S M L

पंतप्रधान कार्यालयातली 'ती' १० मिनिटं कायम लक्षात राहणारी...

वर्षभरापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गाजलेल्या निवडक भाषणाचं संकलन असलेलं 'सबका साथ सबका विकास' हे पुस्तक मी आणि माझा सहकारी मित्र अमित मोडकनं तयार केलं.

Sonali Deshpande | Updated On: Apr 17, 2017 04:39 PM IST

पंतप्रधान कार्यालयातली 'ती' १० मिनिटं कायम लक्षात राहणारी...

-अजय कौटिकवार

स्थळ : पंतप्रधान कार्यालय, संसद भवन, नवी दिल्ली.

वातावरणात कमालीचा भारलेपणा. प्रशस्त हॉलवजा खोली. सजावट साधीच, कुठलाही भपका नसलेली, तरीही रुबाबदार. मध्यभागी प्रशस्त टेबल. टेबलाच्या एका बाजूला देशभरातली वृत्तपत्रं शिस्तीत रांगेत लावलेली आणि बाजूला अशोक स्तंभाची प्रतिकृती. खोलीत आम्ही प्रवेश करताच आईए म्हणत त्यांनी आमचं स्वागत केलं. दोन-तीन वाक्यात हिंदीत मी त्यांना ओळख सांगितली आणि येण्याचं प्रयोजन स्पष्ट केलं. 'काय काय आहे पुस्तकात? चांगलं काम आहे' या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शुद्ध मराठीतल्या वाक्यानं आमचा तणाव पूर्णपणे निवळला आणि नंतरची जवळपास १० मिनिटं पंतप्रधानांसोबतचा हा मराठीतला संवाद चांगलाच रंगला.

वर्षभरापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गाजलेल्या निवडक भाषणाचं संकलन असलेलं 'सबका साथ सबका विकास' हे पुस्तक मी आणि माझा सहकारी मित्र अमित मोडकनं तयार केलं. पुण्याच्या अमेय प्रकाशनने अतिशय देखण्या रूपात हे पुस्तक प्रसिद्ध केलं. यात पंतप्रधानांची दोन वर्षातली निवडक २८ भाषणं आणि १४ 'मन की बात'चा मराठीमध्ये अनुवाद आहे. वर्षभरापासून आम्ही पुस्तक प्रकाशनासाठी पंतप्रधानांची वेळ मिळवण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र तो योग जुळून आला ११ एप्रिल २०१७ला.

 

संसदेतल्या पंतप्रधानांच्या कार्यालयात दुपारी १२.१० ही भेटीची वेळ ठरली. सुरक्षेचे सर्व सोपस्कार पूर्ण करत मी, अमित आणि आमचा आयबीएन-लोकमतचा दिल्लीतला प्रतिनिधी कौस्तुभ फलटणकर तासभर आधीच संसद भवन परिसरात दाखल झालो. ठीक १२ वाजता जेव्हा आम्ही वेटिंग रूममध्ये गेलो तेव्हा कुठं जीव भांड्यात पडला.

श्री.राजीव टोपनो हे करड्या शिस्तीचे अधिकारी तिथल्या संसद भवनातल्या पंतप्रधान कार्यालयाचे प्रभारी. त्यांनी आम्हाला काही सूचना केल्या आणि बरोबर १२ वाजून १० मिनिटांनी आम्ही पंतप्रधानांच्या खोलीत प्रवेश केला. मोदींचा स्वभाव, कडक शिस्त आणि त्यांच्या स्वभावाचे किस्से अनेकांकडून ऐकले होते. त्यामुळे एक ताणही होता.पण त्यांची देहबोली आणि मराठीतल्या संवादानं वातावरण मोकळं झालं. पुस्तकाचा विषय निघाल्यावर ते आणखीच खुलले. लगेच खुर्चीवरून उठत, चला प्रकाशन करू असं म्हणत ते बाजूला मोकळ्या जागेत जाऊन उभे राहिले. सुरुवातीला फोटो काढून झाल्यावर त्यांनी पुस्तक चाळत काही प्रश्नही विचारले. या पुस्तकातल्या महत्त्वाच्या प्रश्नांवर परिसंवाद/चर्चासत्र महाराष्ट्रात घडवून आणायला पाहिजे, असे बौद्धिक उपक्रम महाराष्ट्रातल्या लोकांना आवडतात असं कौतुकही त्यांनी केलं. माझे गुरू लक्ष्मणराव इनामदार हे महाराष्ट्रातलेच होते अशी आठवणही सांगितली.

...बार, बार गलती करना पडता है!

हा संवाद सुरू असतानाच ते पुस्तकावर स्वाक्षरीही देत होते. सही झाल्यावर तारीख टाकताना त्यांच्याकडून चुकून ११ ऐवजी १२ एप्रिल अशी तारीख लिहिली गेली.त्यामुळे इतरही पुस्तकांवर त्यांनी १२ हीच तारीख टाकली आणि म्हणाले. 'एक बार गलती हुई तो बार बार गलती करना पडता है!' या त्यांच्या वाक्यानं आम्ही सगळेच हास्यकल्लोळात बुडालो.

मोदी हे `गुड लिसनर` आहेत असं ऐकलं होतं, त्याचा अनुभव आम्हाला आला. आम्ही बोलत असताना ते प्रत्येक गोष्ट शांतपणे ऐकून घेत होते आणि प्रतिसादही देत होते. सुरक्षेच्या कारणांमुळे आम्हाला फक्त पुस्तकाच्या फक्त तीनच प्रती आतमध्ये घेऊन जायची परवानगी मिळाली. आम्ही तिघांनीही तीनही पुस्तकांवर त्यांची स्वाक्षरी घेतल्यानं त्यांना देण्यासाठी पुस्तकच राहिलं नाही, हे आमच्या काही लक्षात आलं नाही.जाताना तेच म्हणाले, माझ्यासाठीही एक प्रत ठेवा, नंतर कुठे बाहेर ठेवलेली एक प्रत आम्ही त्यांना दिली.

आमची भेट संपत आलेली असतानाच ते म्हणाले, जाताना तुम्ही हिरेन जोशींना भेटून घ्या. ते अशा सगळ्या गोष्टी बघत असतात. असं सांगत त्यांनी त्यांच्या सचिवांना बोलावून आमची भेट घालून देण्याची सूचना केली आणि आमचा मोर्चा `साऊथ ब्लॉक`कडे वळला.

साऊथ ब्लॉक, नवी दिल्ली

नवी दिल्लीतल्या विजय चौकातून राष्ट्रपती भवनाकडे जाताना डावीकडे साऊथ ब्लॉक आणि उजवीकडे नॉर्थ ब्लॉकच्या भव्य आणि देखण्या इमारती लागतात. परराष्ट्र मंत्रालय आणि राष्ट्रपती भवनाच्या मध्ये पंतप्रधानांचं कार्यालय आहे. भारताचं सगळ्यात मोठं शक्तिकेंद्र. सगळ्या देशाचा कारभार याच इमारतीतून चालतो. साऊथ ब्लॉक हे भारताच्या पंतप्रधानांचं अधिकृत कार्यालय. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर या कार्यालयाला नवी झळाळी मिळाली. कारण नवी दिल्लीत असल्यावर त्यांचा सगळा कारभार याच इमारतीतून चालतो.

पंतप्रधान कार्यालयातूनच फोन गेल्यानं साऊथ ब्लाकमध्ये प्रवेश करताना फारशी अडचण आली नाही. तपासणीचे सोपस्कार पार पडल्यावर आम्हाला एका वेटिंग रूममध्ये बसवण्यात आलं. भव्य आणि प्रशस्त गोलाकार हॉलच होता तो, वर उंच गोलाकार घुमट, त्यावर जुन्या शैलीतलं आर्यकालीन संस्कृतीतलं भलंमोठं पेंटिंग काढलं होतं. मुंबईचे चित्रकार एन.एच. नगरकर यांनी १९२८ मध्ये ते चित्र काढल्याचा उल्लेखही त्यावर होता. तिथं बसल्यावर मला पहिल्यांदा आठवण आली ती देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरूंची. नंतर काही क्षणातच नेहरूंपासून ते डॉ. मनमोहन सिंग यांच्यापर्यंतचा एक पटच डोळ्यासमोरून गेला. गेल्या शंभर, दीडशे वर्षांतल्या सगळ्या महत्वाच्या घटनांची साऊथ ब्लॉक साक्षीदार आहे.

काही मिनिटांमध्येच आम्हाला डॉ. हिरेन जोशींच्या दुसऱ्या मजल्यावरच्या प्रशस्त कार्यालयात नेण्यात आलं. डॉ. जोशी हे पंतप्रधानांची वेबसाईट आणि सोशल मीडियाचं काम बघणाऱ्या गटाचे प्रमुख. सोशल मीडियावर अतिशय सक्रिय असलेले आणि जगात सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा समावेश असल्यानं ते काम किती आव्हानात्मक असेल याची कल्पना करा. त्यांची सासूरवाडी महाराष्ट्रातली आहे त्यामुळे त्यांनाही थोडं मराठी कळतं अशी माहिती पंतप्रधानांनीच आम्हाला आधी दिली होती. पंतप्रधान कार्यालयाची मराठी वेबसाईट, त्यातला कंटेंट, त्याची भाषा अशा अनेक गोष्टींवर ते बोलले. त्यांच्या अपेक्षाही सांगितल्या आमची मतंही विचारली. बोलण्यात कुठेही औपचारिकता, सरकारी स्टाईल किंवा तुटकपणा असं कुठेही जाणवला नाही. अशा मोठ्या क्षमतेचा माणूस या गटाचा प्रमुख असावा हेच पंतप्रधानांच्या सोशल मीडियावरच्या सक्रियतेचं खरं रहस्य आहे.

थोडंसं साऊथ ब्लॉकविषयी...

ब्रिटिश वास्तुविशारद एडविन ल्युटियन यानं नवी दिल्लीचा हा देखणा परिसर उभारला. यातल्या रायसिना हिल्सच्या एका टोकावर अतिशय भव्य आणि सुंदर असं राष्ट्रपती भवन (त्यावेळचं व्हिक्टोरिया हाऊस) आणि दोनही बाजूंना लाल दगडांमध्ये बांधलेल्या साऊथ ब्लॉक आणि नॉर्थ ब्लॉक या इमारती. दोनही ब्लॉकमध्ये तब्बल १ हजार खोल्या. इथल्या मातीचा, वातावरणाचा, परिसराचा विचार करून 1911 मध्ये हा परिसर विकसित करण्यात आला. या भागतल्या दोन तृतीयांश भागात हिरवळ राहील याची कटाक्षाणं काळजी घेतली गेली. तेव्हापासून हा परिसर भारताचं शक्तिस्थान राहिला आहे...

जाता जाता...

माणसांना आपलंसं करण्याची विलक्षण हातोटी काही नेत्यांमध्ये असते. पंतप्रधान मोदी हे त्यात अव्वल आहेत. त्यांच्यावर कडवी आणि प्रखर टीका होत असतानाही त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेच आहे. त्यांच्या या अफाट लोकप्रियतेचं कारण कदाचित हेच असावं. सामान्य नागरिकांना देशाच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या नेत्याला भेटता येतं, त्याच्याशी बोलता येतं. ही खऱ्या अर्थानं लोकशाहीची ताकद आहे आणि लोकशाहीचा विजयही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 17, 2017 04:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close