श्रावणायन !

Sachin Salve

- महेश म्हात्रे, कार्यकारी संपादक, आयबीएन लोकमत

मानवी जीवनात उत्सवांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. ‘उत्सव’ हा शब्दच मुळी उत्साह आणि आनंदाचे प्रतीक आहे. आनंद म्हणजे मनाला येणारी सुखाची प्रचिती. ही सुखाची अनुभूती जशी माणसांना घेता येते, तद्वत निसर्गही ती अनुभूती घेत असतो. ‘श्रावण’ हा असाच निसर्गाच्या आनंदानुभूतीचा पर्वकाळ मानला जातो. सूर्याच्या तप्त किरणांनी, उन्हाच्या काहिलीने त्रस्त झालेल्या धरतीमातेला श्रावणात हिरवी तृप्ती लाभलेली असते. एरवी उघडे-बोडके दिसणारे डोंगरमाथे श्रावणात हरित तृणांच्या मखमलीने झाकले जातात.

पाणथळ जागांवर चमचमणार्‍या पाण्याचे विविध आकाराचे तुकडे जणू पृथ्वीच्या हिरव्यागार शालूवरील आरसेच असतात आणि तिकडे मोकळया पठारावर तर गवतफुलांच्या विविधरंगी पुष्पगुच्छांची सुरेख आरासच मांडलेली दिसते. लहान-मोठया पानांच्या वेली अवखळपणे झाडांच्या फांद्यांशी लगट करत आकाशात डोकावताना दिसतात. पाखरांच्या किलबिलाटाला झर्‍याच्या खळखळाटाची साथ घेत अवघ्या सृष्टीत रंग, गंध आणि नाद असा मनमोहक नादोत्सव रंगतो, तोही याच श्रावण महिन्यात. आणि म्हणूनच कदाचित या महिन्याला धार्मिकदृष्टया जास्त महत्त्व लाभले असावे. श्रावण म्हणजे खरे तर उत्सवांच्या तोरणमाळेचा आरंभ. नागपंचमीपासून सुरू होणारा हा उत्सवांचा पर्वकाळ रक्षाबंधन-नारळी पौर्णिमा, गोकुळाष्टमीच्या भरगच्च कार्यक्रमांपाठोपाठ गणपतीच्या आगमनासाठी सिद्ध झालेला असतो.

गणपतीपाठोपाठ येतात नवरात्री, दसरा आणि दिवाळी. थोडक्यात काय, तर श्रावणसरींच्या साथीने आपले जीवन ‘उत्सवी’ होण्यास सुरुवात झालेली असते. या उत्सवी काळामध्ये आपले जगणे-वागणेही संयमी असावे, या अपेक्षांमधूनच खरे तर श्रावण महिन्यातील जप-तप आणि खाणे-पिणे आदींवर बंधने आली असावीत, पण आमच्याकडे या लोकरूढींकडे शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहण्याची पद्धतच नाही. त्यामुळे श्रावणातील निसर्गसंपन्न जगण्याला आम्ही कर्मकांडाच्या फेर्‍यात अडकवून मोकळे होतो. त्यामुळे ना स्वत:चा, ना समाजाचा फायदा होतो.

मग अशा प्रसंगी जर आम्ही रूढी-परंपरांना सामाजिक समस्यांशी जोडले तर खूप मोठे काम होऊ शकते. फार दूर कशाला जायचे, आज  नागपंचमी आहे. त्यापाठोपाठ श्रावणी सोमवार येईल. या दिवसांमध्ये देशातील लक्षावधी माता-भगिनी नागाच्या मूर्तीवर आणि शंकराच्या पिंडींवर कोटयवधी लिटर दुधाचा अभिषेक करतील. आम्ही ज्यावेळी दुधाची धार शंकराच्या पिंडीवर धरू त्यावेळी आमच्या देशातील भुकेने तडफडणार्‍या गोरगरिबांच्या लेकरांचा चेहरा डोळयासमोर आणला पाहिजे. शिवपिंडीवर केलेला दूध, तूप वा मधाचा अभिषेक प्रत्यक्ष शंकराला पोहोचतो की नाही, हे मला ठाऊक नाही, परंतु स्वामी विवेकानंदांनी सांगितल्याप्रमाणे जर ‘जीवसेवा हीच शिवसेवा’ असेल तर आम्ही ही दूध-तूप आणि दह्याची धार भुकेने मरणार्‍या लोकांपर्यंत नेणे गरजेचे आहे.

आज आपल्या देशातील एकूण मुलांच्या निम्मी मुले म्हणजे जवळपास सहा कोटी बालके दुबळी, कमी वजनाची आहेत. ४५ टक्के मुले त्यांच्या वयाच्या तुलनेत छोटी दिसतात. ७५ टक्के मुले अ‍ॅनेमिक आणि २० टक्के कुपोषित असलेली दिसतात. आपल्या देशातील भले-भले लोक भारताला महासत्ता बनवण्याची ‘स्वप्ने’ पाहत आहेत, पण ज्या चीनशी आम्हाला स्पर्धा करायची आहे, तेथील कुपोषित बालकांच्या पाच पट कुपोषित मुले ज्या देशात आहेत, तो आपला भारत देश बलाढय चीनशी टक्कर कसा देणार, याचे उत्तर मात्र त्यांच्यापाशी नसते.

मंदिरातील देवी-देवतांवर कुणी खर्च करीत असेल तर त्याला आक्षेप घेण्याचे कारण नाही, परंतु जो धर्म माणुसकी विसरतो, त्याला  त्याला आम्ही धर्म म्हणावे का? जे लोक गोरगरीब लोकांचे अश्रू पुसण्याऐवजी देवदर्शनासाठी तासन् तास रांगेत तिष्ठत असतात, त्यांना मिळणारे दर्शन हे ‘दर्शन’ नसते तर श्रद्धेचे मनात ‘प्रदर्शन’ असते का, असे अनेक प्रश्न श्रावणाच्या आगमनाने मनात उभे राहिले आहेत.. कवींना प्रतिभेची, कलाकारांना नवसृजनाची, शेतक-यांना हिरव्या दानाची आणि पाखरांना मधुरगानाची देणगी      देणा-या श्रावणाकडून आपणही चांगल्या ‘मार्गदर्शना’ची अपेक्षा करू या!

(पूर्वप्रकाशित )

Follow us on twitter : @MaheshMhatre

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

Trending Now