मुंबई, 11 मे : राज्यात उसतोडीचा हंगाम साधारण दिवाळीनंतर सुरू होतो. पश्चिम महाराष्ट्रात उसपट्टा क्षेत्र मोठे असल्याने या भागात ऊस तोडीची यंत्रणा मोठ्या प्रमाणात राबवली जाते. यामुळे या भागातील ऊस हा मार्चमध्येच संपतो. पण राज्यातील काही भागात अद्यापही ऊसाच्या तोडी सुरू आहेत. यामुळे ऊस उत्पादक शेतकरी (sugarcane farmer) संकटात येण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात वादळाचे संकेत (cyclone) असताना मान्सून (monsoon) लवकर सुरू होण्याचा अंदाज हवामान खात्याच्या विभागाने वर्तवला आहे. यामुळे महाराष्ट्रातील ज्या भागातील ऊस शिल्लक राहिला आहे त्या भागातील साखर उद्योगाच्या चिंतेत भर पडली आहे. याचे कारण म्हणजे 23 लाख टन उसाचे गाळप अद्यापही होणे बाकी आहे. इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना साखर आयुक्त शेखर गायकवाड (sugar Commissioner shekhar gaikwad) म्हणाले की, राज्यातील पाच कारखान्यांना मान्सून येईपर्यंत जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत गाळप सुरू ठेवावे लागणार आहे.
2021-22 चा ऊस गाळप हंगाम बंपर पद्धतीने या उसाचे मार्किंग करण्यात आले आहे. यंदाच्या वर्षी राज्याने साखर उत्पादनाचे सर्व विक्रम मोडीत निघण्याची शक्यता आहे. 9 मे पर्यंत राज्यात 1,288.52 लाख टन उसाचे गाळप झाले असून 134.28 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्यात दिवाळीनंतर 198 साखर कारखाने सुरू करण्यात आले होते त्यापैकी 106 कारखान्यांचा हंगाम संपला आहे. 23 लाख टन ऊस शिल्लक असताना, अंतिम साखर उत्पादनाचा आकडा 135 लाख टनांवर जाण्याची शक्यता असल्याचे मत गायकवाड यांनी सांगितले.
साखर आयुक्तांच्या अंदाजानुसार राज्यातील जवळपास सर्वच कारखान्यांचा हंगाम मे अखेर संपणार आहे. परंतु बीड, जालना आणि उस्मानाबादमधील पाच कारखाने जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत सुरू राहणार आहेत. मान्सून नेहमीपेक्षा लवकर येण्याची अपेक्षा असल्याने, कारखान्यांमधील यंत्रणा मोठ्या प्रमाणात राबवून उसतोडणी आणि गाळप लवकरात लवकर पूर्ण करावं लागणार आहे. महाराष्ट्रातील साखर उद्योगाच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्यात पावसाळ्याच्या अगदी सुरुवातीपर्यंत गाळप होणार आहे.
गायकवाड म्हणाले की, मान्सून येण्यापूर्वी कारखान्यांचे गाळप पूर्ण व्हावे यासाठी राज्य सरकारने योजना आखली आहे. या हंगामात, मान्सून नेहमीपेक्षा लवकर येण्याची अपेक्षा आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे उसाचे पीक नुकसानीत जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारला उभ्या पिकासाठी शेतकऱ्यांना अनुदान द्यावे लागण्याची शक्यता आहे. या योजनेनुसार जालन्यातील 1 लाख टन ऊस गाळपासाठी अहमदनगर, परभणी, बुलढाणा आणि औरंगाबाद येथील सहा कारखान्यात हा ऊस गाळप केल्यास परिस्थिती नियंत्रणात येणार आहे.
तसेच उस्मानाबादमधून ७५ हजार टन ऊस सोलापूरला, तर औरंगाबादहून ६१ हजार टन ऊस इतर भागात वळवण्यात येणार आहे. साताऱ्यात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केलेल्या कारवाईमुळे वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या जरंडेश्वर कारखान्यामध्ये ३० हजार टन उसाचे गाळप होण्याची शक्यता असल्याचे गायकवाड म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sugar facrtory, Sugarcane, Sugarcane farmer, Sugarcane in maharashtra, Sugarcane Production