S M L

जन्मदात्यानेच आपल्या मुलांना 15 वर्षं ठेवले होते डांबून !

Sachin Salve | Updated On: Oct 20, 2016 08:32 PM IST

जन्मदात्यानेच आपल्या मुलांना 15 वर्षं ठेवले होते डांबून !

 नाशिक, 20 ऑक्टोबर : पंचवटी भागातल्या जुन्या वाड्यातून एका भावा-बहिणीची सुटका करण्यात आलीय. या सख्ख्या भावंडांना गेल्या 14-15 वर्षांपासून एका खोलीत कोंडून ठेवण्यात आलं होतं. धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्या वडिलांनीच त्यांना कोंडून ठेवलं होतं. वाड्यातून सुटका करण्यात आलेले चाळीशीचे श्रीराम पुराणिक हे इंजिनियर आहेत. ते नाशिकच्याच एका कंपनीत प्रॉडक्शन इंजिनियर म्हणून काम करत होते.

श्रीराम पुराणिक यांच्यासोबत त्यांची बहीणही राहते. ती दहावीपर्यंत शिकलेली आहे. या दोघांचे वडील अरुण पुराणिक हे महिंद्रा कंपनीचे सुरक्षारक्षक होते. त्यांच्यावर नोकरीच्या ठिकाणी चोरीचा आरोप झाला. त्यामुळे त्यांना नोकरी सोडावी लागली. त्यांचा मुलगा श्रीराम इंजिनिअर झाला आणि त्याला एका कंपनीत नोकरी लागली. पण काही काळाने त्यालाही नोकरीतून काढून टाकण्यात आलं. या सगळ्या घटनांमुळे हे पूर्ण कुटुंबच नैराश्याच्या खाईत ओढलं गेलं. आपल्यावर हा कलंक असल्याने कुणालाही तोंड दाखवण्यासाठी जागा राहिलेली नाही, अशी या कुटंुबीयांची भावना झाली.

अरुण पुराणिक हे आपल्या मुलांना खोलीत कोंडून ठेवून गोदावरीच्या काठावर भीक मागायला जायचे. या दोन्ही भावंडांच्या जेवणा-खाण्याची व्यवस्था करायचे. या दोघांना ते खिडकीतूनच खायला द्यायचे आणि खोलीचं कुलूप त्यांनी कधीच उघडलं नाही. इतकी वर्षं हा प्रकार कुणाला कळलाही नव्हता. आता मात्र शेजारच्यांच्या हे लक्षात आलं तेव्हा त्यांनी पोलिसांना सांगितलं. पंचवटी पोलिसांनी श्रीराम पुराणिक आणि त्यांच्या बहिणीला आता जिल्हा रुग्णालयात दाखल केलंय.

श्रीराम पुराणिक आणि त्यांच्या बहिणीचा अवतार पाहिला तर कुणाच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. श्रीराम पुराणिक यांची लांबच लांब वाढलेली दाढी, विचित्र हातवारे करत बोलणं पाहिलं तर त्यांची मानसिक स्थिती चांगली नाही हे लगेच लक्षात येतं. त्यांच्या बहिणीचीही अवस्था फारशी चांगली नाही. त्यांचा हा वाडा मध्यवस्तीत आहे आणि या वाड्यातले नातेवाईक, शेजारी यापूर्वीच त्यांना सोडून गेलेत. श्रीराम पुराणिक यांचे वडील अरुण पुराणिक यांनाही उपचारांची गरज असल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 20, 2016 08:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close