचक उरलेला नाही.7) तेल किमती केव्हा स्थिर होतील?सध्यातरी काही काळ असं होण्याची चिन्हं नाहीत. अमेरिका आणि इतर देश तेल उत्पादन सातत्यानं वाढवत आहेत. मात्र काही महिन्यांनंतर काही देश तेल उत्पादन कमी करणार आहेत. त्यामुळे काही काळानंतर कच्च्या तेलाची मागणी येईल आणि किमती जाग्यावर येऊ शकते. जागतिक तेल बाजाराच्या इतिहासात चढ-उतार होत राहतात.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

Trending Now