S M L

एक "सोपा" माणूस गेला !

पत्रकारितेवर आणि मनस्वी पत्रकारांवर मनापासून प्रेम करणारे ज्येष्ठ संपादक सोमनाथ पाटील यांचे निधन हा मराठी पत्रकारितेसाठी फार मोठा धक्का आहे. मराठीत ते सही करताना फक्त "सो.पा." असे दोनच शब्द लिहायचे. आताच्या कठीण काळात असा 'सोपा' माणूस पुन्हा मिळणार नाही.

Sachin Salve | Updated On: Nov 16, 2017 07:14 PM IST

एक

महेश म्हात्रे, कार्यकारी संपादक, आयबीएन लोकमत

ज्यांनी बातमी लिहायला शिकवली, पत्रकारिता का आणि कशी  करावी याची बाराखडी पाठ करवून घेतली त्या "ज्येष्ठ संपादक सोमनाथ पाटील यांचे दुःखद निधन", ही ओळ लिहिताना आज  मनात अनंत आठवणींचा समुद्र उसळला आहे.  ही बातमी खोटी ठरावी यासाठी केलेल्या दोन्ही फोनमधून मनाविरोधात माहिती मिळाली आणि निराशेच्या अगणित लाटा डोळे भिजवून गेल्या.  जेमतेम दोन आठवड्यांपूर्वी त्यांच्या सायनच्या घरी झालेली भेट आणि त्यांनी मारलेल्या गप्पामधील अगदी शब्दनशब्द आठवतोय. त्यांनी आवर्जून सही करून दिलेला विसाव्या शतकातील महान व्यक्तिमत्त्वांच्या मुलाखतीचा दुर्मिळ ग्रंथ आणि त्याचा इतिहास सांगताना फुलून आलेला त्यांचा चेहरा आठवतोय. आणि त्याहीपेक्षा आठवतोय २६ वर्षांपूर्वीचा त्यांच्या भेटीचा पहिला दिवस.

पत्रकारितेत येण्यासाठी धडपडणाऱ्या माझ्यासारख्या गाव-खेड्यातील मुलाला त्यांनी संपादक राधाकृष्ण नार्वेकर यांच्यापर्यंत पोहचवले आणि तेथेच न थांबता, दररोजच्या कामात अगदी हात धरून शिकवले. घरातील वडीलधाऱ्या माणसाप्रमाणे कधी चांगले काम केल्यावर जाहीर कौतुक केले आणि चुकांसाठी सगळ्यांसमोर अक्षरशः धपाटे घातले. म्हणूनच पत्रकारितेवर आणि मनस्वी पत्रकारांवर मनापासून प्रेम करणारे ज्येष्ठ संपादक सोमनाथ पाटील यांचे निधन हा मराठी पत्रकारितेसाठी फार मोठा धक्का आहे. खासकरून आज जेव्हा पत्रकारितेचे वेगाने व्यावसायिकरण होत आहे, वृत्तपत्र हे साबण किंवा लोशन प्रमाणे एक उत्पादन, प्रॉडक्ट बनले किंवा बनवले आहे, त्याकाळात बड्या सरकारी नोकरीला, पर्यायाने आलिशान जीवनशैलीला लाथ मारून पत्रकारितेचा वसा घेणारे दुर्मिळ आहेत.

सोमनाथ पाटील यांचा सत्कार करताना राधाकृष्ण नार्वेकर, महेश म्हात्रे

सोमनाथ पाटील यांचा सत्कार करताना राधाकृष्ण नार्वेकर, महेश म्हात्रे

पाटीलसाहेबांच्या बोलण्यातून नेहमी त्यांचे धुळे जिल्यातील गोताणे  गाव, शासकीय विद्यानिकेतनातील दिवस, रशियातील शिक्षणाचा काळ आणि सरकारी नोकरीतील उच्च पदावरील आठवणी ऐकत ऐकत माझ्यासारखे अनेक पत्रकार मोठे झाले. त्यांचा स्वभाव अगदी मस्त, बिनधास्त. उगाच कुठला आव नाही आणि आपण सर्वज्ञ असल्याचा भाव नाही. मला ते नेहमीच जवळचे वाटायचे कारण  त्यांच्या बोलण्यात ग्रामीण भागातील लोकांच्या स्वभावाप्रमाणे मोकळेपणा असायचा, त्यामुळे त्यांच्याशी बोलताना मनावर कधी ताण येत नसे...

नुकत्याच झालेल्या भेटीत सुद्धा आम्ही खूप गप्पा मारल्या, मला आणि शिवाजी धुरी साहेबांना त्यांनी आग्रह करून वहिनींच्या हातचे फराळाचे पदार्थ खाऊ घातले. पुन्हा लवकरच भेटण्याचे ठरवून आम्ही त्यांचा निरोप घेतला, पण आज तो निरोप अखेरचा होता हे लक्षात येतंय. आज दीर्घ आजारानं पाटीलसाहेबांचे निधन झालं आणि एक निरपेक्ष नातं भूतकाळ झालं.

गेल्या अनेक वर्षांपासून पाटीलसाहेब पुण्यनगरी वर्तमानपत्रात लोकप्रिय सदर लिहायचे. त्यांची वेगळी दृष्टी, ओघवती भाषा, पत्रकारितेला वाहून घेणं, त्याचसोबत त्यांचं व्यवस्थापन कौशल्य यामुळे मीडियामध्ये त्याचं व्यक्तिमत्त्व नेहमीच आदरणीय ठरलं. ते खूप चांगले लेखक होते. त्यांचं 'अर्बन महाराष्ट्र-अॅन ओव्हरव्ह्यू' हे पुस्तक अभ्यासकांसाठी खूपच महत्त्वाचं ठरलंय. या पुस्तकात महाराष्ट्रातलं शहरीकरण आणि राज्यांतल्या पालिकांचा इतिहास सांगितलाय. अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये हे पुस्तक अभ्यासाला होतं. त्यांनी आणखी पाच पुस्तकं लिहिली. त्यातल्या 'तिसरी मुंबई' या पुस्तकात समकालीन शहरी इतिहास, मुंबई आणि शेजारी शहरांच्या अडचणी मांडल्या होत्या. त्यांचं दुसरं पुस्तक होतं पत्रकारिता विद्या. वृत्तसंपादनावरचं हे पुस्तक पत्रकारितेच्या प्रत्येक विद्यार्थ्यानं वाचायलाच हवं.

सोमनाथ पाटील यांचं व्यक्तिमत्त्व बहुआयामी होतं. जन्माने ते खान्देशी होते. त्यांनी त्यांचं शिक्षण उत्तर महाराष्ट्रात पूर्ण केलं. पण आयुष्यातला जास्त काळ पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईत काढला. त्यांचं रशियन भाषेवर प्रभुत्व होतं. 1980 मध्ये त्यांनी कोल्हापूर सकाळच्या संपादकीय टीम आणि वार्ताहरांची घडी बसवून दिली. त्यांच्या काळात सकाळ वर्तमानपत्र स्पर्धेत अग्रेसर राहिलंय. पत्रकारितेवरच्या निस्सिम प्रेमामुळेच त्यांनी सरकारी नोकरीला रामराम ठोकला. महाराष्ट्र सिव्हिल सर्विससाठी त्यांची निवड झाली होती.

सोमनाथ पाटील यांच्या "शहरे, स्मार्ट शहरे आणि पसरती मुंबई" पुस्तकाचं राधाकृष्ण नार्वेकर आणि महेश म्हात्रे यांच्या हस्ते झालं होतं प्रकाशन

सोमनाथ पाटील यांच्या "शहरे, स्मार्ट शहरे आणि पसरती मुंबई" पुस्तकाचं राधाकृष्ण नार्वेकर आणि महेश म्हात्रे यांच्या हस्ते झालं होतं प्रकाशन

मला अजून आठवतंय, ते मी सरकारी नोकरीत जाऊ नये यासाठी खूप बोलायचे, आपल्या जुन्या आठवणी सांगायचे,  1989 मध्ये ते पनवेल पालिकेचे सीईओ होते. पण तिथे ते कंटाळले. सरकारी नोकरीतील राजकारण्यांचा हस्तक्षेप त्यांच्या पचनी पडत नव्हता. त्यांच्यातील पत्रकार त्यांना बाणेदारपणाचे सतत स्मरण देत होता. त्यात पत्रकारितेशिवाय त्यांना चैन पडेना. शेवटी त्यांनी मोठ्या पदावरील नोकरीचा राजीनामा दिला आणि पुन्हा 'सकाळ'मध्ये रुजू झाले. त्यांचे हे पत्रकारितेवरील प्रेम अखेरपर्यंत कायम होते. पत्रकारितेवरच्या प्रेमानेच आजारपणातही ते सतर्क, प्रसन्न असायचे.

अगदी शेवटच्या दिवसांतही ते मराठी आणि इंग्लिश सदर लिहिण्यात व्यग्र होते. वृत्तपत्र छोटे असो किंवा मोठे पाटीलसाहेब त्यांच्या लेखणीने ते सजवायचे. संपादकीय लिखाणात गंभीर विवेचन करणारे चटपटीत, विनोदी लेखनातही तेवढ्याच सफाईने वाचकांची मने मोहून टाकायचे.

पाटीलसर हे पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होते. त्यांच्याकडून भरपूर शिकण्यासारखं होतं. त्यांची शैक्षणिक संस्थांमध्ये महत्त्वाची भूमिका असायची. ते मुंबई पत्रकार संघाच्या पत्रकार अभ्यास वर्गाचे अधिष्ठाता होते. अनेक पत्रकारिता महाविद्यालयात ते अतिथी व्याख्याते होते.

आजारपणाला न जुमानता ते बरीच भटकंती करायचे. युएसएसआर, ग्रेट ब्रिटन, सिंगापूर, पाकिस्तान, हाँगकाँग आणि मकावमध्ये अनेक कार्यक्रमांसाठी गेले आहेत. 1987 मध्ये त्यांनी बंगलोरला सार्क परिषदेचं वार्तांकन केलं होतं. तसंच सिंगापूरच्या आसियन परिषदेलाही ते उपस्थित होते. त्यांनी हाँगकाँगचा हॅण्डओव्हर इव्हेंट कव्हर केला होता. ते पत्रकारितेतलं एक मानाचं पान. त्यामुळेच त्यांना प्रतिष्ठेता नाथ पै पुरस्कार मिळाला होता. आयुष्यभर ते अनेक सामाजिक-शैक्षणिक कार्यात व्यस्त राहिले.

सोमनाथ पाटील यांना बरेच पुरस्कार मिळाले, मानसन्मान मिळाले पण त्यांच्या जीवनात त्यांनी जपलं ते माणूसपण. मराठीत ते सही करताना फक्त "सो.पा." असे दोनच शब्द लिहायचे. आताच्या कठीण काळात असा 'सोपा' माणूस पुन्हा मिळणार नाही. पाटीलसाहेबांच्या मागे त्यांची पत्नी,सुपूत्र प्रदीप पाटील आणि सुविद्य कन्या डॉ. अनिता, जावई डॉ.भारत आहेत. त्यांना हा आघात सोसण्याचे बळ मिळो एवढीचं प्रार्थना.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 16, 2017 05:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close