बँकेत तारण ठेवलेलं सोनं निघालं बनावट; नगरमधील अर्बन बँकेला कोट्यवधींचा चुना

बँकेत तारण ठेवलेलं सोनं निघालं बनावट; नगरमधील अर्बन बँकेला कोट्यवधींचा चुना

Crime in Ahmednagar: अर्बन बँकेत तारण ठेवलेलं सोनं बनावट असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोन्याचा लिलाव सुरू असताना पहिल्या पाच पिशव्यांत बनावट सोनं निघालं आहे.

  • Share this:

अहमदनगर, 24 जून: बेकायदा कर्ज वाटपामुळे अगोदरच वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या अर्बन बँकेत आणखी एक घोटाळा समोर आला आहे. अर्बन बँकेत तारण म्हणून ठेवलेलं सोनं बनावट असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्जदारांनी थकीत कर्ज न भरल्यानं तारण ठेवलेल्या सोन्याचा लिलाव सुरू असताना पहिल्या पाच पिशव्यांतच बनावट सोनं असल्याचं समोर आलं आहे. या गैरप्रकारानंतर लिलावस्थळी एकच गोंधळ उडाला होता. यामुळे बँक प्रशासनावर लिलाव थांबवण्याची वेळ आली. बँकेनं या सोनेतारण कर्जाचा काहीही तपशील जाहीर केला नसला तरी हा आकडा  कोट्यवधीच्या घरात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अर्बन बँकेच्या शेगाव शाखेतून मोठ्या प्रमाणावर सोने तारण कर्ज वाटप झालं आहे. मात्र कर्जाचा भरणाच केला गेला नाही. त्यामुळे बुधवारी बँकेच्या नगर मुख्यालयात सोन्याच्या 364 पिशव्यांचा लिलाव करण्यात येत होता. दरम्यान पहिल्या पाच पिशव्यात बनावट सोनं आढळून आलं आहे. त्यामुळे संपूर्ण लिलाव स्थगित करण्यात आला आहे. संबंधित पाच पिशव्यात सोन्याऐवजी बेन्टेक्सचे दागिने असल्याचं निष्पन्न झालं आहे.

संबंधित बनावट दागिन्यांवर दिलेल्या कर्जाची रक्कम कोट्यवधीच्या घरात असल्याचं मत बँक बचाव समितीकडून व्यक्त करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे  2018 पासून अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेत संशयास्पद सोने तारण व्यवहार सुरू असल्याची कल्पना वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली होती. पण वरिष्ठांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचं बँकेच्या एका सभासदानं म्हटलं आहे. त्यामुळे या घोटाळ्यात बँकेचे वरिष्ठ अधिकारीही गुंतले असल्याचा संशय निर्माण झाला आहे.

हेही वाचा- बँकेतील कर्मचाऱ्यानेच खातेदारांच्या पैशावर मारला डल्ला, धक्कादायक प्रकार उघड

दरम्यान गोंधळ निर्माण झाल्यानं बँकेत पोलिसांना पाचारण करण्यात आलं. तसेच समितीच्या सदस्यांनी प्रश्नांचा भडिमार सुरू केल्यानं प्रशासकांना बँक सोडून निघून जावं लागलं आहे. यावेळी नगर अर्बन बँकेचे प्रशासक महेंद्र कुमार रेखी म्हणाले की, 'बँकेत तारण ठेवलेलं सोनं बनावट आढळलं आहे. पंचनामा झाल्यानंतर तपशील जाहीर केला जाईल. त्याचबरोबर दोषींवर गुन्हे दाखल केले जातील. बँकेचा कारभार सुरळीत करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून तातडीनं कर्जवसुली करण्यात येत आहे.'

Published by: News18 Desk
First published: June 24, 2021, 8:26 AM IST

ताज्या बातम्या