Home /News /ahmednagar /

PM केअर फंडात अडीच लाख देऊनही हाती निराशाच; मरणाच्या दारातील आईला नाही मिळाला बेड

PM केअर फंडात अडीच लाख देऊनही हाती निराशाच; मरणाच्या दारातील आईला नाही मिळाला बेड

पारेख यांनी पीएम केअर फंडात (PM Care Fund) अडीच लाखाची मदत केली. मात्र, आता मरणाच्या दारात उभा असलेल्या त्यांच्या आईलाच बेड मिळत नसल्यानं ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी एक भावनिक सवाल केला आहे.

    अहमदनगर 25 मे: मागील वर्षी मार्च महिन्यात देशात कोरोना (Coronavirus) विषाणूचा शिरकाव झाला. रुग्णांची संख्या वाढत असल्याचं दिसताच केंद्र सरकारनं लॉकडाऊनची (Lockdown) घोषणा केली आणि याचा परिणाम अनेकांवर झाला. अचानक झालेल्या या लॉकडाऊनच्या घोषणेचा गरीब कामगार वर्गावर मोठा परिणाम झाला. लॉकडाऊनमुळे कामंही बंद झाल्यानं या कामगारांना दोन वेळचं जेवण मिळणंही अवघड झालं आणि या कठीण काळात कामगारांनी पायीच आपल्या गावाची वाट धरली. या भयानक स्थितीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) देशातील नागरिकांना मदतीचं आवाहन केलं. या काळात अनेकांनी आपल्याला शक्य होईल तितकी मदत पीएम केअर फंडात (PM Care Fund) दान केली. यात अहमदनगरच्या विजय पारेख यांचाही समावेश आहे. पारेख यांनी पीएम केअर फंडात अडीच लाखाची मदत केली. मात्र, आता मरणाच्या दारात उभा असलेल्या त्यांच्या आईलाच बेड मिळत नसल्यानं ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी एक भावनिक सवाल केला आहे. विजय पारेख (Vijay Parikh) यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, मी पीएम केअर फंडमध्ये 2.51 लाख रुपयांची रक्कम जमा केली. मात्र, मरणाच्या दारात असलेल्या माझ्या आईसाठी बेड उपलब्ध झाला नाही. कृपया मला मार्गदर्शन करा, की कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता मी कुठे मदत करू शकतो. जेणेकरुन मला बेड मिळेल आणि मी आणखी माणसं गमावणार नाही. पारेख यांचं हे भावनिक करणारं ट्विट सध्या चांगलच व्हायरल होत आहे. या ट्विटमध्ये विजय यांनी पीएम केअर फंडमध्ये जमा केलेल्या रकमेची पावतीदेखील शेअर केली आहे. देशावर संकट आलं तेव्हा पारेख यांनी आपल्यापरीनं या संकटकाळात देशाला मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. मात्र, जेव्हा आपली माणसं मरणाच्या दारात उभा असताना पारेख यांना मदत मिळाली नाही, तेव्हा ते हतबल झाले. पारेख यांच्या या ट्विटला अवघ्या काही तासांतच भरपूर लाईक्स आणि रिट्विट मिळाले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात अक्षरशः थैमान घातलं. या कठीण काळात आरोग्य सुविधांच्या अभावामुळे अनेकांनी प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला. आपल्या रुग्णाला बेड आणि ऑक्सिजन मिळावा यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांनाही तासंतास रांगेत उभा राहावं लागलं. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अनेकांनी आपले जीव गमावले. अशाच परिस्थितीचा सामना विजय पारेख यांनीही केला. आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं चित्र असलं तरी मृतांचा आकडा मात्र कमी झालेला नाही. त्यामुळे, अजूनही देशात चिंतेचं वातावरण आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Coronavirus, Lockdown, Narendra modi

    पुढील बातम्या