धाडसी आणि स्वागतार्ह

Sachin Salve
बशीर जमादार, डेप्युटी न्यूज एडिटर, आयबीएन लोकमत

मणिपूर हल्ल्याचा बदला घेण्यासाठी म्यानमारमध्ये जाऊन अतिरेक्यांचा खात्मा करण्याचं मोदी सरकारचं पाऊल निश्चितच स्वागतार्ह आहे. अतिरेकी हल्ल्यानंतर केवळ इशारे आणि निषेधाची पारंपरिक चौकट मोडत इच्छाशक्ती असेल तर भारत काय करू शकतो, हे मोदींनी दाखवून दिलंय.

दुसर्‍या देशाच्या हद्दीत जाऊन अशी कारवाई करण्यासाठी एक तर आपला तेवढा दरारा हवा किंवा इतर देशासोबत चांगले संबंध हवेत. पहिली गोष्ट आपण कधी साध्य करूच शकलो नाही. दुसर्‍या गोष्टीवर मोदींनी जाणीवपूर्वक भर दिलाय, हे स्तुत्य आहे.

आपल्या लष्कराची ताकद अफाट आहे. पण राजकीय नेतृत्वाच्या कचखाऊ धोरणामुळे सैनिकांनी कमावलेलं आपण नेहमीच गमावलंय. पाकिस्ताननं घुसखोरी केल्यानंतर भारतानं त्याला नेहमी प्रत्युत्तर दिलं. पण ती प्रतिक्रियात्मक कारवाई होती. आपल्या जवानांवर अत्याचार झाला म्हणून आपल्या सरकारचं रक्त कधी उसळलं नाही. मग समोर अतिरेकी असोत किंवा पाकचे सैनिक. त्यामुळेच आताच्या ऑपरेशन म्यानमारनंतर सैन्यदलाचं नैतिक मनोधैर्य वाढेल, हे नक्की. हा आपल्यासाठी इशारा हे पाकिस्तान वरकरणी मान्य करणार नाही. पण पाकिस्तानला याकडे दुर्लक्षही करता येणार नाही.

कोणत्याही अतिरेकी हल्ल्यांनंतर पुराव्यांचं बाड देऊन कारवाईची वेडी अपेक्षा करण्यापलीकडे दहशतवादाच्या मुद्दयावर भारतानं कडक म्हणता येईल असं कधी काही केलं नाही. पाकिस्ताननं अशा पुराव्यांना नेहमीच केराची टोपली दाखवलीय. इशारे देण्यापलीकडे भारत काहीच करणार नाही, आणि कधी काही करण्याची इच्छा झालीच तर अमेरिकेचा दबाव वापरून भारताला शांत करता येतं, हे पाकिस्तान जाणून होता. अशा पाकिस्तानला योग्य तो संदेश देणं गरजेचं होतं. तो देण्यासाठी आपल्याला अनेक दशकं लागली. पण आता देर आए दुरूस्त आए म्हणायला हरकत नाही.

केवळ पाकिस्तानच नाही ईशान्य भारतातल्या फुटीरतावादी संघटनांना बळ देऊन भारताला अस्थिर ठेवण्याचा प्रयत्न करणार्‍या चीनलाही हा इशारा आहे. भारताच्या शेजारी देशांना हाताशी धरून भारताला जखडून टाकण्याचा चीनचा डाव आहे. त्यासाठी या देशांमध्ये चीननं मोठी आर्थिक गुंतवणूक केलीय. रस्ते, बंदर, वीज यासारख्या पायाभूत सुविधांमध्ये चीननं मोठा पैसा ओतलाय. पण मुळात चीनची भूमिका विस्तारवादी आणि दादागिरीची असल्यानं या देशांसाठी चीन एके दिवशी डोईजड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा स्थितीत भारताच्या भूमिकेला विशेष महत्त्व आहे. दुसर्‍या देशांप्रती भारताचा इतिहास आणि चारित्र्य धुतल्या तांदळासारखा आहे. पण तरीही या देशांमध्ये विश्वास निर्माण करायला आणि दक्षिण आशियात मोठ्या भावाची भूमिका निभवायला भारत कमी पडलाय. पण, आता संधी आहे. चीनपेक्षा भारताची मैत्री कशी दीर्घकालीन फायद्याची आहे, हे आपण या देशांना पटवून द्यायला हवं. मोदी सरकारचं लक्ष्य तसं असल्याचं दिसतं.

सरकारच्या या रणनीतीकडे पक्षीय राजकारणाचा चष्मा लावून बघणं अन्यायकारक होईल. शेवटी इच्छाशक्ती महत्त्वाची आहे. आणि ती याबाबतीत तरी मोदींनी दाखवून दिलीय. त्यासाठी निश्चितच ते कौतुकाला पात्र आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

Trending Now