S M L

देवेंद्र फडणवीस सरकारची 2 वर्षं, नागपूरमध्ये भाजपची सभा

Samruddha Bhambure | Updated On: Oct 31, 2016 07:41 PM IST

देवेंद्र फडणवीस सरकारची 2 वर्षं, नागपूरमध्ये भाजपची सभा

 

31 ऑक्टोबर :  देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला दोन वर्षं पूर्ण झालीयत. त्यानिमित्ताने नागपूरमध्ये भाजपची मोठी सभा आयोजित करण्यात आली होती. नागपूरमधल्या सभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती होती.

नागपूरमध्ये हे सेलिब्रेशन होत असताना विरोधकांनी मात्र सरकारवर जोरदार टीका केलीय. हे सरकार म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे, असं विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय. या दोन वर्षांत देवेंद्र फडणवीस यांचं सरकार सगळ्याच पातळ्यांवर अपयशी ठरलंय, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलीय.

भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झालीय, असं विखे पाटील यांचं म्हणणं आहे. सरकार कृतीपेक्षा घोषणांवरच जास्त भर देतंय, असा टोलाही त्यांनी मारला. हे सरकार म्हणजे नुसता घोषणांचा पाऊस आणि कृती शून्य, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही केलीय.

दुसरीकडे भाजपच्या सभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आज नागपूर विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आलं. सरकारला 2 वर्षं पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी राज्यातल्या जनतेचे आभार मानले. राज्यातली 5 हजार 200 गावं दुष्काळमुक्त केली हे सरकारचं सगळ्यात मोठं यश आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

महाराष्ट्रावर साडेतीन लाख कोटींचं कर्ज असूनही आम्ही महाराष्ट्राला समृद्धीच्या मार्गावर नेलं, असं मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्र हे देशातलं अग्रेसर राज्य आहे, असा दावा त्यांनी केला. डिजिटल क्रांतीच्या मार्गावर राज्याला पुढे नेण्याचा निश्चय आम्ही केलाय, असंही त्यांनी सांगितलं. नागपूर- मुंबई समृद्धी एक्सप्रेस वे खालून 4 पाईपलाईन टाकण्यात येणार आहेत, अशी घोषणा त्यांनी केलीय.

महाराष्ट्रात आता वेगवान सरकार आलं आहे, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. मधल्या काळात लकवा छाप सरकार सत्तेत होतं, आता तसं नाही, असं म्हणत गडकरींनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना टोला मारला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच आघाडी सरकारला लकवा सरकार असं म्हटलं होतं. त्याचीच आठवण नितीन गडकरींनी करून दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 31, 2016 07:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close