S M L

निवडणूक लढवायला किती लागतो पैसा ?

Sachin Salve | Updated On: Jan 23, 2017 07:19 PM IST

 निवडणूक लढवायला किती लागतो पैसा ?

23 जानेवारी :  जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी उमेदवारांच्या खर्चावर निवडणूक आयोगाने मर्यादा घातलीय.  एवढ्या कमी पैशात निवडणूक लढवणं शक्य नाही, असं उमेदवारांचं म्हणणं आहे. पण कमी पैशातही निवडणूक लढवता येणं शक्य आहे, असं मत ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केलंय.  मतदारांना पैसे वाटायची सवय राजकीय पक्षांनीच लावली, असा या अनुभवी नेत्यांचा आरोप आहे .

जिल्हा परिषदेच्या उमेदवारासाठी निवडणूक खर्चाची मर्यादा 3 लाख रुपये आहे तर पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी  2 लाख रुपयांची मर्यादा आहे. खर्चाची ही मर्यादा वाढवून मिळावी  अशी मागणी सर्वच पक्षाच्या संभाव्य उमेदवारांनी केलीय.

एखाद्या उमेदवाराला प्रचारासाठी दिवसभर गाडी फिरवायची म्हटली तरी त्यासाठी ३ हजार रुपये खर्च येतो. प्रचाराची ही गाडी महिनाभर फिरवायची तर एक लाख रुपये गाडीसाठीच खर्च होणार, प्रचारसभा, पत्रकांचं प्रिंटिंग, पोस्टर्स आणि कार्यकर्त्यांच्या चहापानाचा खर्च एवढं सगळं लक्षात घेता ही खर्चाची मर्यादा वाढवून मिळावी, अशी मागणी शिवसेनेचे संभाव्य उमेदवार बाबू म्हाप यांनी केलीय.

उमेदवारांचं हे म्हणणं काही ज्येष्ठ नेत्यांना मात्र पटत नाहीये. मतदारांना पैसे वाटून मतं विकत घ्यायची सवय राजकीय पक्षानीच लावली. त्यामुळेच हा खर्च वाढतो, असं परखड मत शिवसेनेचे माजी आमदार अप्पा साळवी यांनी व्यक्त केलं.

आपण परिस्थितीच अशी निर्माण करून ठेवलीय की मतदारांना मतांसाठी लालूच दाखवली जाते.  हा एवढे पैसे देतो, तुम्ही तेवढे द्या, अशी मागणी मतदारच करतात. पूर्वी लोक देणारे होते, आज घेणारे आहेत, असाही आरोप अप्पा साळवी यांनी केलाय.

राजकीय नेत्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार,जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवार कमीत कमी 15 लाख रुपये खर्च करतात. मतांच्या फोडाफोडीच्या राजकारणात हा खर्च 20 ते 25 लाख रुपयांपर्यंत जातो. अशा वेळेस खर्चाची बनावट विवरण पत्रंही तयार केली जातात.

निवडणूक कोणतीही असली तरी अगदी पक्षाकडे उमेदवारी मागण्यापासून ते निवडून येईपर्यंत प्रत्येक टप्प्यावर लाखो रुपये मोजावे लागतात ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे निवडणूक खर्चाची मर्यादा ही आता केवळ कागदावरच राहिलीय, असंच म्हणावं लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 23, 2017 07:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close