सोलापूर, 22 मे : साखर कारखाने सुरू होण्याच्या सुरूवातीला राज्यातील ऊसतोड मजूरांचा (Sugarcane laborer) प्रश्न नेहमी येत असतो. ऊसतोड मजूरांच्या मागण्याकडे राज्यातील साखर कारखानदार (sugar factory) असोत किंवा राज्य सरकार असो यांच्याकडे कोणी लक्ष देत नसते. दरम्यान राज्यात लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची स्थापना करण्यात आली याद्वारे ऊसतोड मजुरांना मदत दिली जाते. दरम्यान राज्यातील ऊसतोड मजूरांनी टनाला 10 रुपये देऊन नोंदणी केल्यास त्यात राज्य सरकार आणखी 10 रुपये अनुदान म्हणून देणार असल्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, ऊसतोड मजूर हा ऊसतोडणीसाठी काबाडकष्ट करतो. अंधारात पहाटे उठून ऊस तोडून साखर कारखान्यांना पोहोच करण्याचे काम करतो. लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळातर्फे ऊसतोड कामगारांना न्याय मिळवून देणार असल्याचे मुंडे म्हणाले.
हे ही वाचा : सासऱ्यावर जडलं प्रेम, दोन मुलांना टाकून फरार; निराश झालेल्या पतीनं उचललं टोकाचं पाऊल
मुंडे म्हणाले की, ऊसतोड कामगारांच्या खूप व्यथा आहेत. या व्यथा सोडविण्यासाठी कामगार विभागाकडे जाणारे हे महामंडळ सामाजिक न्याय विभागाकडे घेतले आहे. महामंडळाच्या माध्यमातून प्रत्येक नोंदणीकृत कामगारांचा विमा उतरविला जाणार आहे. महिलांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे.
ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी प्रत्येक तालुक्यात वसतीगृहांची उभारणी करण्यात येत आहे. यासाठी ऊसतोड कामगारांनी महामंडळाकडे त्वरित नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. प्रती टन 10 रूपये कामगारांनी महामंडळाकडे जमा केल्यास शासन 10 रूपये देणार आहे. यातून कामगारांचा विकास करण्याचे शासनाचे धोरण आहे.
हे ही वाचा : weather update : मुंबईकरांना मान्सूनपूर्व पावसाचा दिलासा, तर 'या' तारखेला मुसळधार पावसाचा IMD चा इशारा
महामंडळामार्फत साखर कारखान्यांच्या सहकार्याने शंभर टक्के ऊस तोडणी कामगार, मुकादम, वाहतूकदारांची नोंदणी करण्यात येणार आहे. त्यांना ओळखपत्र, बांधकाम कामगारांच्या धर्तीवर कल्याणकारी योजना व सामाजिक सुरक्षा लागू करण्यात येणार असल्याचेही मुंडे यांनी सांगितले.
यावेळी सोलापूर जिल्ह्यात मुंडे यांच्या हस्ते कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. 2022-23 या वर्षासाठी ऊसतोडणीसाठी मुकादम, वाहनमालक यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dhananjay munde, Sugarcane in maharashtra, ऊसतोड महामंडळ, साखर कारखाने