S M L

मायबोलीला श्रीमंत करणारा अमृतपुत्र !

Sonali Deshpande | Updated On: Feb 26, 2017 05:55 PM IST

मायबोलीला श्रीमंत करणारा अमृतपुत्र !

mahesh_mhatre_ibnlokmat- महेश म्हात्रे कार्यकारी संपादक , IBN लोकमत

संतांची परंपरा लाभलेली, शतकानुशतके सुरू असलेल्या प्रवासात भेटलेल्या अनेक भाषांना आपलेसे करत विकसित झालेली आणि आधुनिक युगातही जगातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या १० भाषांत स्थान पटकावणारी अशी ‘माझी बोली मराठीया’. 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा दिन. मराठीच्या सेवेला वाहून घेणाऱ्या कुसुमाग्रजांचा जन्मदिनच मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. एखाद्या भाषेतील साहित्यिकाच्या जन्मदिनी त्या भाषेचा उत्सव साजरा व्हावा, असे हे जगभरातील एकमेव उदाहरण असावे. आपल्या माय मराठीला स्वप्रतिभेच्या बळावर उत्तुंग शिखरावर पोहोचवणारे कुसुमाग्रज या मायबोलीचे अमृतपुत्र ठरले आहेत. या कविश्रेष्ठाला मानाचा मुजरा ...

शब्दांमधून कधी अंगार फुलवणा-या तर कधी लक्ष-लक्ष फुलांचे ताटवे उमलवणा-या कवींची प्रतिभा म्हणजे मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यातील सगळय़ात महत्त्वाची मजल. जेव्हा शब्दब्रह्म प्रकटले नव्हते, तेव्हा आदिमानवाला गुहेतील शिल्पचित्रांमध्ये भेटलेली ही प्रतिभाशक्ती जसजशी व्यक्त होत गेली तसतसा माणूस अभिव्यक्त होत गेला. त्याच्या या अभिव्यक्तीला आरंभी नृत्याने, सामूहिक ओरडण्याने झालेली सुरुवात कवितेसारख्या प्रतिभा विलासापर्यंत पोहोचली तेव्हा खऱ्या अर्थाने मानवाला माणूसपण लाभले, हे आम्ही नेहमी विसरतो. त्यामुळे आमच्या समाजात कवितेला आणि तिच्या निर्मात्याला म्हणावा तसा मान दिला जात नाही आणि अशा नैराश्यपूर्ण पार्श्वभूमीवर मराठी कवितेला समाजभान देणाऱ्या कवी कुलगुरू कुसुमाग्रज यांची जयंती ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरी होणे ही घटना अवघ्या जगातील कवी कुळासाठी आश्वासक ठरते.

kusumagraj new 1

मराठी सारस्वतात स्वातंत्र्यपूर्व काळातील नवशिक्षित वर्गाने कवितेचे नव-नवे प्रवाह आणले होते. त्यामुळे पारंपरिक नागरी अभिजनवर्गाच्या अवकाशात अडकलेली मराठी कविता थोडीफार विस्तारू लागली होती. त्या काळात १९३३मध्ये विष्णू वामन शिरवाडकर या तरुण कवीने काव्यप्रांतात पाऊल टाकले. ‘कुसुमाग्रज’ या नावाने कविता लिहिणा-या या कवीला खरे तर पत्रकार-संपादक व्हायचे होते; परंतु प्रतिभेच्या पंखावर स्वार होऊन सर्वकाळ आणि सर्व दिशा धुंडाळण्याचे असीम बळ असणाऱ्या या कवीचे मन वर्तमानपत्रांच्या कचेरीत रमले नाही. हे एका अर्थाने बरे झाले.

कुसुमाग्रजांचे जीवनलहरी, विशाखा, किनारा, मराठीमाती, स्वगत, हिमरेषा असे ६ काव्यसंग्रह आणि समिधा हा गद्यकाव्य संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. ‘हिमरेषा’ प्रसिद्ध झाल्यानंतरही ते विविध साप्ताहिकांत, मासिकांत कविता लिहीत होते; परंतु हे सगळे करीत असताना कुसुमाग्रजांच्या मनातील जनसामान्यांविषयीची कणव त्यांच्या प्रत्यक्ष वर्तनातून प्रकटत होती. समाजाने नाकारलेल्या दलित-आदिवासींच्या झोपडीत ज्ञानाचा दिवा लागावा यासाठी कुसुमाग्रज तन-मन-धनाने झटताना दिसायचे. त्यांच्या नाशिकमधील घरामध्ये साहित्य-संगीतासोबत गोरगरिबांच्या सर्वंकष उत्थानाविषयी चर्चासत्रं झडायची आणि त्यामधून नवनवीन सामाजिक कार्याला प्रेरणा मिळायची.

कुणी कुसुमाग्रजांच्या घरी गेला आणि नव्या विचारांनी प्रेरित होऊन आला नाही, असे कधीच होत नसे. कुसुमाग्रजांना लोक प्रेमाने तात्यासाहेब म्हणायचे. त्यांचे नाशिकमधील घर म्हणजे अनेकांसाठी हक्काचे ठिकाण बनले होते. गावखेडय़ातील होतकरू कवी असोत वा कुसुमाग्रजांच्या लिखाणाने वा भाषणाने प्रभावीत झालेला एखादा तरुण, सरकारी नोकरीत रमलेला एखादा उच्चपदस्थ वा कवितेवर प्रेम करणारा राजकारणी सगळ्यांशी ते समानतेने आणि सहजतेने वागायचे. त्यात अभिनिवेश नसायचा किंवा उसना आव आणलेला नसायचा. त्यामुळे तात्यासाहेबांच्या कवितेप्रमाणे त्यांच्या संपर्कात आलेला माणूस पूर्णपणे ‘त्यांचा’ होऊन जात असे. भारतात नव्हे जगात असे फार थोडे साहित्यिक होऊन गेले आहेत, की ज्यांनी जसे लिहिले तसे वर्तन केले. कुसुमाग्रज त्या अगदी मोजक्या लोकांपैकी होत. त्यामुळे आपल्या लिहिण्याने आणि जगण्याने मायभाषेची उंची वाढवणाऱ्या कुसुमाग्रजांच्या जयंतीच्या दिवशी मराठी भाषेचा उत्सव होणे, ही त्यांना वाहिलेली खरी आदरांजली आहे.

कुसुमाग्रज यांची कविता मराठी भाषेचे लेणे बनली त्याला अनेक कारणे आहेत. त्याचा ऊहापोह करताना ‘रसयात्रा’ या कुसुमाग्रजांच्या निवडक कवितांच्या पुस्तकांच्या आरंभीच कविवर्य बा.भ. बोरकर आणि शंकर वैद्य लिहितात, ‘गेली ४० वर्षे कुसुमाग्रज मोठ्या निष्ठेने काव्यनिर्मिती करत आहेत. सत्य, शिव, सौंदर्य यांचे अधिष्ठान असणाऱ्या नंदनवनाची उपासना करणाऱ्या मराठी रोमँटिक संप्रदायाचे ते आजचे सर्वश्रेष्ठ प्रतिनिधी आहेत. केशवसुतांचा क्रांतिकारक आवेश, गोविंदाग्रजांची उत्कटता, बालकवींचे निसर्गप्रेम आणि माधव ज्युलियन यांचा स्वप्नाळूपणा त्यांच्या कवितेत जोमाने बहरलेला दिसतो. सर्वागीण सामाजिक क्रांती, राजकीय घडामोडी आणि सांस्कृतिक स्वातंत्र्य यांच्या विस्तृत संदर्भाकडे पाठ न फिरवता वैयक्तिक सुख-दु:खांची अतिशय हळुवार जोपासना करू पाहणाऱ्या तरुण मनाची ही कविता जणू स्वतंत्र भारताची प्रातिनिधिक कविता आहे. तिची सात्त्विकता आणि भव्यता कायमची टवटवीत आहे.’

kusumagraj 3

आजही जेव्हा अवघा भारतीय समाज संक्रमणावस्थेतून जात आहे. मानवी मूल्यांची घसरण होत असताना यंत्राधारित जगणे अपरिहार्य होत चालले आहे. राजकीय आणि सामाजिक संघर्षात माणसाच्या भावभावनांची हेळसांड होत आहे. सांस्कृतिक संदर्भ तर राजकारणासाठी निमित्तापुरते उरले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्हाला आज पुन्हा कुसुमाग्रजांची कविता गरजेची वाटते. आमच्या धर्मामध्ये जुन्या काळात लिहिलेल्या कथा-काव्यादी ग्रंथांची पारायणे करण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे. तशी आधुनिक काळात ‘प्रथा’ सुरू करायची असेल तर पहिला मान कविवर्य कुसुमाग्रजांच्या साहित्याला द्यावा लागेल. कुसुमाग्रजांच्या सगळ्या कवितांमध्ये अग्रस्थानी असेल ‘गर्जा जय जयकार क्रांतीचा..’ होय, अवघ्या जगातील क्रांतिगीते समोर ठेवली तरी कुसुमाग्रजांच्या या कवितेच्या तोडीचे एकही गीत मिळणार नाही. भूगर्भातील अवघा लाव्हारस गोळा करून कविवर्यानी त्यातून एक-एक शब्द ओतून बनवलेला आहे. त्यामुळे आपल्या मातृभूमीच्या मुक्तीसाठी सर्वस्वाचा होम करायला उद्युक्त झालेल्या क्रांतिकारकांची मनोभूमिका कविता वाचणाऱ्यांच्या मनावर एखाद्या तत्पमुद्रेप्रमाणे उमटते,

कशास आई, भिजविसी डोळे उजळ तुझे भाळ

रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उष:काल

सरणावरती आज आमुची पेटताच प्रेते

उठतिल त्या ज्वालांतून भावी क्रांतीचे नेते.

कुसुमाग्रजांच्या प्रेषिततुल्य वाणीतून उमटलेले हे क्रांतिसुक्त आजही तेवढेच महत्त्वाचे ठरते. देशाला जुलमी इंग्रजांच्या पारतंत्र्यातून स्वतंत्र करण्यासाठी लिहिलेली ती कविता आजही कोट्यवधी भारतीयांना मानसिक, राजकीय आणि सांस्कृतिक गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी प्रेरणादायी वाटते. क्रांतीचे गीत गाताना शब्दांना आगीची झळाळी देणारे कुसुमाग्रज ‘आगगाडी व जमीन’ हा ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ यांच्यातील वर्गसंघर्ष रेखाटताना आक्रमक झालेले कुसुमाग्रज ‘वर्षागमन’ लिहिताना

सजल श्याम घन गर्जत आले। बरसत आज तुषार।

आता जीवनमय संसार

असे म्हणतात आणि आपल्याही मनात आनंदाचे तुषार उडवून जातात. ‘आला किनारा’ म्हणताना कवीच्या आशेला आवेशपूर्ण भरती येते. ‘तमाला जणू अग्नीचा ये फुलोरा’ म्हणणारे कुसुमाग्रज लखलखून समोर येतात. ‘पृथ्वीचे प्रेमगीत’ किंवा ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ लिहिताना कुसुमाग्रजांची कविता भावभावनांच्या हिंदोळ्यावर झुलत असते. मध्येच रौद्रभीषण तांडवाचे दर्शन घडवत असतानाच ‘अद्याप विराणी कुणी वा-यावर गात’ असे सांगून हृदयात विलापाची आर्त कळ उसवून टाकते. तर कधी त्यांच्या शब्दांतून ‘उत्तररात्री’चे वर्णन करताना

घन तमी शुक्र बघ राज्य करी

रे! खिन्न मना बघ जरा तरी

अशा लोकविलक्षण ओळी आकारास येतात आणि रसिकमन त्या शब्दोत्सवाने थरारून उठते. कुसुमाग्रजांच्या कवितेचे हेच वैशिष्टय़ आहे की, ती सगळय़ा ठरावीक साच्यातील, ढाच्यातील कवितेपेक्षा वेगळी आहे. अशा या जगावेगळय़ा मराठी भाषेत जन्म घेतला आणि आपल्या मायबोलीची महती वाढवली, त्या कविवर्य कुसुमाग्रजांना त्यांच्याच शब्दांतून शब्दांजली..

शब्द- जीवनाची अपत्ये-

मृत्यूपर्यंत पोहोचत नाहीत

म्हणून तुझ्या समाधीवर

मी वाहत आहे

माझे मौन.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 26, 2017 05:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close